पालघर : जिल्ह्यातील सातपाटी गावातील संस्कृती कलादर्पण संस्था आणि समस्त सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके १९४७,विक्रमसंवत २०८१ रविवार दिनांक ३ मार्च २०२५ रोजी रोजी हिंदू नव वर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले . संस्कृती कलादर्पण संस्था, सातपाटी वर्षभर गावात अनेक शैक्षणिक ,सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असते.जसे ..२६ जानेवारी विद्यार्थी कवायत संचलन - जागर प्रजासत्ताक दिनाचा,तिथीनुसार शिवजन्मोत्सव,हिंदू नववर्ष शोभायात्रा ,हुतात्मा दिन - वक्तृत्व स्पर्धा,दिवाळी पहाट - सूर संस्कृतीचे, नारळी पौर्णिमा- सण मौजेचा,१० वी च्या विद्यार्थ्यांसाठी - पेपरवर बोलू काही,जागतिक मच्छीमार दिन....
संस्कृती जतन आणि संवर्धनाचा धागा मजबूत करून सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमातून भावी संस्कारक्षम,विविध कला निपुण विद्यार्थी घडविण्याच्या आणि गावातील स्थानिक कलाकारांना वाव देण्याचा प्रयत्न संस्थेकडून अनेक वर्षांपासून सुरू आहे.
या गुढीपाडवा स्वागतयात्रेची सुरुवात गावातील नवं दाम्पत्याच्या शुभहस्ते श्री राम मंदिर सातपाटी आणि शिव स्मारक सातपाटी येथे गुढी उभारुन झाली. या कार्यक्रमात स्थानिक महिला लेझिम पथकाच्या वतीने लेझिम च्या तालावर मराठमोळी संस्कृतीचे सादरीकरण केले.या सादरीकरणात राजमाता जिजाऊ ,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,येसूबाई ,ताराबाई अशा व्यक्तिरेखा साकारण्यात आल्या.सागर नृत्य पथक सातपाटी च्या कलाकारांनी छत्रपती शिवराय आणि मावळे अशी व्यक्तिरेखा साकारली.युवा पोवाडा गायक कलाकाराला संधी देऊन युवा शक्तीला प्रोत्साहन देण्यात आले.या कार्यक्रमाची रंजकता वाढवली ती सातपाटीचा शाहीर कु. प्रणीश नितीन बुरोंडकर यांच्या गायनाने.त्यांनी चमके शिवबाची तलवार ही शिवस्तुती गीत आणि पन्हाळ गड वेढा असताना शिवा काशिदांचे बलिदान , बाजीप्रभूंनी लढविलेली घोडखिंड , अफजल खानचा वध करून शिवरायांनी प्रतापगडावर केलेला पराक्रम या पोवाड्यातून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.जणू काही प्रत्यक्ष समोर प्रसंग घडत असल्याचे वातावरण तयार झाले आणि श्रोते अंतःकरणात अभिमान ,डोळ्यात आसू आणून टाळ्या वाजवत दाद देत होते.
युवक ,युवती,महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. संपूर्ण गावभर फिरणाऱ्या या शोभायात्रेत आयोजक संस्कृती कलादर्पण संस्थेच्या वतीने संस्कृतीचा धागा मजबूत करून परंपरेची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने अनुभवण्यास मिळाले. या स्वागतयात्रेकरिता गावातील स्थानिक शासन संस्था ,सहकारी संस्था ,विविध समाज संघ,आणि दानशूर व्यक्तींचे मोलाचे सहकार्य लाभले. आज खऱ्या अर्थाने स्थानिक युवांना संधी देऊन संस्थेने युवा संघटन आणि महिला बळकटीकरणाचे उत्तम उदाहरण मांडले आणि एकात्मतेचा गुढीपाडवा साजरा झाला..