नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर येथील रामभक्त. साक्षात्कारी संत दास जनजसवंत हे गोस्वामी तुलसीदासांचे पट्ट शिष्य होते. त्यांची अनेक हिंदी-मराठी पदे उपलब्ध आहेत. संतचरित्रकार महिपतींनी, जनजसवंत यांचे चरित्र वर्णिलेले आहेत. तरी पण महाराष्ट्रीय रामभक्तांच्या परंपरेत त्यांचे नाव दुर्लक्षितच राहिले. इ.स.1617 मध्ये खानदेशातील बोरठे येथे, राममंदिर परिसरात त्यांनी समाधी घेतली. अशा अपरिचित थोर रामभक्ताच्या कार्यकतर्र्ृत्त्वाचा घेतलेला मागोवा...
महाराष्ट्रात रामभक्त संत आणि उपासकांची प्रदीर्घ परंपरा आहे. ‘सेतुबंध’ लिहिणारा राजा प्रवरसेन, ‘भावार्थ रामायण’कर्ते ‘संत एकनाथ’, ‘द्विकांडी रामायण’ लिहिणारे ‘संत रामदास’, ‘रामविजय’चे रचनाकार संतकवी श्रीधर, ‘संकेत रामायण’कर्ते वेण्णाबाई शिष्य गिरीधर, ‘संक्षेप रामायण’कार संत एकनाथांचे नातू पंडितकवी मुक्तेश्वर, एकशे आठ रामायणे रचणारे कवीवर्य मोरोपंत, ‘गीतरामायण’कार ग.दि.माडगूळकर, ‘महाराष्ट्र रामायण’ काव्यकर्ते आनंद साधले अशा अनेकांनी, महाराष्ट्रातील रामकथाकारांची परंपरा संपन्न केलेली आहे. पण या रामभक्त संतकवीच्या परंपरेतील नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर (सटाणा) येथे 16व्या शतकात होऊन गेलेले संत ‘दास जनजसवंत’ यांच्याकडे मात्र, अभ्यासकांचे दुर्लक्ष झालेले आहे. ‘रामचरित मानस’कर्ते महान संत गोस्वामी तुलसीदास यांचे शिष्य असलेले, ‘दास जनजसवंत’ थोर रामोपासक व साक्षात्कारी संत होते.
सीताराम चरित अतिपावन ।
मधुर सरस अरू अति मनभावन ॥
‘रामचरित मानस’ लिहून ज्यांनी रामोपासनेचा, रामभक्तीचा उत्तर भारतात जागर केला, त्या गोस्वामी तुलसीदास (इ.स.1511 ते 1623) यांचा शिष्यवर्ग खूपच मोठा होता. भारताच्या अनेक भागातून काशीत आलेले भक्तभाविक, संत, भक्त गोस्वामींच्या ‘रामचरित मानस’ने प्रभावित होऊन त्यांचे शिष्य झाले होते. आपल्या पैठणचे संत एकनाथ महाराजही काशीत गेले असताना, तेव्हा त्यांना गोस्वामी तुलसीदासांचा सत्संग लाभला होता. त्या प्रेरणेतूनच पुढे संत एकनाथांनी, ‘भावार्थ रामायण’ लिहिले आहे. 16व्या शतकाच्या या उत्तरार्धात आपल्या नाशिक जिल्ह्यातील ‘बागलाण’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भागातील, एक रामभक्त काशीला गेला आणि त्याला चक्क गोस्वामी तुलसीदासांचे शिष्य होण्याचे भाग्य लाभले. तो भाग्यवान शिष्य म्हणजे ‘दास जनजसवंत’ होय !
महाराष्ट्रातील बहुसंख्यांना रामभक्त ‘दास जनजसवंत’ची ओळख नसली, तरी संतांना संत ओळखतात. थोर संतचरित्रकार, संतकवी महिपतीमहाराज यांनी ‘भक्त लीलामृत’ मध्ये ‘जनजसवंत’ यांचे ओवीबद्ध चरित्र वर्णिलेले आहे. तसेच ‘भक्तविजय’मध्येही समाविष्ट आहे. विद्यावाचस्पती अभ्यंकर यांच्या भक्तीकोशातही या रामभक्ताची माहिती आहे.
