शिक्षणाला हिंदीत ‘शिक्षा’ असा शब्द. पण, मराठीत ‘शिक्षा’चा अर्थ अगदीच वेगळा. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस सरकारने भारतात जे शैक्षणिक धोरण राबविले, ती भारतीयांना दिलेली ‘शिक्षा’ होती. कारण, त्यात परकीय आक्रमकांचा गौरव आणि भारताच्या गौरवशाली इतिहासाचे अवमूल्यन करण्यात आले. मोदी सरकारने त्यात आमूलाग्र परिवर्तन करून खर्या भारतीय इतिहास आणि संस्कृतीला मानाचे स्थान दिले. ही गोष्ट काँग्रेस आणि तमाम डाव्या इकोसिस्टमच्या मनात सलणारी!
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले असून, त्यांच्या सरकारने भारतात शैक्षणिक क्षेत्राची जी ‘हत्या’ चालविली आहे, ती थांबविण्याचे आवाहन त्यात केले आहे. त्यांचा रोख हा प्रामुख्याने ‘शिक्षण क्षेत्रातील इतिहास’ या विषयावर. सोनिया गांधी यांनी हे पत्र लिहावे, यात काहीच नवल नाही. कारण, स्वातंत्र्यप्राप्तीपासून काँग्रेसने शैक्षणिक क्षेत्रात चुकीचा इतिहास शिकविण्याचा जो अश्लाघ्य गुन्हा केला आहे, त्यात मोदी सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाने (एनईपी) आमूलाग्र सुधारणा केली असून, भारताच्या देदीप्यमान इतिहासाला पुन्हा एकदा मानाचे स्थान दिले आहे. तसेच, प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्यास प्रारंभ करून लहान मुलांची मुळे भारतीय मातीत घट्ट रुजविली आहेत. या सार्या गोष्टी डाव्या इकोसिस्टमच्या नेत्या असलेल्या सोनिया गांधी यांना कशा रुचणार? या डाव्या इकोसिस्टमची सारी तगमग या पत्रातून व्यक्त झाली आहे.
मोदी सरकारने शिक्षण क्षेत्राची हत्या चालविली नसून, काँग्रेसने हत्या केलेल्या इतिहासाला संजीवनी मंत्राने पुनरुज्जीवित करण्याचे धोरण आखले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर खरे म्हणजे पूर्वीच्या परक्या सरकारची सारी धोरणे आणि कायदेशीर प्रणाली तत्काळ रद्द करण्याची गरज होती. आधी मुघलांनी भारतीयांच्या संपत्तीची प्रचंड लूट केली. पण, नंतर आलेल्या इंग्रजांनी भारतीयांची केवळ सांपत्तीकच लूट केली असे नव्हे, तर भारताला मानसिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही नागविले होते. 1857 सालानंतर ब्रिटिशांची सत्ता भारतात स्थिर झाली, तेव्हा भारतात ७२ हजार गुरुकुल होती आणि त्यातून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत होते. पण, मेकॉले या इंग्रज अधिकार्याने भारताचे खरे बलस्थान ही गुरुकुले आणि त्यात देण्यात येणारी शिक्षण पद्धती आहे, हे अचूक ओळखले. भारतीयांना इंग्रजांपेक्षा सांस्कृतिकदृष्ट्या कनिष्ठ किंवा हलके ठरविल्याशिवाय ब्रिटिशांची राजसत्ता स्थिर होणार नाही, हे मेकॉले याने ओळखले होते. त्यानेच गुरुकुल शिक्षापद्धती रद्द करून तेथे ब्रिटिशांची शालेय शिक्षण पद्धत लागू करण्याची सूचना केली होती. इंग्रज सरकारला आपले आदेश पाळणारे कारकून आणि गुलाम हवे होते, बुद्धिवान आणि प्रतिभाशाली भारतीय नको होते. त्यामुळे भारतात इंग्रज राजवटीची आणि आधीच्या परक्या राजवटींची भलामण करणारा इतिहास शिकविण्यात आला. विद्यार्थ्याची सर्व कल्पनाशक्ती संपुष्टात आणण्यात आली आणि त्याला चाकोरीबद्ध शिक्षण पाजण्यात आले.
