...तरच नाटक आणि प्रेक्षकांच्या गणिताची बरोबरी हाऊसफुल ठरेल : सुयश टिळक

    29-Mar-2025   
Total Views | 10
talk with actor suyash tilak


नुकत्याच संपन्न झालेल्या ‘जागतिक रंगभूमी दिना’चे औचित्य साधत, अभिनेता सुयश टिळकशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने विशेष संवाद साधला. अभिनयाच्या प्रवासात रंगभूमीचे योगदान, आणि नाट्यसृष्टीतील स्थित्यंतरे याविषयी आणि सुयशशी केलेली ही दिलखुलास बातचीत...

रंगभूमीसाठी जगणार्‍या आणि रंगभूमीला जगवणार्‍या कलाकारांच्या योगदानाचा गौरव करणारा ‘जागतिक रंगभूमी दिन’ नुकताच संपन्न झाला. त्यानिमित्ताने रंगभूमीच्या आठवणींविषयी सांगताना सुयश म्हणतो की, “माझ्या अभिनयाची सुरुवात नाटकापासूनच झाली. शाळेतल्या स्नेहसंमेलनात नाटकं बसवली जायची. मी एका अर्थी स्वतःला भाग्यवान समजेन; माझ्या आयुष्यात मी साकारलेली पहिली भूमिका ही आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची होती. त्यावेळी मी चौथीला होतो. तुम्ही कसं बोलता, तुमचा आवाज कसा आहे, आवाजातला चढउतार, शब्दफेक हे सगळं मला माझ्या शाळेतल्या गुरूंनी शिकवलं. त्या नाटकाचा एकच प्रयोग होता; पण नाटकाच्या निर्मितीपासून ते नाटक संपल्यानंतर पडदा पडतो इथवरचा जो काही अनुभव होता, तो मनात खोलवर बसलाय. त्यामुळे ते कधीच विसरता येणार नाही. माझ्या आयुष्यातल्या अभिनयाची सुरुवात अथवा पहिलं नाटक असं कोणी विचारलं, तर डोळ्यांसमोर पटकन उभा राहणारा प्रसंग म्हणजे हे नाटक ’जाणता राजा.”

बर्‍याचदा लहानपणापासून रंगभूमीशी जोडली गेलेली नाळ ही इतकी अतूट असते की, तिच्यासमोर तुमच्या आयुष्यात आलेले कठीण प्रसंगदेखील तुम्हाला आणि रंगभूमीला वेगळं करू शकत नाहीत. तीच रंगभूमी तुमची आई कधी बनून जाते, हे कळतच नाही. याबाबत सुयशने एक प्रसंग सांगितला. तो म्हणाला, “मालिका, चित्रपट आणि नाटक यांमध्ये सगळ्यात जास्त मला काय आवडत असेल, ते म्हणजे नाटक. मुळातच माझी दुसरी शाळा आहे ती! तिथेच सगळं काही शिकलो. मोठा झालो. माझी पहिली मालिका ‘अमर प्रेम.’ मी त्या मालिकेसाठी ऑडिशनसुद्धा रंगभूमीवरच दिली होती. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे, मालिकेची सुरुवातसुद्धा रंगभूमीपासून झाली आणि आत्ताही मला जेव्हा वाटतं की, आत्ता नाटक करायचं आहे, तेव्हा मी ते करतो. कारण, मला नाही राहता येत नाटकाशिवाय. नाटकापासून लांब राहणं म्हणजे स्वतःच्या घरापासून लांब राहिल्यासारखं वाटतं, पण जेव्हा नाटक करायला रंगभूमीवर उभा राहतो ना, तेव्हा आईने कुशीत घेतल्यासारखं वाटतं.”

दर्दी नाट्यकर्मी आजही असले, तरी नाटकांकडे वळणारा प्रेक्षकवर्ग घटल्याचेही दिसते. याविषयी सुयशला विचारले असता, तो म्हणतो की, “पूर्वी नाटक पाहणं म्हणजे एक सोहळा असायचा. संपूर्ण कुटुंबासह नाटक बघणं म्हणजे सुख होतं. त्यावेळी तसा ’माहोल’ बनायचा. तीन तास लोकं वेळ काढून नाटक बघायचे, हे सगळं आत्ता सरत चाललंय, असं वाटतं. व्यावसायिक नाटकांमध्ये कुठेतरी प्रेक्षकवर्ग कमी होताना दिसतो. पूर्वी नाटकाचा जो प्रेक्षकवर्ग होता, तो आता ओटीटी, मल्टिप्लेक्सकडे वळताना दिसतोय आणि कुठेतरी असं वाटतं की, आपली नाट्यगृहे अजूनही तितकीशी आकर्षक नाहीत. नाट्यगृहांत बर्‍याच सुविधांचा तुटवडा दिसून येतो. नाट्यगृहांची डागडुजी व्यवस्थित नसल्याने प्रेक्षकांची संख्या कमी झाली आहे. हे सगळंच दुरुस्त करणं गरजेचं आहे, तरच नाटक आणि प्रेक्षक यांच्या गणिताची बरोबरी हाऊसफुल ठरेल.”



अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
अग्रलेख
जरुर वाचा
बिहारमधील गोपाळगंजमधील घटना, ईदच्या रात्री युवतीचा मृत्यू?

बिहारमधील गोपाळगंजमधील घटना, ईदच्या रात्री युवतीचा मृत्यू?

बिहारमधील गोपालगंजमधील एका युवतीचे धड झाडाला टांगण्यात आले होते. यावेळी युवतीच्या निकटवर्तीयांनी आरोप केला की, गावातील युवकांनी मिळूनच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिची हत्या करण्यात आली. पीडितेने आत्महत्या केली असावी असा समज निर्माण व्हावा यासाठी तिला एका झाडाला टांगण्यात आले होते. संबंधित प्रकरण हे मांझागड ठाणे क्षेत्रातील आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत युवतीची हत्या करणाऱ्या प्रियकराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांनी घडलेल्या घटनेप्रसंगी अनेक तपास करण्यात आले आहेत. या तपासातून संबंधि..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121