कुणाल कामराला परदेशातून फंडिंग; मातोश्रीच्या इशाऱ्यावर व्हिडीओ! कुणी केला आरोप?
29-Mar-2025
Total Views | 32
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशाच्या विरोधात वेगवेगळे व्हिडीओ तयार करण्यासाठी कुणाल कामराला मोठ्या प्रमाणात परदेशातून फंडिंग मिळत असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला आहे. शनिवार, २९ मार्च रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
संजय निरुपम म्हणाले की, "कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विटंबना केली असून यामागे उबाठा गटाचा हात आहे. उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ते कुणाल कामराच्या संपर्कात असल्याचे स्विकारले आहे. कुणाल कामराच्या व्हिडीओमुळे महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मनमाडपासून तर अंधेरी आणि अंधेरीपासून तर खारमध्ये कामराच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला समन्सदेखील पाठवले आहे. ३१ मार्चपूर्वी त्याला पोलिसांसमोर हजर राहायचे होते पण त्यापूर्वी तो तमिळनाडूतील एका न्यायालयात गेला असून न्यायालयाने त्याला ७ एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन दिला आहे."
"उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशाच्या विरोधात कुणाल कामराचे वेगवेगळे व्हिडीओ आहेत. या सगळ्यासाठी त्याला परदेशातून मोठ्या प्रमाणात फंडिंग मिळत आहे. आतापर्यंत त्याला ४ कोटींहून अधिक फंडिंग मिळाले असून ते कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून येत आहे. 'हम होंगे कंगाल' यासारख्या व्हिडीओतून कामराने भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतविरोधी कारवाई करणाऱ्या लोकांकडून कामराला फंडिंग येत असल्याचे आम्हाला दिसून आले आहे," असे त्यांनी सांगितले.
...तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार
"परदेशी योगदान नियमन कायद्याअंतर्गत मीडिया ब्रॉडकास्टशी संबंधित कोणतेही युट्यूब चॅनेल अशा प्रकारचे फंडिंग घेऊ शकत नाही. माध्यम प्रसारणाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीने परदेशातून पैसा घेऊन भारताची बदनामी करू नये, यासाठी हा कायदा आहे. प्रथमदर्शनी यात अनेक भारतविरोधी संस्था कामराला मदत करत असल्याचे दिसते. त्यामुळे देशविरोधी संस्थांकडून पैसे घेणे म्हणजे एक प्रकारे देशद्रोह आहे. ज्याप्रमाणे कुणाल कामरा परदेशी फंडिंग घेत आहेत त्यावरून पुढे त्याच्यावर देशद्रोहाचा खटलादेखील चालू शकतो. यासाठी आम्ही संबंधित विभागाकडे तक्रार करणार आहोत. कुणाल कामराकडे बेछूट पैसा येत असून यात कुठले लोक आहेत याचा तपास होईल," असेही संजय निरुपम म्हणाले.
मातोश्रीच्या इशाऱ्यावर कामराचा व्हिडीओ
"संजय राऊत कामराच्या संपर्कात असल्याचे त्यांनी स्वत: स्विकारले आहे. कुणाल कामराला व्हिडीओ बनवण्यासाठी मातोश्रीकडून फंडिग आले असून मातोश्रीच्या इशाऱ्यावर त्याने हा गुन्हा केला आहे. संजय राऊतदेखील त्यांच्या संपर्कात असल्याचे हळूहळू ते स्विकार करत आहेत," असेही संजय निरुपम म्हणाले.