कामगार आहे, तळपती तलवार आहे! प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरात पार पडले सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन
28-Mar-2025
Total Views | 12
मुंबई : कामगार आहे, तळपती तलवार आहे, सारास्वतांनो थोडा गुन्हा घडणार आहे, असं म्हणत कामगारांच्या वेदनेला शब्दबद्ध करणारे महाकवी नारायण सुर्वे यांच्या साहित्याचा जागार व्हावा यासाठी सुर्वे मास्तरांचे एक दिवसीय साहित्य संमेलन पार पडले. स्वामीराज प्रकाशन आणि प्रभा प्रकाशन कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन दि. २७ मार्च रोजी प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्यमंदिर येथे पार पडले. या एक दिवसीय साहित्य संमेलनात काव्यवाचन, परिसंवाद, एकांकिका सादरीकरण या सारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांनी भूषवले. या साहित्य संमेलनाचे उद्धाटन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.
नारायण सुर्वे म्हणजे 'नाही रे' वर्गाचे शेक्सपियर! - अॅड. आशिष शेलार
नारायण सुर्वे यांच्या लेखनकार्यावर प्रकाश टाकताना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले की " नारायण सुर्वे यांच्या कवितेला कुठल्या चौकटीत बसवता येत नाही. नारायण सुर्वे खऱ्या अर्थाने 'नाही रे' वर्गाचे शेक्सपियर आहेत. त्यांनी आपल्या काव्य विश्वातून कामगारांचे भावविश्व मांडले. पुढच्या वर्षी आपण नारायण सुर्वे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करणार आहोत. या निमित्ताने वेगवेगळ्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. त्याचसोबत, पुढील वर्षीच्या याच संमेलनात कवी नारायण सुर्वे यांच्या नावाने गिरणगावातील एका लेखकाला ५०,००० रु. चा पुरस्कार देण्यात येईल " अशी घोषणा आशिष शेलार यांनी केली. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार, गिरणगावचे आमदार मनोज जामसुतकर, ज्येष्ठ लेखिका नेहा सावंत, स्वामीराज प्रकाशनाचे रजनीश राणे, प्रभा प्रकाशनाचे अजय कांडर आदी मान्यवर उपस्थित होते.
राबणाऱ्या हातांनी मुंबई उभी केली! : नारायण जाधव
सुर्वे मास्तरांच्या या साहित्य संमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये "सुर्वे मास्तरांच्या कवितेतील गिरणगाव कुठे हरवलं ?" या परिसंवादाचे आयोजन करण्यात आला होते. ज्येष्ठ रंगकर्मी नारायण जाधव, मुंबईचे अभ्यासक नितीन साळुंखे यांचा सहभाग होता. यावेळी आपले मत मांडताना ज्येष्ठ रंगकर्मी नारायण जाधव म्हणाले की " आज मुंबईचं जे वैभव आपल्याला बघायला मिळतं, तिथल्या कष्टकऱ्यांनी आणि राबणाऱ्या हातांनी घडवलं आहे. आणि हेच वास्तव नारायण सुर्वे यांच्या कवितेतून जगाला कळत गेलं." पुढे बोलताना त्यांनी चाळ संस्कृतीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ रंगकर्मी नारायण जाधव मागची अनेक दशकं कामगार रंगभूमीशी जोडले गेले आहेत. कामगार रंगभूमीच्या कलाकारांनी पुढे जाऊन व्यावसायिक रंगभूमीवर सुद्धा आपली वेगळी छाप सोडली. परंतु दुर्दैवाने काळाच्या ओघात ही कामगार संस्कृती लयाला गेली अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली. मुंबईचे अभ्यासक आणि ज्येष्ठ लेखक नितीन साळुंखे यांनी मुंबईतील गिरण्या या विषयावर प्रकाश टाकला.