नितीशबाबूंना उपरती, ममतादीदींची अधोगती...

    31-Mar-2025
Total Views | 23
 
 
नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी
 
वारंवार पक्षबदलाच्या भूमिका घेऊन मुख्यमंत्रिपदाची खुर्ची टिकवून ठेवणार्‍या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना अखेरीस अशा दलबदलू राजकारणाने नुकसान आपलेच असल्याची उशिरा का होईना उपरती झाली, तर दुसरीकडे ब्रिटनच्या दौर्‍यावर असलेल्या ममता बॅनर्जींना तिथेही हिंसाचार, भ्रष्टाचार यांसारख्या मुद्द्यांवरुन बंगाली हिंदू समाजाच्या रोषाला सामोेरे जावे लागले. तेव्हा, दोन नेत्यांच्या या दोन वेगळ्या तर्‍हांचे वर्तमानातील प्रतिबिंब टिपणारा हा लेख...
 
राजकारणात काही नेत्यांकडून घोडचुका होत असतात. पण, सर्वच त्या चुकांची कबुली देतातच असे नाही. पण, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मात्र आपल्या हातून झालेल्या चुकीची नुकतीच प्रांजळपणे कबुली दिली. एकेकाळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असलेले, अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविलेले नितीश कुमार यांनी मध्यंतरी आपले राजकीय महत्त्व इतरांना जाणवून देण्याच्या हेतूने विरोधकांच्या महागठबंधनामध्ये प्रवेश केला होता. त्या आघाडीत असलेल्या एकाहून एक भ्रष्टाचारी नेत्यांशी त्यांनी हातमिळवणी केली होती. राजकारणात काहीही घडू शकते हे खरे असले, तरी क्षुल्लक राजकीय स्वार्थासाठी नितीश कुमार यांनी महागठबंधनमध्ये स्वतःला आणि आपल्या पक्षाला सामील केले होते. पण, नितीश कुमार यांना आपल्या केलेल्या कृतीचा पश्चाताप झाला असून, तसे जाहीर वक्तव्य त्यांनी केले आहे. ‘इंडी’ आघाडी म्हणजे, महागठबंधनमध्ये दोन वेळा सहभागी होऊन आपण चूकच केली, अशी कबुली त्यांनी दिली. आता अशी चूक आपल्या हातून घडणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
“आपला जो राजकीय उत्कर्ष झाला, तो तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यामुळेच,” असे श्रेय अटल बिहारी वाजपेयी यांना नितीश कुमार यांनी दिले. आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी वचनबद्ध असल्याचेही नितीश कुमार यांनी स्पष्ट केले. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना, बिहार सरकार राज्याच्या विकासासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती नितीश कुमार यांनी दिली. “महागठबंधनमध्ये जाऊन आम्ही चूक केली. असे आता पुन्हा घडणार नाही. ती चूकच होती. मला मुख्यमंत्री कोणी केले? अटल बिहारी वाजपेयी यांनी मला मुख्यमंत्री केले. हे आम्ही कसे विसरू?” असेही ते म्हणाले. राज्य सरकारने 2006 सालापासून पंचायत राज निवडणुका घेण्यास प्रारंभ केला. आतापर्यंत चार निवडणुका झाल्या. आता अनेक ठिकाणी महिलांचे प्रतिनिधीत्व 50 टक्क्यांहून अधिक आहे. त्याआधी यासंदर्भात काहीच केले गेले नाही. बिहारमध्ये 2005 सालापूर्वी संध्याकाळनंतर घराबाहेर कोणी पडत नव्हते. शिक्षणासाठी काहीच केले गेले नव्हते. योग्य आरोग्यसेवा उपलब्ध नव्हती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 
उशिरा का होईना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना त्यांनी दोन वेळा जी चूक केली होती, त्याबद्दल उपरती झाली हेही नसे थोडके! आता बिहारमध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. कालच्या रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीसाठी पाटण्याला गेले होते. एका कार्यक्रमात बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर सडकून टीका केली. “1990 ते 2005 या कालावधीतील लालू प्रसाद यांची राजवट म्हणजे ‘जंगलराज’ होते. चारा घोटाळ्यामुळे लालू प्रसाद यांनी देशात आणि जगामध्ये बिहार राज्याची बदनामी केली,” अशी टीका गृहमंत्री अमित शाह यांनी केली.
 
बिहारमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता, राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये राहण्याशिवाय आपणास पर्याय नाही, हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी आपली चूक मान्य केली आणि पुन्हा अशी चूक करणार नाही, असेही स्पष्ट केले!
 
ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध ‘ऑक्सफोर्ड’मध्ये निदर्शने
 
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अलीकडेच ब्रिटनच्या दौर्‍यावर गेल्या होत्या. या दरम्यान त्यांचा ‘ऑक्सफोर्ड विद्यापीठा’तील केलॉग कॉलेजमध्ये एक कार्यक्रम होता. आपण प. बंगालमध्ये उत्तम शासन करीत असल्याने आपले सर्वत्र कौतुकाच होणार, असा त्यांचा जो समज होता, तो त्या महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमास उपस्थित बंगाली हिंदू, विद्यार्थी कार्यकर्ते आदींनी खोटा ठरविला. प. बंगालमध्ये महिलांवर होत असलेले अत्याचार, हिंदू समाजाचा होत असलेला छळ, निवडणुकांच्या नंतर त्या राज्यात झालेला हिंसाचार आणि त्या राज्यात असलेला भ्रष्टाचार यावरून त्यांच्याविरुद्ध निदर्शने करण्यात आली. गेल्या दि. 27 मार्च रोजी त्यांचा केलॉग कॉलेजमध्ये हा कार्यक्रम होता. ‘सामाजिक विकास’ आणि ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर केंद्रित असा हा कार्यक्रम होता. पण, त्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांना बंगाली जनतेच्या निदर्शनांना तोंड द्यावे लागले! लंडनमधील बंगाली हिंदू समाजाने केलेल्या निदर्शनामध्ये कोलकाता येथील आर. जी. कार मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व हत्या आणि संदेशखाली भागात महिलांवर झालेले लैंगिक हिंसाचार असे जे गुन्हे झाले, त्याबद्दल न्याय मिळायला हवा, अशी मागणी निदर्शक करीत होते. हिंदूंचे हत्याकांड आणि प. बंगालमध्ये सर्वत्र असलेला भ्रष्टाचार याकडे लक्ष वेधून घेणारे फलक निदर्शकांच्या हाती होते. मात्र, ममता बॅनर्जी यांनी यांच्यावर या निदर्शनांचा आणि घोषणाबाजी याचा काही परिणाम झाला नाही. प. बंगालमधील हिंदू महिलांच्या सुरक्षेसंदर्भात विचारले असता, “मी सर्वांसाठी आहे. हिंदू, मुस्लीम, शीख आणि ख्रिश्चन या सर्वांसाठी मी आहे,” असे त्या उत्तरल्या. पण, त्यांचे हे उत्तर मान्य नसलेल्या काही उपस्थितांनी त्यांच्याविरुद्ध ‘गो बॅक’ अशा घोषणा दिल्या. ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध जे आरोप करण्यात आले होते ते फेटाळून लावताना, आर. जी. कार प्रकरण हा केंद्र सरकारचा विषय असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी निदर्शकांना दमही भरला. “येथे राजकारण करून नकारार्थी कथन करणे सोपे आहे. तुमच्यात हिंमत असेल, तर प. बंगालमध्ये या आणि तेथे राजकारण करा,” असे आव्हान त्यांनी निदर्शकांना दिले. आपल्या कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी यांनी भारताची आर्थिक प्रगती व्हावी, तशी झाली नसल्याचे मत व्यक्त केले होते. त्यावरून भाजप नेते प्रदीप भंडारी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. विदेशी भूमीवर असे भारतविरोधी वक्तव्य केल्याबद्दल भंडारी यांनी त्यांच्यावर टीका केली. ममता बॅनर्जी या विदेशी भूमीवर जे बोलल्या त्यावर भाजप नेते अमित मालवीय, दिलीप घोष यांनी टीका केली. “ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत प. बंगालमध्ये जे गुन्हे घडले, त्यांची उत्तरे त्यांनी दिलीच पाहिजेत,” असे भाजप नेते दिलीप घोष यांनी म्हटले आहे. आर. जी. कार कॉलेजमध्ये जे काही घडले, त्याची उत्तरे ममता बनर्जी यांनी द्यायला हवी होती, असे दिलीप घोष म्हणाले. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिमा विदेशात कशी आहे हे या उदाहरणावरून दिसून येते.
 
अभिनेता मोहनलाल याची दिलगिरी!
 
