गरिबीवर मात करून स्वकर्तृत्वाने यशाची दमदार पाऊले टाकत मानद पी.एचडी मिळवणार्या आणि शैक्षणिक क्षेत्र ते सामाजिक क्षेत्र असा कार्याचा परिघ असणार्या सुनील पांचाळ यांच्याविषयी...
रत्नागिरीमधील संगमेश्वर तालुक्यातील नयनरम्य डोंगररांगात वसलेले किरडुवे हे छोटेसे खेडेगाव. निसर्गदत्त सौंदर्याची मुक्तहस्ते झालेली उधळण, स्वयंभू सोमेश्वराचे जागरूक देवस्थान, मार्लेश्वरहून उगम पावलेल्या बावनदीच्या सहवासाने सुजलाम सुफलाम झालेला गावचा परिसर. या गावात १९६९ साली चंद्रभागा-शिवराम पांचाळ या मातापित्याच्या पोटी सुनील यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती कमालीची गरिबीची. पारंपरिक सुतारकाम व्यवसायावरच कुटुंबाची गुजराण चाले. परिस्थितीतून आलेल्या कर्तव्याच्या जाणीवेमुळेच, इयत्ता अकरावीपासूनचे सर्व शिक्षण स्वावलंबनातून सुनील यांनी पूर्ण केले. सुनील यांचे पदवी शिक्षण देवरुख कला व वाणिज्य महाविद्यालयात झाले. याच महाविद्यालयातून त्यांनी मराठी संपूर्ण विषय घेऊन, दोन्ही शाखांमधून प्रथम येण्याचा मान मिळवला. रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर कॉलेजमध्ये ‘एमए’चे शिक्षण घेतले आणि शासकीय अध्यापक महाविद्यालयातून ‘बीएड’ पदवीही संपादन केली.
१९९३ साली वटपौर्णिमेच्या सणानिमित्त फणस विकण्यासाठी सुनील आणि त्यांचे मित्र फणसाचा ट्रक भरून डोंबिवलीला आले. सुनील यांचे सख्खे तीन काका आपल्या डोंबिवली शहरातच राहत असल्याने, सुनील यांचे डोंबिवलीत येणे जाणे असायचे. फणसाची चांगली विक्री झाली, अर्थलाभही झाला. परंतु, परत गावी जाण्यापूर्वी डोंबिवली येथील विवेकानंदन क्लासेसचे संचालक श्रीकांत नेहते यांच्याकडे नोकरीसाठी चौकशी केली असता, त्यांनी सुनील यांना आपल्या क्लासेसमध्ये क्लार्क आणि शिक्षक म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यांच्याच बहिणीच्या माध्यमातून त्यांनी, सन १९९३ पासून ‘राष्ट्रीय शिक्षण संस्था’ संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगर या माध्यमिक शाळेत रुजू झाले आणि खर्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अक्षरलेखन उत्तम असल्याने, विविध कार्यक्रमावेळी प्रसंगानुरूप केलेले फलकलेखन सर्वांचचे लक्ष वेधून घेऊ लागले. वक्तृत्व, नाट्य, काव्य, निबंध, चित्रकला इत्यादी स्पर्धांमधील यशाने, त्यांचे कर्तृत्व अधिक बहरू लागले. विविध शाळांमध्ये विविध विषयांवर केलेल्या कॉर्नर्समुळे, शाळांच्या भिंती बोलू लागल्या. पुढे सुनील यांची ‘महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळा’वर, मराठी प्रथम भाषेचा संपादक म्हणून निवड झाली. तसेच मराठी पाठ्यपुस्तक समीक्षक, विषयतज्ज्ञ, राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक, प्रश्नपत्रिका चिकित्सक, ‘एससीआरटी’तील समावेश, ‘मुंबई विद्यापीठ शिक्षण मंडळ’ सदस्य अशा विविध पदांवर काम करताना, एकूणच शिक्षण प्रणालीचा त्यांचा सखोल अभ्यास होत गेला.
राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या सावलीत, व्यक्तिमत्त्व विकसनाच्या नानाविध संधी त्यांना प्राप्त झाल्या. या संस्थेच्या रौप्य आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळ्याचा साक्षीदार असलेले सुनील, या संस्थेच्या माध्यमातून डोंबिवली शहरांमध्ये नावलौकिकास पात्र झाले. संस्था आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला आणि पुरस्कार वितरण सोहळ्याची प्रसंगानुरूप देखणी व्यासपीठ सजावट, पुरस्कारप्राप्त थोर विभूतींचे मानपत्र लेखन हा त्यांच्या आयुष्याचा अविस्मरणीय ठेवाच! या संस्थेतील शिक्षकांच्या सहभागातून इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांसाठी त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली, ‘विवेकलक्ष्यी’ कृतिपेढीचे निर्माण काम त्यांच्याकडून झाले. डोंबिवलीच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात ते काळासवे समरस होऊन गेले. डोंबिवली नगरीनेही त्यांना सामावून घेतले. यातूनच डोंबिवली साहित्य सभेचा कार्यवाह आणि सलग दोन वर्ष अध्यक्ष, ‘श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज डोंबिवली संस्थे’चा अनेक वर्षे कार्यवाह व अध्यक्ष, ‘राष्ट्रीय शिक्षण संस्था’ सुवर्ण महोत्सवीनिमित्त काढण्यात आलेल्या ‘वाटचाल अखंड ५० वर्षांची’ स्मरणिकेचा कार्यकारी संपादक, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर शाळेच्या रौप्य महोत्सवी समितीचा कार्यवाह व काढण्यात आलेल्या स्मरणिकेचा मुख्य संपादक आणि सध्या ‘श्री सोमेश्वर पांढरपेशेवाडी संस्था’, मुंबई संस्थेचा कार्यवाह अशा विविध पदभूषणांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक अनुभवसमृद्ध होत गेले आणि होत आहे.
शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील जवळपास २२ पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’, दै. ‘ठाणे जीवनदीप वार्ता’तर्फे ‘जीवनदीप राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. न्यू सरस्वती हाऊस नवी दिल्ली या प्रकाशन संस्थेसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आतापर्यंत अनेक सेमिनार, वेबिनार व वर्कशॉप्स घेतली आहेत. या माध्यमातून शिक्षकांसाठी मराठी भाषा अध्ययन-अध्यापनाकरिता केलेल्या कार्याबद्दल ग्लोबल युनिव्हर्सिटीने त्यांना ‘मानद पीएच.डी’ प्रदान केली. माझ्या गतकाळाकडे वळून पाहताना होणारा आनंद लोकविलक्षण आहे. या संपूर्ण प्रवासात मला लाभलेली तोलामोलाची, जीवाभावाची माणसं हे माझ्याकडे असलेले अक्षय धनच! माझे कुटुंबीय, राष्ट्रीय शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शिक्षण संकुलातील सर्व सहकारी शिक्षक व कर्मचारी वृंद, सर्व समाज बांधव, गावकरी, मित्र-मैत्रिणी ज्यांच्यामुळे मला खरी ओळख मिळाली या सर्वांचाच मी मनापासून ऋणात असल्याचे सुनील आवर्जून सांगतात. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या सुनील यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!