नवी दिल्ली: ( Narendra Modi on Man Ki Baat ) “भारतीय नववर्षाची सुरुवातही आजपासून होत आहे. ही ‘विक्रम संवत २०८२’ची सुरुवात असून गुढीपाडव्याचा दिवस हा खूप पवित्र आहे. हे सण आपल्याला भारतातील विविधतेतील एकतेची अनुभूती देतात,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दरम्यान, त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन कामे दिली आहेत. तेे म्हणाले की, “या उन्हाळ्यात तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचे असून ते ’माय हॉलिडे’सह सोशल मीडियावर पोस्ट करायचे आहे,” असा टास्क दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, दि. ३० मार्च रोजी ’मन की बात’च्या १२० व्या भागात हिंदू नववर्षाचा उल्लेख केला. तसेच, देशवासीयांना चैत्र नवरात्र, गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
“आज कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणमध्ये उगादीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जात आहे. आपल्या विविधतेने नटलेल्या देशात, येत्या काही दिवसांत आसाममध्ये ’रोंगाली बिहू’, बंगालमध्ये ’पोईला बैशाख’ आणि काश्मीरमध्ये ’नवरेह’ साजरे करतील. आपले हे सण वेगवेगळ्या प्रदेशात असू शकतात. परंतु, तेnभारताच्या विविधतेमध्ये एकता कशी विणली गेली आहे, हे दर्शवितात. आपल्याला ही एकतेची भावना सतत बळकट करायची आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’मध्ये ऐतिहासिक कामगिरी
“खेलो इंडिया पॅरा गेम्स’मध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन. हरियाणा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील खेळाडूंनी अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.
या स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंनी १८ राष्ट्रीय विक्रम केले. त्यांपैकी १२ विक्रम महिला खेळाडूंच्या नावावर होते. सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू जॉबी मॅथ्यूने पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांचा संघर्ष आणि दृढनिश्चय शेअर केला,” अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.
देशवासीयांना पाणी वाचवण्याचे आवाहन
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “उन्हाळा सुरू होताच शहरे आणि गावांमध्ये पाणी वाचवण्याची तयारी तीव्र झाली आहे. देशभरात कृत्रिम तलाव, चेक डॅम, बोअरवेल रिचार्ज आणि सामुदायिक सोकपिट बांधले जात आहेत. गेल्या सात-आठ वर्षांत टाक्या, तलाव आणि इतर जलपुनर्भरण संरचनांद्वारे ११ अब्ज घनमीटरपेक्षा जास्त पाणी वाचवण्यात आले आहे. हा आकडा भाक्रा नांगल धरणाच्या गोविंद सागर तलावाच्या पाणी क्षमतेपेक्षा (नऊ-दहा अब्ज घनमीटर) जास्त आहे. त्यामुळे पाण्याची बचत व्हायला हवी,” असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
कापड कचरा : एक गंभीर आव्हान
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “कापड कचरा ही संपूर्ण जगासाठी एक मोठी समस्या बनली आहे. संशोधनानुसार, कापडाच्या कचर्यापैकी फक्त एक टक्क्यापेक्षा कमी कचरा नवीन कपड्यांमध्ये पुनर्वापर केला जातो. भारत हा जगातील तिसरा सर्वांत मोठा कापड कचरा उत्पादक देश आहे. परंतु, अनेक स्टार्टअप्स आणि संस्था या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहेत. ते जुने कपडे पुनर्वापर करून गरजूंना देत आहेत आणि शाश्वत फॅशनला प्रोत्साहन देत आहेत.”
योग आणि आयुर्वेदाची वाढती लोकप्रियता
“जगभरात योग आणि पारंपरिक औषधांमध्ये रस वाढत आहे. ’सोमोस इंडिया’ ज्याचा स्पॅनिशमध्ये अर्थ ’आपण भारत आहोत,’ असा होतो. गेल्या दशकापासून योग आणि आयुर्वेदाचा प्रचार करत आहे. या पथकाचे लक्ष केवळ उपचारांपुरते मर्यादित नाही, तर ते शैक्षणिक कार्यक्रमांवरही भर देत आहेत,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
उन्हाळ्याच्या सुटीत काहीतरी नवीन शिका
“आज मुले नवीन प्लॅटफॉर्मवरून खूप काही शिकू शकतात. जसे कोणी तंत्रज्ञानाबद्दल शिकू शकते, तसेच कोणीतरी रंगमंच किंवा नेतृत्वगुण शिकू शकते. भाषण आणि नाटक शिकवणार्या अनेक शाळा आहेत. हे मुलांसाठी खूप उपयुक्त आहेत. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये अनेक ठिकाणी आयोजित केल्या जाणार्या स्वयंसेवी उपक्रमांमध्ये आणि सेवाकार्यात मुले सहभागी होऊ शकतात. जर कोणतीही संस्था, शाळा किंवा सामाजिक संस्था उन्हाळी उपक्रम आयोजित करत असेल, तर ते ‘माय हॉलिडेज’सोबत आमच्यासोबत शेअर करा,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
तरुणांना ‘माय भारत’बद्दल माहिती असावी
“माय भारत’च्या अभ्यास दौर्यात तुम्ही आपली जन औषधी केंद्रे कशी काम करतात, हे जाणून घेऊ शकता. ‘व्हायब्रंट व्हिलेज कॅम्पेन’चा भाग बनून तुम्ही सीमावर्ती गावांमध्ये एक अनोखा अनुभव घेऊ शकता. तुम्ही तिथल्या सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांचा नक्कीच भाग बनू शकता. त्याचवेळी, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त निघणार्या मोर्चात सहभागी होऊन तुम्ही संविधानाच्या मूल्यांबद्दल जागरूकतादेखील पसरवू शकता,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.