गोवा म्हणजे केवळ रम्य समुद्रकिनारे, असा बहुतांशी पर्यटकांचा समज. पण, या गोमंतकीय भूमीत निसर्गसौंदर्याबरोबरच प्रेक्षणीय मंदिरेही तितकीच भुरळ घालणारी. अशाच मंदिरांपैकी एक म्हणजे तांबडी सुर्ला येथील महादेव मंदिर. तेव्हा आजच्या हिंदू नववर्षारंभानिमित्ताने अशाच भारताच्या कानाकोपर्यातील ज्ञात-अज्ञात मंदिरांच्या दर्शनाचा संकल्प करुया आणि आज या महादेव मंदिराविषयी माहिती जाणून घेऊया...
गोवा हे आज प्रसिद्ध समुद्रकिनारे, सुशोभित चर्च आणि पर्यटकांसाठी एक आकर्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. परंतु, गोव्याचा इतिहास केवळ पोर्तुगीज काळापुरता सीमित नाही, तर तो हजारो वर्षे प्राचीन आहे. गोव्याचा उल्लेख प्राचीन भारतीय ग्रंथांमध्येदेखील आढळतो. महाभारतात गोव्याचा उल्लेख ‘गोपराष्ट्र’ किंवा ‘गोमेन्तक’ नावाने केला गेला आहे. ‘स्कंदपुराण’ आणि ‘हरिवंशपुराण’ त्याच बरोबर महाभारताच्या भीष्म पर्वातदेखील या प्रदेशाचा उल्लेख असून, गोमंतक म्हणजे गोमाता वसते, ज्या भूमीवर असा अर्थ दिला जातो. ‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी’ आणि ‘प्लिनी’च्या ग्रंथांमध्येही गोव्याचा उल्लेख एक महत्त्वाचे बंदर म्हणून झाला आहे. यावरून असे स्पष्ट होते की, गोव्याची संस्कृती आणि व्यापारप्रथा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. अनेक कथांमध्ये परशुरामाचा आणि गोव्याच्या निर्मितीचादेखील जवळचा संबंध सांगितला आहे.
प्राचीन गोवा हे भोज, कोकणातले मौर्य, बदामीचे चालुक्य, शिलाहार आणि कदंब या विविध राजवटींच्या अधिपत्याखाली होते. विशेषतः कदंब राजघराण्याने येथे अनेक भव्य मंदिरांची निर्मिती केली. इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकापासून ते अगदी इसवी सनाच्या चौदाव्या शतकापर्यंत एवढा प्रचंड काळ कदंबांचे अस्तित्व इतिहासाच्या काळपडद्यावरती होते. पण, समुद्राच्या भरती-ओहोटीप्रमाणे यांच्यासुद्धा अस्तित्वाचे महत्त्व या काळात कमी जास्त होत राहिले. यांचा सगळ्यात भरभराटीचा काळ म्हणजे दहावे ते चौदावे शतक. कदंब राजांनी या काळात अनेक सुंदर मंदिरांची निर्मिती केली. कदंब राजकन्यांशी आपला विवाह झालेला आहे, याचा अभिमान कल्याणीच्या चालुक्यानेदेखील वाटत होता. या गौरवशाली राजघराण्याच्या कालखंडात शिक्षण, साहित्य आणि व्यापार यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले गेले. कदंब राजघराण्याचा विस्तार हा गोवा, कर्नाटक, महाराष्ट्राचा काही भाग, तसेच आमचे आडनाव ज्या गावावरून आहे, त्या बंकापुर गावामध्येदेखील यांचे अस्तित्व होते. त्या ठिकाणी तर यांचा सैनिकी तळदेखील होता. या राजघराण्याच्या उत्पत्ती संदर्भात एक छान कथा येते. महादेवाच्या कपाळावरून एक थेंब कदंब वृक्षाच्या मुळापाशी पडला आणि त्यातूनच या कुलाची उत्पत्ती झाली. ‘मयूरशर्मा’ हा पहिल्या काही राजांमधला अत्यंत महत्त्वाचा राजा होता. वर उल्लेख केल्याप्रमाणे, या राजवटीच्या काळामध्ये अनेक सुंदर मंदिरांची निर्मिती गोव्याच्या भूमीत झाली. पण, इसवी सन 1372 पासून ते अगदी सोळाव्या-सतराव्या शतकापर्यंत उत्तरेतील मुस्लीम आक्रमक आणि परदेशातून आलेले पोर्तुगीज आक्रमक यांनी गोव्याच्या भूमीतली 566 मंदिरे उद्ध्वस्त केली. यातलेच एक शिल्लक राहिलेले अतिशय सुंदर मंदिर म्हणजेच तांबडी सुर्ला इथले महादेव मंदिर.