मल्याळम चित्रपट ‘एल 2 : इमपुरान’वरून केरळमध्ये सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटातील राजकीय आणि सामाजिक आशयावरून निर्माण झालेला वाद लक्षात घेऊन प्रसिद्ध अभिनेता मोहनलाल याने गेल्या दि. 30 मार्च रोजी एक निवेदन प्रसिद्ध करून जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. या चित्रपटात जे काही आक्षेपार्ह भाग आहेत, ते काढून टाकण्यात येतील, असे आश्वासनही मोहनलाल याने आपल्या चाहत्यांना दिले आहे. आपल्या निवेदनात, “कोणतीही राजकीय चळवळ, तत्त्वज्ञान किंवा धार्मिक गट यांच्याबद्दल माझ्या चित्रपटांमधून द्वेषभावना पसरवली जाणार नाही, अशी खात्री देणे हे एक नट म्हणून माझे कर्तव्य आहे. ते लक्षात घेऊन या चित्रपटामुळे माझ्या चाहत्यांना जो मनस्ताप झाला आहे, त्याबद्दल मी आणि या चित्रपटाचा संपूर्ण संच खेद व्यक्त करीत आहे,” असे मोहनलाल याने म्हटले आहे. त्याची जबाबदरी आम्ही घेत असून असे वादग्रस्त भाग चित्रपटामधून काढून टाकायलाच हवेत, असेही मोहनलाल याने म्हटले आहे. या चित्रपटामुळे जो वाद निर्माण झाला आहे, तो लक्षात घेऊन या चित्रपटातून वादग्रस्त भाग काढून टाकण्यात येईल, असे चित्रपट निर्मिती करणार्‍यांनी म्हटले आहे.
 
चित्रपटातून दंगलीची, महिलांच्या विरुद्धच्या हिंसाचाराची दृश्ये वगळण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेता मोहनलाल याने आपल्या चाहत्यांची माफी मागितली असली तरी हा चित्रपट वादग्रस्त बनविण्यास चित्रपटाचा दिग्दर्शक पृथ्वीराज सुकुमारन हाच खरा जबाबदार आहे. या दिग्दर्शकाने केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यास त्याने विरोध केला आहे. या दिग्दर्शकाने नेहमीच दुटप्पी भूमिका घेतली आहे. एकीकडे ‘सीएए’ला विरोध करणार्‍या या दिग्दर्शकाने कधीच बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचारांविरुद्ध तोंड उघडले नाही. ‘एल 2 : इमपुरान’ चित्रपटात गोध्रा घटनेनंतर मुस्लीम समाजाबाबत जे काही घडले, त्याचे चित्र दिग्दर्शकाने रंगविले आहे. या चित्रपटाचा जो खलनायक आहे, त्याचे नाव बजरंगबली आहे. तेच नाव त्याने का निवडले याचे उत्तर त्याने द्यायला हवे! केंद्रीय मंत्र्याच्या भूमिकेत हे पात्र दाखविण्यात आले आहे. चित्रपटातील या आणि अशा अन्य दृष्याबद्दल दिग्दर्शक सुकुमारन यांच्यावर समाजमाध्यमांवर जोरदार टीका केली जात आहे. ‘एल 2 : इमपुरान’ हा चित्रपट आणि त्यानिमित्ताने मोहनलाल आणि दिग्दर्शक सुकुमारन हे वादात सापडले आहेत. मोहनलाल याने दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, असे असताना केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मात्र आपल्या डाव्या विचारसरणीला साजेशी भूमिका घेतली आहे. या चित्रपटाविरुद्ध जे वातावरण तयार झाले आहे, त्याचा विजयन यांनी निषेध केला आहे. या निमित्ताने संघ परिवारावर तोंडसुख घेण्यासाठी त्यांनी या संधीचा वापर केला नसता, तर ते नवल ठरले असते!
 
दत्ता पंचवाघ  
 
9869020732
 
अग्रलेख
जरुर वाचा
जनसुरक्षा कायद्याविरोधी अपप्रचाराचे षड्यंत्र उधळून लावण्याची गरज : सागर शिंदे

जनसुरक्षा कायद्याविरोधी अपप्रचाराचे षड्यंत्र उधळून लावण्याची गरज : सागर शिंदे

राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरलेल्या शहरी माओवाद आणि नक्षली चळवळीविरोधात ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ प्रस्तावित आहे. यासंदर्भात आवश्यक त्या सूचना आणि प्रस्तावदेखील राज्य सरकारच्यावतीने सार्वजनिक स्वरूपात मागवण्यात आले असून, त्या सूचनांचाही कायद्याचा मसुदा अंतिम करण्यापूर्वी विचार केला जाईल. परंतु, या कायद्याविषयी सध्या मोठ्या प्रमाणात संभ्रमनिर्मिती नक्षली संघटनांकडून सुरु आहे. त्यानिमित्ताने या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी आणि कायद्याविरोधातील अपप्रचाराचे षड्यंत्र, याविषयी ‘विवेक विचार ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121