नवी दिल्ली : ( 50 Naxalites surrender in Chhattisgarh ) केंद्र सरकार नक्षलवाद्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाई करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद संपवण्याचा प्रण घेतला आहे. अशातच, विजापूरमध्ये रविवार, दि. ३० मार्च रोजी ५० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून हिंसाचाराचा मार्ग सोडल्याची माहिती समोर येत आहे. स्वतः गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.
अमित शाहंनी या ५० नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाच्या निर्णयाचे स्वागत केले असून, “या सर्वांचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेतले जाईल,” असे सांगितले. तसेच, सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि “दि. ३१ नमार्च २०२६ रोजीनंतर देशात नक्षलवाद इतिहासजमा होईल,” असे ठणकावून सांगितले. ५० नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाची माहिती देताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “विजापूर (छत्तीसगढ) येथे ५० नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केले, ही आनंदाची बाब आहे. त्यांनी हिंसा आणि शस्त्रे सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला, त्याचे मी स्वागत करतो.
जो नक्षलवादी शस्त्र सोडून विकासाचा मार्ग पत्करेल, त्याचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात जोडले जाईल, असे पंतप्रधान मोदींचे धोरण स्पष्ट आहे.” पोलीस अधिकार्याने सांगितले की, “छत्तीसगढमधील विजापूर जिल्ह्यातील ५० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
त्यांपैकी १४ जणांवर एकूण ६८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्या सर्वांनी राज्य पोलीस आणि ‘केंद्रीय राखीव पोलीस दला’च्या (सीआरपीएफ) वरिष्ठ अधिकार्यांसमोर आपले शस्त्र ठेवले. नक्षलवाद्यांना आंदोलन सोडून मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी सरकारच्या धोरणानुसार त्यांचे पुनर्वसन केले जाईल.