चहुबाजूंनी असलेले घनदाट जंगल, हिरव्या रंगाच्या अनंत छटा, समोरून वाहणारी सुंदर नदी, पक्षांचा सतत येत राहणारा किलबिलाट, अशा अद्भुत वातावरणामध्ये या मंदिराची रचना केलेली आहे. महादेवाला अर्पण केलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून, स्थानिक लोकांच्या मतानुसार सूर्याची पहिली किरणे याच पिंडीवरती पडतात. सर्वात समोरच्या बाजूला मंदिराचा मुखमंडप आहे. पूर्व, उत्तर आणि दक्षिण अशा तिन्ही बाजूंनी आत येण्यासाठी प्रवेशद्वारे तयार केली आहेत. दहा खांबांनी या मुखमंडपाचा भार तोडून धरलेला दिसतो. या खांबांच्या मधल्या भागांवर पाना-फुलांचे सुंदर नक्षीकाम केलेले दिसते. इथल्या छताची रचना उतरत्या कौलांच्या रचने सारखी केलेली आहे. कदाचित त्या भागामध्ये पडणारा प्रचंड पाऊस हे अशा पद्धतीच्या रचनेपाठीमागचे कारण असावे. या मुख्य मंडपाच्या मध्यभागी जे चार खांब आहेत, त्यांचे स्तंभशीर्ष म्हणजेच सर्वात वरचा भाग हा मकरतोरण, व्याल (कोम्पॉसिट अनिमल्स) आणि कीर्तीमुख यांनी सजवलेला दिसतो. स्तंभाच्या याच भागांवरती मंदिराच्या छताचे वजन पेलले जाते.
या मुखमंडपामध्ये दक्षिण आणि उत्तर बाजूंना भिंतींमध्ये देवकोष्ठ आहेत. या देवाकोष्ठ चौकटीला असणारे छोटेसे खांबदेखील मधल्या मोठ्या खांबांची छोटीशी प्रतिकृती म्हणून तयार केलेले आहेत. डावीकडच्या देवाकोष्ठ रचनेमध्ये विष्णुची अतिशय सुंदर मूर्ती आहे. दुर्दैवाने मूर्तीचे हात जरी तुटले असले, तरी सुदर्शन चक्र आणि पांचजन्य शंख हे आपल्याला ओळखता येतात. हार, केयुर, किरीटमुकुट आणि वैजयंतीमाला असलेला हा विष्णु आपले लक्ष वेधून घेतो. याच्याच पायाशी हात जोडून बसलेला गरुडदेखील मनुष्य रूपात कोरलेला आहे. याच्या समोरच्या देवकोष्ठमध्ये गणपतीचे शिल्प दिसते. चतुर्हस्त गणपतीच्या हातामध्ये परशू आणि मोदक पात्र कोरलेले आहे. या गणपतीचे दोन्ही हात आणि पोटाचा काही भाग हा क्षतीग्रस्त (भग्न झालेला) आहे. पण, तरीही पोटाभोवती गुंडाळलेला नाग इथे स्पष्ट दिसतो. या मुखमंडपातून आत गेल्यावर गर्भगृहामध्ये शंकराच्या पिंडीची प्रतिष्ठापना केलेली आहे.
या महादेव मंदिराच्या बाह्य भिंतीवर ब्रह्मदेव, भैरव, नटराज, उमासहित शिव, विष्णु, शिवपार्वती अशी उत्तम उत्तम शिल्प कोरलेली आहेत. मंदिराचे एकंदरीत स्थापत्य आणि मूर्ती यांचा अभ्यास केल्यावर कदंब शैलीतल्या मंदिरावर थोडाफार चालुक्य शैलीचादेखील प्रभाव आपल्याला जाणवतो. आकाराने तसे छोटे असलेले हे मंदिर हे गोव्याच्या धार्मिक आणि राजकीय इतिहासामध्ये मात्र खूप मोठे स्थान निर्माण करून उभे आहे. तांबडी सुर्ला येथील महादेव मंदिराबरोबरच गोव्यामध्ये अरवली इथल्या लेणी, उसगलीमल या गावातली कातळखोदशिल्प, छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केलेले सप्तकोटेश्वर मंदिर, पणजीमधले राज्य सरकारचे संग्रहालय, अशा अनेक आकर्षक आणि महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला गोव्यात दिसतात. या लेखामध्ये मंदिराचे जे फोटो आहेत, ते मुंबईचे चित्रकार ओंकार जोशी यांनी काढलेले आहेत.
मोठमोठाले समुद्रकिनारे, अनंत छोटी-मोठी हॉटेल्स आणि इतर अनेक चालणार्या गोष्टी यांच्या पलीकडचा हा अतिशय सुसंस्कृत आणि हिंदू धर्माची नाळ जोडून ठेवलेला गोवा प्रत्येकाने तरी एकदा अनुभवावा असा आहे.
इंद्रनील बंकापुरे
7841934774
heritagevirasat@gmail.com