रामभक्त जनजसवंत हे आपल्या नावापुढे ‘दास’ विशेषण मोठ्या अभिमानाने लावतात. संत तुलसीदास यांच्या परंपरेतील शिष्यांमध्ये, ‘दास’ विशेषणाने स्वतःचा उल्लेख करण्याची एक परंपराच आहे. दास जनजसवंत याचा जन्म नेमका कोणत्या तिथीमितीला झाला, ती माहिती साधार उपलब्ध नाही. पण, समाधीची तिथी वर्ष उपलब्ध आहे. गुरू गोस्वामी तुलसीदासांनी आज्ञा केल्यावर, अनेक वर्षाच्या काशीतील वास्तव्यानंतर जनजसवंत महाराष्ट्र देशी स्वगृही परतले. त्यानंतर 9 वर्षाचा काळ ते मुल्हेर भागात आणि खानदेशातील ‘बोरठे’ येथे होते. शके 1539 फाल्गुन शुक्ल अष्टमी (इ.स.1617) रोजी,‘दास जनजसवंत’ यांनी श्रीराम चरणी आपला देह समर्पित करून समाधी घेतली. ‘दास जनजसवंत’ यांची अनेक हिंदी पदे व काही मराठी भक्ती रचनाही उपलब्ध आहेत. शेवटी संतांच्या चरित्रापेक्षाही, त्यांचा उपदेशात्मक अभंग अक्षर ठेवा हाच प्रेरणा व प्रबोध देणारा असतो. दास जनजसवंतांची एक रामभक्तीचे दर्शन असलेली हिंदी रचना पाहा -
कोई बंदो, कोई निंदो कैसो कहो रे ।
‘रघुनाथ’ साथे प्रीत बाँधी, होय जैसा होय रे ॥
रघुनाथाची भक्ती महत्त्वाची. त्यापुढे निंदा-स्तुतीचा विचार कोण करतो. जगाच्या स्तुती-निंदेची पर्वा न करता, विठ्ठलभक्ती करणार्या संत तुकारामादि संतांचे असेच उद्गार, आपण त्यांच्या अभंगातूनही पाहू शकतो.
गुरू तुलसीदासांचा पट्ट शिष्य
जनजसवंत हे मुल्हेरच्या राजा प्रतापशहा याचे राज पुरोहित पंडित जनार्दनपंत यांचे सुपुत्र. तत्कालीन प्रथेप्रमाणे 10व्या वर्षीच त्यांचा विवाह झाला. लहानपणापासून संतसेवेची, सत्संगाची त्यांना उपजतच आवड होती. दोन साधुंनी त्यांना संतुष्ट होऊन ‘श्रीराम-लक्ष्मण’ रूपात दर्शन दिले होेते. जनजसवंत यांनी नाशिक पंचवटीत, अनेक वर्षे तपश्चर्या केली. तेव्हा त्यांना रामाचा साक्षात्कार झाला आणि काशीला गोस्वामी तुलसीदासांकडे जाण्याचा आदेश मिळाला. काशीला असाच रामदृष्टांत तुलसीदासजींनाही झाला. जनजसवंतला पाहताच तुलसीदासांनी शिष्य म्हणून अनुग्रहही दिला. पुढे तो तुलसीदासांचा पट्ट शिष्य झाला. गुरू तुलसीदासांसमवेत, त्याला तीर्थयात्रांचाही योग लाभला. मथुरा, वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णाने दास जनजसवंतचा भक्तीभाव व प्रार्थना ऐकून, गुरू तुलसीदास व जनजसवंत यांना चक्क धनुर्धारी राम रूपात दर्शन दिले.
मोर मुकुट नीचे धरो । किरिट मुकुट धरो शीस ।
धनुक बाण कर मो धरो । गुरू तुलसी नमावत शीस ।
भक्तांची ही अद्वैतभक्ती व अधिकार पाहून, तुलसीदास संतुष्ट झाले. त्यानंतर काही वर्षांनी तुलसीदासांनी आपल्या गळ्यातील माळ व हनुमानाची मूर्ती देऊन, जनजसवंतला मूळ गावी महाराष्ट्रात जाऊन, पुढील जीवन रामभक्ती सेवेत व्यतीत करण्याची आज्ञा केली.
जनजसवंत मुल्हेर (नाशिक) येथे परत आले. त्यांना अनेक शिष्य लाभले. त्यांना विष्णुदास नावाचा एक पुत्र होता. मुल्हेरच्या राजाने त्यांना दरबारात बोलवून, त्यांचा सत्कार-सन्मान केला आणि राजस्तुतीपर गौरव काव्य करण्याची राजाज्ञा केली. पण, रामभक्त असलेल्या दास जनजसवंत यांनी, ‘मी रामाशिवाय कोण्या माणसाची स्तुती करीत नाही’ असे बाणेदार उत्तर दिले. त्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. अखेर बंदीवासातून मुक्त होताच त्यांनी, मुल्हेरचा त्याग केला. ते खानदेशातील ‘बोरठे’ येथे गेले. तेथे भाविकभक्तांना त्यांच्यासाठी राममंदिर बाधून दिले. पुढे या मंदिर परिसरातच त्यांनी समाधी घेतली.
चंद्र, सूर्य जीनी ज्योत, स्तम्भ बिन आकाश रे ।
जलऊ पर पाषाण तारे क्यू न तारे दास रे ॥
जपत शिव सनकादि मुनिजन, नारदादिक संत रे ।
जन्म जन्म के स्वामी रघुपती दास जनजसवंत रे ॥
(पुढील लेखात : आमुचा राम राम घ्या । लेखमालेचा समारोप लेख)