सर्व सुखसुविधा असूनही भारतीय कुटुंबव्यवस्था डळमळीत

सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे; चर्‍होलीनगराचा वर्षप्रतिपदा उत्सव

    31-Mar-2025
Total Views | 15
 
Sarkaryavah Dattatreya Hosabale
 
 
पुणे:  ( Sarkaryavah Dattatreya Hosabale)  “एक हजार वर्षांच्या परकीय आक्रमणात अनेक राज्ये, मंदिरे आणि विद्यापीठे उद्ध्वस्त झाली. परंतु, भारतीय जीवनमूल्यांचा आधार असलेल्या कुटुंबव्यवस्थेला आक्रमक हात लावू शकले नाहीत. आज मात्र आधुनिक युगात सर्व सुखसुविधा असतानाही भारतीय कुटुंबव्यवस्था डळमळीत होत असून, राष्ट्रहितासाठी ही धोक्याची घंटा आहे,” असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी व्यक्त केले.
 
पिंपरी-चिंचवड येथील संघाच्या चर्‍होलीनगराच्या वर्षप्रतिपदा उत्सवात ते बोलत होते. डूडूळगाव येथील संत सावतामाळी मंदिर प्रांगणात पार पडलेल्या उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून ‘आळंदी शहर व्यापारी संघटने’चे अध्यक्ष सतिष चोरडिया, जिल्हा संघचालक विनोद बन्सल, नगर कार्यवाह नारायण बांगर उपस्थित होते.
 
“कुटुंब टिकले, तर राष्ट्र टिकेल,” असे प्रतिपादन करताना सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे म्हणाले, “नैतिक मूल्यांच्या आधारे उभी राहिलेली भारतीय कुटुंबव्यवस्था ही जगातील सर्वश्रेष्ठ प्रणाली आहे. संस्कार, संस्कृती, सेवाभाव आणि आत्मीयता असलेली कुटुंबव्यवस्था राष्ट्रालाही सक्षम करते. आपल्या कुटुंबात ’मातृ-पितृ देवो भव’ या भावाचे आचरण व्हायला पाहिजे. आधुनिक युगात कुटुंबव्यवस्था टिकविण्यासाठी प्रत्येक सदस्याने प्रयत्न करायला हवेत. व्यक्तिगत आणि राष्ट्रीय चारित्र्याच्या विकासातून श्रेष्ठ भारत निर्माण होईल,” असेही होसबाळे म्हणाले.
 
सतिष चोरडिया म्हणाले, “राष्ट्रभक्ती आणि संस्कृतीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अतुलनीय कार्य करत आहे. संघाचे निस्वार्थ राष्ट्रकार्य संपूर्ण समाजासाठी मार्गदर्शक आहे.” कार्यक्रमापूर्वी सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी श्री अडबंगनाथ महाराज, श्री संत सावता माळी यांच्या मंदिरांचे दर्शन घेत परिसरातील कामाची माहिती घेतली.
 
हिंदू समाजात जातिभेदाला स्थान नाही
 
“सर्वांमध्ये ईश्वरी अंश असल्याचे आपला धर्म सांगतो. कोणत्याही धर्मग्रंथात जातीच्या आधारावर भेदभावाला स्थान नाही. संत आणि महापुरुषांनी, तर जातिभेदाला विरोध केला. असे असतानाही समाजात जातीच्या आधारावर भेदभाव होत असेल, तर तो आपल्यासाठी कलंक आहे. हिंदू समाजाने आता जातिभेदाला दूर लोटले पाहिजे,” असे परखड मत दत्तात्रेय होसबाळे यांनी व्यक्त केले. तसेच, “नागरिकांनी हक्कांबरोबरच कर्तव्याचेही पालन करायला हवे. भारताला श्रेष्ठ बनवायचे असेल, तर समाजानेच पुढे यायला हवे,” असे आवाहनही त्यांनी केले.
 
पंचपरिवर्तनाचे आवाहन...
 
समाजहितासाठी कुटुंबव्यवस्थेचे सुदृढीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन, नागरिकांची कर्तव्ये, स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था, स्वबोध आणि सामाजिक समरसतेचा संदेश सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी आपल्या उद्बोेधनातून दिला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121