गुढीपाडव्यानिमित्त 'या' छोट्या गुढ्यांना लोकांची सर्वाधिक पसंती!
29-Mar-2025
Total Views | 11
मुंबई: गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारामध्ये सर्वत्र खरेदीसाठी लगबग बघायला मिळत आहे. अशातच यावेळी छोट्या गुढींनी सगळ्यांचे लक्ष ओढून घेतला आहे. आकाराने छोटे असलेल्या या गुढींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली बघायला मिळाली.
दादरच्या फॅमिली स्टोअर्सच्या योगेश जोशी यांनी यासंदर्भात दै. मुंबई तरुण भारतची संवाद साधला असता ते म्हणाले की " मागच्या काही काळापासून या छोट्या गुढ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आकाराने छोट्या असलेल्या या गुढ्या, टेबलटॉप म्हणून लक्षवेधी आहेत. ६ इंच ते १२ इंच इतक्या उंचीच्या या गुढ्या भेटवस्तू म्हणून सुद्धा लोकप्रिय झाल्या आहेत. या गुढ्यांमधे सुद्धा विविध प्रकारची रंगसंगती आपल्याला बघायला मिळते. वेगवेगळ्या रंगांनी या गुढ्यांवर केलेले नक्षीकाम, त्याखाली छोटेखाणी खणाचे कापड यामुळे मोठ्या प्रमाणात लोक या गुढ्यांकडे आकृष्ट झाले. ग्राहकांना अशा वेगळ्या गुढ्या खरेदी करायला आवडतात. वेगवेगळ्या कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये सुद्धा भेट म्हणून या छोट्या गुढ्या दिल्या जातात. या छोट्या गुढ्या एका अर्थाने मराठी संस्कृतीचे प्रतीक बनल्या आहेत. या छोट्या गुढ्या जेव्हा भेट म्हणून दिल्या जातात तेव्हा एका अर्थी सांस्कृतिक आदान प्रदान होत असतं. या व्यतिरिक्त या छोट्या गुढ्या देव्हाऱ्यात सुद्धा ठेवल्या जातात, जेणेकरून एक मंगलमय वातावरण तयार होतं. या छोट्या गुढ्यांची किंमत साधारण ९० रुपये ते ३०० रुपये या दरात आहे. प्रत्येक छोट्या गुढीवर वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेटिंग वर्क करण्यात आलं आहे, त्यामुळे त्याची किंमत वेगवेगळी आहे.
रंगबेरंगी काठ्यांना पसंती !
गुढीपाडव्याच्या निमित्ताने खरेदी करत असताना, वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या आकाराच्या गुढ्या बाजारात उपलब्ध असताना, त्यांच्यासोबतच रंगीबेरंगी काठ्यांना सुद्धा ग्राहकांची पसंती निदर्शनास आली आहे. वेगवेगळ्या आकाराच्या बांबू पासून तयार केलेल्या या काठ्या शंभर ते दोनशे रुपयांच्या आसपास बाजारात खरेदीसाठी उपलब्ध आहे.