दुर्दैवाची गोष्ट अशी की, याच शिक्षण पद्धतीत वाढलेल्या भारतीय नेत्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही हीच शिक्षण पद्धत चालू ठेवली आणि भारतीयांचा तेजोभंग केला. नेहरू यांच्यावर इंग्रजी जीवनशैली आणि वैचारिकतेचा प्रभाव होता. त्यांना अस्सल भारतीयत्व आणि खर्या भारतीय इतिहासाचे ज्ञान आणि प्रेमही नव्हते. म्हणूनच त्यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ आणि अन्य ग्रंथांतून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप यांसारख्या सच्च्या भारतप्रेमी योद्ध्यांना ‘वाट चुकलेले देशभक्त’ म्हटले आहे. इतिहासाबद्दल अगाध अज्ञान असलेली व्यक्तीच या महापुरुषांचे वर्णन या शब्दांत करू शकते! नेताजी सुभाषचंद्र बोस यांना तर त्यांनी ‘युद्ध गुन्हेगार’ही म्हटले आहे. नेहरूंच्या मनातील या न्यूनगंडाच्या भावनेची शिक्षा भारताच्या गेल्या तीन पिढ्यांनी भोगली आहे. कारण, त्यांच्या सरकारने देशाचे शैक्षणिक धोरण डाव्या विचारसरणीच्या आणि जिहादी मानसिकतेच्या नेत्यांच्या हाती सोपविले.
डाव्या विचारसरणीला जगात कोणतीच राष्ट्रवादी विचारसरणी मंजूर नाही. त्यामुळे डाव्या विचारसरणीच्या लोकांचे प्रत्येक देशाच्या इतिहासाबाबतचे आकलन नेहमीच चुकलेले असते. भारतासारख्या प्राचीन आणि प्रचंड वैविध्य असलेल्या देशाच्या खर्या संस्कृतीचे आकलन मार्क्सवाद्यांच्या झापडबंद बुद्धीपलीकडची गोष्ट होती. त्यांनाही अर्थातच बलशाली भारत दाखवायचाच नव्हता. अबुल कलाम आझाद यांना स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री करण्यात आले. मक्केत जन्मलेल्या कलाम या कट्टर इस्लामी मानसिकतेच्या नेत्याने इतिहासाच्या पुस्तकात मुघली सत्तेचे उदात्तीकरण केले आणि भारताला बलशाली आणि ‘सोने की चिडिया’ बनविणार्या सर्व राजा-महाराजांचा इतिहास पुस्तकातून लुप्त केला. त्यांच्यानंतरही पुढील 50 वर्षे देशाच्या शिक्षणमंत्रिपदावर मुस्लीम नेत्यांचीच नियुक्ती करण्यात आली आणि पुपुल जयकर, इरफान हबीब यांसारख्या डाव्या विचारसरणीच्या कथित इतिहासकारांना पुढे करण्यात आले. यामुळे खर्या भारताची आणि त्याच्या प्राचीन इतिहासाची खरी ओळखच पुसली गेली. आज औरंगजेबाचे जे उदात्तीकरण केले जात आहे, तो इतिहासाकडे याच सडक्या आणि विकृत दृष्टिकोनातून पाहिल्याचा परिणाम आहे.
देशाची खरी सांस्कृतिक नाळ ही सनातन धर्माशी जोडलेली आहे. पण, या धर्माकडे विकृत दृष्टीने पाहण्यात आले. जो धर्म सार्या जगाकडे एक कुटुंब म्हणून पाहतो आणि ‘सर्वे सन्तु निरामय:’ अशी प्रार्थना करतो, तो हिंसक आणि भेदाभेद करणारा कसा असू शकतो? हिंदुत्वाचा चुकीचा अर्थ हेतूत: लावण्यात आला. म्हणूनच कट्टर देशभक्त असलेल्या स्वा. सावरकरांची संभावना ‘माफीवीर’ म्हणून केली जाते आणि औरंगजेब हा महान शासक म्हणून गौरविला जातो. अस्सल जिहादी मानसिकता असलेली व्यक्तीच सनातन धर्माचा उच्छेद करण्याची भाषा करू शकतो. सोनिया गांधी यांना इतिहासाचे, त्यातही भारताच्या प्रदीर्घ इतिहासाचे इतके सखोल आणि व्यापक आकलन असण्याची शक्यताच नाही. सारे जग येशुमय करणे इतकेच ज्यांचे स्वप्न आहे, त्यांना मोदी सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणात आपल्या स्वप्नाची हत्याच होताना दिसेल.
हिंदीत शिक्षणाला ‘शिक्षा’ असे म्हणतात. मराठीत ‘शिक्षा’ शब्दाचा अर्थ अगदीच वेगळा आहे. पण, स्वातंत्र्यानंतरच्या काँग्रेस सरकारच्या मनात चुकून शिक्षा या शब्दाचा मराठी अर्थच रुतून बसला असावा, असे वाटते. कारण, स्वतंत्र भारताच्या सरकारने शैक्षणिक क्षेत्राचे जे धोरण स्वीकारले, ती भारताच्या भावी पिढ्यांना दिलेली शिक्षा होती, असे म्हणावे लागते. मोदी सरकारने लागू केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाने या विकृत आणि विपर्यस्त शिक्षणाची गाडी आता कुठे रुळावर आली आहे. सोनिया गांधी यांनी या गाडीला पुन्हा डिरेल करण्याचे आवाहन केले आहे. ते अर्थातच होणार नाही.