धार्मिक वर्चस्वाचे सापळे...

    31-Mar-2025
Total Views | 16

Conversion
 
इस्लामचा प्रसार हा गेल्या काही दशकांत जागतिक स्तरावर वेग घेत आहे. त्याचे जसे सामाजिक परिणाम आहेत, तसेच राजकीय परिणामही आहेत. सध्या अमेरिका आणि केनिया या देशांत इस्लाम स्वीकारणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा ‘प्यू रिसर्च सेंटर’चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. धर्मप्रसार केवळ श्रद्धेचा विषय नाही, तर त्याला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संदर्भही असतात. कोणत्याही देशाच्या मूळ संस्कृतीवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकणारा हा बदल, सहजतेने स्वीकारला जाऊ शकत नाही. इस्लामचा हा वाढता प्रभाव केवळ वैयक्तिक श्रद्धेपुरता मर्यादित नाही, तर तो व्यापक स्वरूपात समाजव्यवस्थेचे स्वरूप बदलू पाहत आहे.आजमितीला युरोपात त्याचे चित्र अधिक स्पष्ट दिसते.
 
युरोपप्रमाणेच अमेरिकाही पारंपरिकपणे ख्रिश्चनबहुल देश असला, तरी गेल्या काही दशकांत तिथे इस्लामचा प्रसार लक्षणीयरित्या वाढला. यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. अमेरिकेतील आफ्रिकन-अमेरिकन समुदायात इस्लामचा प्रभाव अधिक दिसून येतो. अनेक जण इस्लाम स्वीकारताना त्यातील आध्यात्मिक शोध, सांस्कृतिक पुनरुत्थान आणि शिस्तबद्ध जीवनशैली यांसारख्या बाबींचा उल्लेख करतात. ही सगळी इस्लामची वैशिष्ट्ये आहेत, असा प्रसार वेगाने तिथे केला जात आहे. त्यामुळे अमेरिकेतील अनेक जनसामान्यही इस्लामकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. तथापि, वस्तुस्थिती अशी की, अमेरिकेतील तुरुंग व्यवस्थेतही मोठ्या प्रमाणावर इस्लामी धर्मांतरण होते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अनेक जण तुरुंगात असताना, कट्टरतावादी विचारसरणीच्या प्रभावाखाली येतात आणि इस्लाम स्वीकारतात. तुरुंगाबाहेर पडल्यावर त्यातील काही जण हिंसक आणि धर्मांध गटांसाठी कार्यरत होतात.
 
अमेरिकेसारखी परिस्थिती केनियामध्येही आहे. मात्र, केनियामध्ये इस्लामच्या प्रसारामागे एक वेगळी रणनीती दिसून येते. मोठ्या प्रमाणावर मुस्लीम धर्मप्रसारकांकडून आर्थिक मदत केली जाते. गरजू लोकांना रोजगार, शिक्षण, आरोग्यसेवा आणि इतर सुविधा पुरवण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतरण केले जाते. हे धर्मांतर स्वेच्छेने होत नसून, लोकांच्या गरिबीचा फायदा घेतला जातो. केनियाच्या इतिहासात 1980-90 सालच्या दशकातील राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेचा फायदा घेत, मुस्लीम गटांनी मोठ्या प्रमाणावर धर्मप्रसार केला. परिणामी, गेल्या दोन दशकांत केनियातील मुस्लीम लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. अशाप्रकारे, केनियामधील मुस्लीम गट केवळ धार्मिकच नव्हे, तर राजकीय प्रभाव वाढवण्याच्या हेतूनेही कार्यरत आहेत.
 
आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध धर्म त्यांच्या प्रसाराचे कार्य करतच असतात. इस्लामच्या प्रसाराविषयी चर्चा करताना हा बदल केवळ धार्मिक नव्हे, तर एक हेतुपुरस्सर घडवलेला सामाजिक आणि राजकीय प्रयोग आहे का, याचा विचार करणे आवश्यक आहे. इस्लामचा प्रसार हा श्रद्धेच्या नावाखाली होत असला तरी, त्याचा एक व्यापक सामाजिक आणि राजकीय हेतू असल्याचे स्पष्ट आहे. युरोपात इस्लाम प्रसारानंतर, मूळ समाजव्यवस्थेलाच आव्हान देण्याची मानसिकता अनेक ठिकाणी दिसून आली आहे. अनेक ठिकाणी पूर्वीच्या कायद्यांना आव्हान देत, ‘शरिया कायदा’ लागू करण्याच्या मागण्या केल्या जातात. कोणत्याही धर्माचा प्रसार नैसर्गिक स्वरूपाचा असेल, तर तो फारसा वादग्रस्त ठरत नाही. परंतु, इस्लामच्या बाबतीत कट्टरतावाद असल्याने हा प्रसार अधिकच चिंताजनक ठरतो.
 
तसेच, इस्लाम स्वीकारल्यानंतर समाजातील लोकशाही तत्त्वांना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही आव्हान दिले जाते. काही देशांत ईशनिंदा कायदा आणि महिलांच्या हक्कांवरील निर्बंध यांसारख्या गोष्टी लागू करण्याची मागणी सर्रास होते आहे. हा धोका ओळखूनच ट्रम्प यांनी, इस्लाममधील कट्टरतावादाविरोधात भूमिका घेतलेली दिसते. इस्लामचा प्रसार हा जगभरातील पारंपरिक समाजरचनेसाठी मोठे आव्हान ठरू शकतो. जगातील ही बदलती धार्मिक समीकरणे आणि त्यातून उद्भवणार्‍या परिणामांना वेळीच ओळखले नाही, तर काही दशकांनंतर अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेत पारंपरिक संस्कृती अस्तित्वहीन होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. म्हणूनच, हा विषय आज राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
 
 कौस्तुभ वीरकर 
अग्रलेख
जरुर वाचा
छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

"छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत आहेत. शिव चरित्राचा अभ्यास करून आपण त्यांच्या ऋणानुबंधाशी जोडले जातो. शिवचरित्र कायम संघर्षाची प्रेरणा देते. म्हणूनच त्यांस युगंधर, युगप्रवर्तक आणि युगपुरुष म्हणतात. एक व्यक्ती आणि राजा म्हणून शिवाजी महाराजांचे चारित्र्य अनुकरणीय आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. नागपुरातील मुंडले सभागृहात 'युगंधर शिवराय' हे पुस्तक नुकतेच सरसंघचालकांच्या शुभहस्ते प्रकाशित झाले. त्यावेळी ते बोलत होते. Yug..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121