मुंबई: ( Minister Mangal Prabhat Lodha at inauguration ceremony of unnat marg ) निसर्गाचा समतोल राखत बृहन्मुंबई पालिकेने अतिशय प्रयत्नपूर्वक मलबार हिल येथे निसर्ग उन्नत मार्ग साकारला आहे. हे ठिकाण मुंबईकरांसह देशविदेशातील पर्यटकांसाठी एक उत्तम पर्यटनस्थळ ठरेल. हा प्रकल्प पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगानेही जनजागृतीसाठी आदर्श ठरेल.
अधिकाधिक मुंबईकरांनी या निसर्ग उन्नत मार्गाला भेट द्यावी आणि निसर्गाचा आनंद घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. मलबार हिल परिसरात निर्मित निसर्ग उन्नत मार्गाचे लोकार्पण लोढा यांच्या हस्ते रविवार, दि. ३० मार्च रोजी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, उपायुक्त शरद उघडे, उपायुक्त यतीन दळवी, जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
निसर्ग उन्नत मार्गाच्या ठिकाणी येणार्या पर्यटकांच्या अनुषंगाने सोयीसुविधांची प्रभावी अंमलबजावणी करावी. सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच, पर्यावरणीयदृष्ट्या नियमित स्वच्छतेसाठी प्राधान्य देण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. मुंबईत पर्यटकांसाठी हा एक आदर्श प्रकल्प ठरणार आहे, त्यामुळे याठिकाणी परिरक्षणाच्या अनुषंगाने विशेष काळजी घेण्याचेही निर्देश गगराणी यांनी दिले.
सिंगापूर येथे विकसित ‘ट्री टॉप वॉक’ या संकल्पनेशी साधर्म्य असलेला हा उन्नत मार्ग मुंबईत पहिल्यांदाच विकसित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे झाडांमधून मार्गिका विकसित करताना निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. दि. ३० मार्च २०२५ रोजीपासून हा उन्नत मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. दररोज पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा मार्ग खुला राहणार आहे. ऑनलाईन तिकीट नोंदणी निसर्ग उन्नत मार्ग येथे भेट देण्यासाठी संकेतस्थळाला भेट देऊन सशुल्क ऑनलाईन तिकीट काढण्याचा पर्याय आहे. भारतीय नागरिकांसाठी २५ रुपये, परदेशी नागरिकांना १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.
मार्गावर एकाच वेळी जास्त गर्दी होऊ नये, यासाठी एकावेळी २०० व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येईल. हा मार्ग पाहण्यासाठी प्रत्येकी एका तासाचे खंड (स्लॉट) करण्यात आले आहेत. पर्यटकांच्या भेटीची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी प्रवेश नियंत्रण प्रणाली विकसित करण्यात आली आहे. प्रकल्प नियंत्रण कक्षातून संपूर्ण उन्नत मार्गावर तसेच, भेट देणार्यांवर देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत विशेष मार्गाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. अधिकाधिक नागरिकांनी निसर्गाच्या कुशीतील खजिना पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.