नवी दिल्ली: ( Donald Trump warning to Iran ) अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या अणुकराराचे पालन न केल्यास इराणावर बॉम्बफेक करण्यात येईल आणि मोठ्या प्रमाणावर आयातशुल्क लादण्यात येईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
एनबीसी न्यूजला दिलेल्या टेलिफोन मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, जर इराणने करार केला नाही तर इराणवर भयानक प्रकारची बॉम्बफेक करण्यात येईल. अशी बॉम्बफेक इराणाने यापूर्वी कधीही बघितली नसेल. ट्रम्प पुढे म्हणाले की, ते काही आठवडे इराणच्या वृत्तीचे निरीक्षण करतील आणि जर त्यांना त्यात काही सकारात्मक आढळले नाही तर ते नवीन निर्बंध जाहीर करतील. त्यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात घेतलेल्या अशाच प्रकारच्या कारवाईची आठवण यावेळी करून दिली.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या इशाऱ्याला इराणने प्रत्युत्तर दिले आहे. इराणचे अध्यक्ष मंजूर पेझेश्कियान यांनी स्पष्ट केले आहे की ते अणुकराराबाबत अमेरिकेशी थेट चर्चा करणार नाहीत. त्यांनी म्हटले आहे की इराण अमेरिकेसोबत अप्रत्यक्षपणे अणुकरारासाठी वाटाघाटी करत राहील.