मुंबई (विशेष प्रतिनिधी) - वन विभागाने मानद वन्यजीव रक्षक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे (hon. wildlife warden appointment). प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव यांनी जारी केलेल्या पत्रामध्ये ७ एप्रिलपर्यंत इच्छुक उमेदवारांनी जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) किंवा उपवनसंरक्षक यांच्याकडे अर्ज दाखल करायचे आहे (hon. wildlife warden appointment). गेली वर्षानुवर्षे या पदावर ठिय्या मांडून बसलेल्या लोकांना यंदा वन विभागाकडून घरचा रस्ता दाखवण्यात येणार असून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. (hon. wildlife warden appointment)
वन्यजीव व वनांच्या रक्षणासाठी मदत व्हावी यासाठी राज्य सरकारकडून जिल्ह्य़ाजिल्ह्य़ांत सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांची मानद वन्यजीव रक्षक (ऑनररी वाइल्डलाइफ वॉर्डन) म्हणून नियुक्ती केली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत या पदांवर काही निष्क्रीय लोकांची नियुक्ती केल्याने वन्यजीवांचे प्रश्न सरकार दरबारी सक्रियपणे मांडले जात नव्हते. त्यामुळे वन विभागाच्या वन्यजीव कक्षाने पुन्हा एकदा मानद वन्यजीव रक्षक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. या पदांच्या नियुक्तीसाठी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव एम. श्रीनिवासा राव यांनी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) किंवा उपवनसंरक्षक यांना पत्र जारी केले आहे.
या पत्रानुसार मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) किंवा उपवनसंरक्षकांना १ एप्रिल रोजी वृत्तस्तरावर मानद वन्यजीव रक्षक पदासंदर्भात जाहिरात प्रसिध्द करायची आहे. ७ एप्रिलपर्यंत संबंधित वनवृत्त कार्यालयाचे ई-मेल आयडीवर अर्ज स्विकारायचे आहेत. ८ ते १५ एप्रिल या कालावधीत मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) किंवा उपवनसंरक्षक यांचेमार्फत प्राप्त अर्जाची छाननी ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेला अनुसरुन करुन योग्य उमेदवाराची पॅनल तयार करुन ते प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना सादर करायचे आहे. १५ ते २० एप्रिल या कालावधीत प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयात वृत्तस्तरावरुन प्राप्त पॅनलपैकी प्रत्येक जिल्हयासाठी आवश्यक उमेदवार निश्चत करुन त्यांची अंतिम यादी तयार करण्यात येईल. २१ ते ३० एप्रिलपर्यंत हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर राज्य वन्यजीव मंडळामार्फत त्याला परवानगी मिळेल. यासंदर्भात एक वरिष्ठ वन अधिकाऱ्याने सांगितले की, "मानद वन्यजीव रक्षकांकडून आम्हाला वन्यजीव गुन्हे, त्यासंदर्भातील प्रश्न याची माहिती मिळण्याची अपेक्षा असते. मात्र, गेली कित्येक वर्ष काही मानद वन्यजीव रक्षक या पदावर केवळ निष्क्रीयपणे बसून आहेत. त्यामुळे आम्ही यंदा नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहोत."