भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या लोकसंस्कृतीच्या भव्यतेचं प्रदर्शन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आयोजित करण्यात आले आहे. दि. 24 मार्च रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात कुंभार व कारागीर ‘पद्मश्री’ ब्रह्मदेव राम पंडित यांच्या हस्ते संपन्न आले. त्यानिमित्ताने लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणार्या या प्रदर्शनाचा आढावा घेणारा हा लेख.
भारताची सांस्कृतिक विविधता हे भारताचे खरे वैभव. आपल्या या सांस्कृतिक वैविध्याचे रंग या देशाला सर्वस्वी समृद्ध करतात. जागतिकीकरणाच्या रेट्यात आपल्या जीवनशैलीमध्ये जरी एकसुरीपणा आला असला, तरीसुद्धा या विविधतेचं प्रदर्शन वेळोवेळी आपल्या सणउत्सवांच्या माध्यमातून उमटत असतं. या विविधतेचा तळ शोधताना असे लक्षात येते की, या सगळ्या सणवारांच्या मुळाशी आहे, ती आपली लोकसंस्कृती. या लोकसंस्कृतीच्या माध्यमातून आपल्यासमोर मानवी इतिहासाचा एक भव्य पटच उभा राहतो. यामध्ये कधी मौखिक परंपरेतून आलेली गाणी असतात, तर कधी एका अद्भुत ऊर्जेतून निर्माण झालेले चित्रशिल्प. लोकजीवनातील हा समृद्ध वारसा जतन करावा, याबद्दल बोलणारे हजारोंनी आहेत. पण, या संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी प्रत्यक्षात कार्यरत माणसे तुरळकच. तरीसुद्धा याबाबतीत परिस्थिती एकदमच निराशाजनक वगैरे आहे, असे अजिबात नाही. या दाव्याला आधार आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय येथे रंगलेलं एक आगळं-वेगळं प्रदर्शन...
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय म्हणजे इतिहास जिवंत करणारी वास्तू आहे, याची प्रचिती आपल्याला इथे भेट देताना येतेच. परंतु, इथे कार्यरत माणसं, शिकणारे विद्यार्थी हेसुद्धा इतिहासाच्या संवर्धनासाठी तितकेच कटिबद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ‘संग्रहालयशास्त्र’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी ’मेटामॉर्फोसिस’ या आगळ्या-वेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. ’मेटामॉर्फोसिस’ अर्थात ’परंपरा : कला, कलाकार आणि परंपरा’ ही संकल्पना नजरेसमोर ठेवून, या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारताचा वैविध्यपूर्ण आणि वैभवशाली वारसा उलगडण्यात आला आहे. दि. 24 मार्च रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात कुंभार व कारागीर ‘पद्मश्री’ ब्रह्मदेव राम पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. ‘संग्रहालयशास्त्र’ या विषयाचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांनी देशाच्या विविध भागांत आपआपल्या लोकसंस्कृतीसाठी कार्यरत असणार्या कलाकारांचा मौलिक ऐवज लोकांसमोर सादर केला आहे. प्रदर्शनात लोकांसमोर मांडलेला हा ठेवा सर्वस्वी थक्क करणारा आहे. 30 पेक्षा जास्त कलावस्तू या प्रदर्शनात आपल्याला बघायला मिळतात.
असे हे प्रदर्शन तीन विषयसूत्रांमध्ये गुंफले आहे. पहिले म्हणजे, ’लोकगाथा : भारतातील कथाकथन परंपरा’ ज्यामध्ये विविध कलावस्तूंच्या माध्यमातून भारतातील कथाकथनाची वैविध्यपूर्ण परंपरा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘श्रद्धेचे मूर्त रूप’ हा दुसरा विभाग कर्मकांडांच्या एका वेगळ्या जगाशी आपला परिचय करून देतो. ‘परिवर्तन’ या अंतिम विभागात बदलत्या काळाच्या अनुषंगाने बदलत गेलेल्या कलाकृती आणि कलाकार यांवर प्रकाश टाकला आहे.
या प्रदर्शनात एका देवीची मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. ही मूर्ती आहे, कर्नाटकातील ग्रामदेवता देवी ‘द्यामावा’ हिची. कर्नाटकाच्या कोप्पल जिल्ह्यातील किन्नल या गावातील कारागिरांच्या सर्जनातून ही मूर्ती जन्माला आली आहे. किन्नल गावातील या हस्तकलेचे मूळ विजयनगर साम्राज्याच्या काळातील असल्याचे निदर्शनास येते. या गावातील कारागीर हलक्या वजनाच्या पोल्की मारा लाकडापासून ग्रामदेवतांच्या मूर्ती कोरतात व त्यांना आकर्षक बनवण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करतात. या ग्रामदेवतेबरोबरच मारियम्मा, दुर्गम्मा, येलम्मा या देवींची पूजादेखील केली जाते.
दक्षिणेत या मूर्तींचे देखणे रूप बघताना, पुढे महाराष्ट्राची चित्रकथीसुद्धा आपल्याला खुणावते. या चित्रकथीमध्ये रामायणातील अरण्य कांडाचे दर्शन घडते. ’चित्रकथी’ या शब्दातील ‘चित्र’ म्हणजे चित्रकला आणि ‘कथी’ म्हणजे कथा. ‘चित्रकथी’ ही ज्याप्रमाणे एक कला आहे, त्याचप्रकारे हे एक कथाकथनाचे साधनसुद्धा आहे. ‘पद्मश्री’ पुरस्काराचे मानकरी परशुराम गंगावणे यांचा मुलगा चेतन गंगावणे यांनी सादर केलेल्या चित्रकथीमध्ये 22 चित्रांच्या माध्यमातून रामायणाच्या स्थानिक परंपरेत प्रचलित अरण्य कांडामधील महत्त्वाचे प्रसंग चित्रित केले आहेत. त्यांच्या याच चित्रकथीच्या प्रवासाबद्दल ते सांगतात की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी या कलेला राजाश्रय दिला. या कलेच्या प्रदर्शनासाठी काही मंदिरे दिली. या मंदिरांमध्ये चित्रकथीच्या कलेचे सादरीकरण होत असे. पटचित्र (पट म्हणजे कापड आणि चित्र म्हणजे चित्रकला) ही ओडिशातील एक पारंपरिक चित्रकला आहे. नैसर्गिक रंगांचा वापर करून रेशमी कापडावर किंवा ताडाच्या पानांवर ही चित्रे काढली जातात, ज्यांचे विषय हे प्रामुख्याने धार्मिक असतात. पारंपरिकरित्या केवळ पुरुषच हे पटचित्र काढत असतात. परंतु, या परंपरेला बगल देत गीतांजली दास यांनी स्वतःची वेगळी वाट निर्माण केली. वयाच्या दहाव्या वर्षापासून ही कला शिकून त्यांनी सर्जनाचा एक नवीन वस्तुपाठ निर्माण केला. राजस्थानच्या फड चित्रशैलीमध्ये कल्याण जोशी या कलाकाराने चक्क ‘कोविड 19’चं जग चितारलं आहे. परंपरा आणि नावीन्यता या दोन गोष्टींचा संगम इतक्या सुंदर रितीने क्वचितच जुळून आला असेल. कौशल्य आणि बारकाईने विकसित केलेला ‘जुमाडी भूता’ मुखवटा कर्नाटकातील ’भूताकोला’ या परंपरेचे दर्शन घडवणारा आहे.”
कलाप्रदर्शनातील सर्व वस्तूंचे संकलन विद्यार्थ्यांनी अत्यंत बारकाईने केल्याचे दिसून आले. हे प्रदर्शन किमान पुढचे तीन महिने प्रेक्षकांसाठी खुले असणार आहे. संकलनातून प्रदर्शन आणि या प्रदर्शनातूनच संवर्धनाचा मार्ग पुढे तयार होतो. आपला वारसा जतन करण्यासाठी आधी त्याची प्रचिती येणं गरजेचे आहे. शहरीकरणाच्या झपाट्यात आपल्या भोवताली संस्कृतीमध्येसुद्धा आपल्याला परिवर्तन बघायला मिळाले. अशा वेळी आपल्या लोकसंस्कृतीची मुळे तरुण पिढीला आकर्षित करतात व त्याचा शोध घेत इतिहासाचा एक भव्य पट मांडण्याचा प्रयत्न ते करतात, ही गोष्ट कौतुकास्पद म्हणावी लागेल. पिढ्यान्पिढ्या आपल्या समाजमनावर ज्या लोकसंस्कृतीचा संस्कार झाला, तिचं सत्व जपणं आपल्याच हाती आहे, यात काही शंका नाही. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील विद्यार्थ्यांनी यासाठी पहिलं पाऊल उचललं, हे कौतुकास्पदच. या लोकसंस्कृतीच्या लोकदर्शनाचं कार्य आता रसिकांच्या हाती आहे.
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.