मुंबई: ( Koratkar Rolls Royce car up at businessman Tushar Kalates farmhouse ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरची रोल्स रॉईस गाडी पिंपरी चिंचवडचे व्यावसायिक तुषार कलाटे यांच्याकडे असल्याचे उघड झाले आहे. कोरटकरच्या याच रोल्स रॉईस गाडीचा शोध पोलीस घेत होते. कलाटेंच्या मुळशीच्या फार्महाऊसवर ही रोल्स रॉयस असल्याचे आढळले. WB-02-AB 123 याच रोल्स रॉईससोबत तुषार कलाटे यांचे फोटोही प्रसिद्ध झाले आहेत.
आर्थिक घोटाळ्याचा आरोप असलेला महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावे ही रोल्स रॉईस नोंदणीकृत आहे. पोलीस तपासात कोरटकर या गाडीबाबत पोलीसांना माहिती देण्यास टाळाटाळ करत होता. परंतू आता ही अलिशान कार कलाटेंच्या फॉर्महाऊसवर कशी असा सवाल उपस्थित होतो आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कोरटकरच्या मैत्रीपूर्ण संबंधातून ही कार बांधकाम व्यावसायिक कलाटे यांनी खरेदी केली असल्याची माहिती समोर येत आहे.
कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते, याच वक्तव्याच्या वादातून ओढवलेल्या परीस्थितीमुळे तो जवळपास महिनाभर फरार होता अखेर महिनाभराच्या शोधानंतर २५ मार्च रोजी त्याला पोलिसांनी अटक केली सध्या कोरटकर पोलीस कोठडीत आहे.
कुठे मिळाली गाडी?
कोरटकरने खरेदी केलेली कार ही आर्थिक घोटाळ्याचे आरोप असलेल्या महेश मोतेवार यांच्या कंपनीच्या नावावर आहे. सीआयडीलाही गाडी सापडत नव्हती. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्या मुळशी येथील फार्म हाऊसवर ही गाडी आढळून आली आहे.
कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर हल्ला
प्रशांत कोरटकर याच्यावर वकिलाकडूनच हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पोलीस बंदोबस्त असतानाही कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. कोरटकरला आणखी दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तो फरार असताना त्याला मदत करणाऱ्यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.