कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी नदी घेणार मोकळा श्वास! मंत्री गिरीश महाजनांकडून त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी
29-Mar-2025
Total Views | 11
नाशिक : त्र्यंबकेश्वरला कुशावर्त ते गायत्री मंदीरापर्यंत सिमेंट काँक्रिट स्लॅबखाली बंदिस्त असलेली गोदावरी नदी येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यात मोकळा श्वास घेणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवार, दि. २८ मार्च रोजी त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी केली.
मंत्री गिरीश महाजन यांनी गोदावरी नदी, गोदावरी नदीवरील घाट, नील पर्वत, बिल्व तीर्थस्थळांची पाहणी करून आढावा घेतला. त्र्यंबकेश्वरला कुशावर्त ते गायत्रीमंदिरपर्यंत सिमेंट काँक्रिट स्लॅबखाली बंदिस्त असलेली गोदावरी नदी येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यात मोकळा श्वास घेणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी शुक्रवारी त्र्यंबकेश्वरला मंत्री गिरीश महाजन आणि आखाडा परिषदेचे महामंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत गोदावरील स्लॅब काढण्याचा निणय घेण्यात आला. बैठकीत श्री चंद्र भगवान घाटापासून प्रयागतीर्थापर्यंत असलेल्या जुन्या नदीच्या बाजूने चार ते पाच किमीपर्यंत घाट बांधून त्यामध्ये गोदावरी कुशावर्त तीर्थाचे पाणी न्यायचे आणि या संगम घाटात भाविकांना स्नान घडवायचे, अशा प्रकारचे नियोजन निश्चित करण्यात आले. सिंहस्थ अमृतस्नान पर्वकाळात आखाड्यांचे साधू आणि निवडक साधू कुशावर्त तीर्थ स्नान करतील, असे ठरले. या बैठकीला नगरपालिकेचे अधिकारी, देवस्थान, आखाड्यांचे प्रतिनिधी, साधु-महंत उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “आगामी कुंभमेळ्यापूर्वी सर्व विकासकामांची पूर्तता केली जाईल. त्र्यंबकेश्वर येथे येणार्या साधू, महंतांना आवश्यक सोयीसुविधांची पूर्तता केली जाईल. तशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत,” असे त्यांनी सांगितले. यावेळी विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, हरीगिरीजी महाराज, रवि पुजारी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.