प्रतिमा आणि प्रतिसृष्टी या दोन गोष्टींचे वेड माणसाला अनंत काळापासून असावे. काळाच्या ओघात जन्माला आलेली मिथके, दंतकथा हे याच प्रतिसृष्टीचे द्योतक असल्याचे दिसते. प्रख्यात लेखक युवल नोआह हरारी म्हणतो की, माणूस गोष्टींमध्ये विचार करतो आणि याच गोष्टींच्या साहाय्याने आपल्या सभोवताली असलेल्या जगाचा अन्वयार्थ लावतो. विविध कलाविष्कार, अभिव्यक्तीचे भिन्न भिन्न प्रकार हे याच अन्वयार्थाचे रूप असते. वर्तमानातही प्रतिसृष्टी उभारणे तंत्रज्ञानामुळे सोपे झाले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून, आपल्या मनातले अवकाश आपल्यासमोर म्हणजे भौतिक जगात चितारणारी अनेक तंत्र उदयाला आली. या तंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे, सामान्य माणसासाठी हे तंत्र सहज उपलब्ध झाले.
समाजमाध्यमांवर सध्या पसरलेली ‘घिबली’ चित्रांची लाट, हे याच ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे फळ आहे. सामान्य माणसांपासून ते देश-विदेशातील राजकीय नेत्यांनासुद्धा, या ‘घिबली’ चित्रांचा मोह आवरता आला नाही. जपानी चित्रशैलीमध्ये आपले फोटो बघण्यासाठी, लोकांची अक्षरशः ऑनलाईन झुंबड उडाली. ‘एआय’च्या आगमनामुळे ही चित्रलाट शक्य झाली. सुरुवातीला ‘चॅट जीपीटी’ आणि नंतर ‘ग्रॉक’च्या माध्यमातून, लोकांनी आपले विश्व नव्याने बघण्याचा चंगच बांधला. असे म्हणतात की, प्रसिद्धी आणि टीका या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ‘घिबली’च्या या चित्रलाटेवरसुद्धा अशीच टीकेची झोड उठली. सुरुवातीला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तयार केलेल्या या चित्रांची नैसर्गिकता हरवली आहे, असे मत काहींनी व्यक्त केले. दुसर्या बाजूला अनेक कलाप्रेमींनी, यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. एक चित्रकार ज्या भाव भावनांच्या संगमातून चित्रांची निर्मिती करतो, त्याच्या तुलनेत ‘घिबली’चे हे नवे रूप बव्हंशी कृत्रिम वाटते. कायद्याच्या दृष्टीने अशा चित्रांच्या निर्मितीमुळे कॉपीराईटचा प्रश्न उद्भवतो का? असा सवालसुद्धा अनेकांनी विचारला. काहींच्या मते, ‘ऑपन एआय’ने ज्या प्रकारे ‘घिबली’ चित्रशैलीचे सार्वत्रिकरण केले आहे, त्यामुळे ‘घिबली’च्या निर्मात्यांचा एक प्रकारे अपमानच झाला आहे.
‘घिबली’ या चित्रशैलीची निर्मिती, हायओ मियाझाकी नावाचे ज्येष्ठ जपानी कलाकार यांनी केली. यावेळी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कला क्षेत्रातील वापरावर त्यांनी २०१६ साली जे भाष्य केले होते, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तयार केलेल्या एका अॅनिमेटेड चित्रपटावर, त्यांनी टीका केली होती. यावेळी बोलताना मियाझाकी म्हणाले होते की, “मी माझ्या कामामध्ये अशा तंत्राचा शिरकाव कदापि होऊ देणार नाही.” मियाझाकी यांच्या चित्रशैलीतून जन्मलेले चित्रपट जगभरात प्रसिद्ध आहेत. मियाझाकी यांच्या कामाची साक्ष देणारा माहितीपट ‘Ten Years with Hayao Miyazaki’ २०२० साली प्रसिद्ध झाला होता. यामध्ये एका चित्रपटासाठी मियाझकी आणि त्यांच्या चमूला, ६० ते ७० हजार फ्रेम्स तयार कराव्या लागल्या. या सगळ्या फ्रेम्समधील चित्र त्यांनी हाताने रंगवली होती. एखादी कलाकृती उभारण्यासाठी, ज्यावेळेस इतके कष्ट घ्यावे लागतात आणि त्याच कलाकृतीचे प्रारूप जेव्हा लोकांना काही क्षणात प्राप्त होतो, त्यावेळीस समाजमनावर उमटलेला नाराजीचा सूर स्वाभाविक आहे.
इंटरनेटच्या आगमनामुळे माहितीचे लोकशाहीकरण झाले. ‘ग्लोबल व्हिलेज’ची संकल्पना अस्तित्वात आली. इंटरनेटच्या क्रांतीनंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता तर आता आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवत आहे. या बदलांच्या वेगाशी बरोबरी करताना, काही जणांची दमछाक होत आहे. व्यावसायिक जगतात आणि कामाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपली उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी, लोक ‘एआय’चा आधार घेत आहेत. मात्र, ‘एआय’चा ज्यावेळेस कलेच्या प्रांतात शिरकाव होतो, त्या वेळेस अनेक प्रश्न निर्माण होताना दिसून येत आहे. आताच्या घडीला मानवी सर्जनशीलतेला मागे टाकण्याइतपत ‘एआय’ सक्षम नसले, तरी भविष्यातील चित्र नेमके कसे असेल? याबद्दल चिंता आणि चिंतन होताना दिसून येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही आपल्या काळाची अनिवार्यता जरी असली, तरी संवेदनशील समाजमन या परिवर्तनाला कसे तोंड देईल? हे बघणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. ‘घिबली’ हा आजचा ट्रेंड जरी असला, तरी त्याच्या पलीकडे जाऊन अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावी लागतील हेच खरं.