नवी दिल्ली : (Narendra Modi at Reshimbaug) हिंदू नववर्षदिनी अर्थात गुढीपाडव्याला (३० मार्च रोजी) पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) मुख्याल रेशिमबाग येथे भेट देणार आहेत. हिंदू नववर्षानिमित्त रा. स्व. संघाने 'प्रतिपदा' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मृती मंदिरास भेट देऊन आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्री गुरुजी यांना आदरांजली वाहतील.
हे वाचलंत का? : zमराठा साम्राज्याचा अधिकृत इतिहास प्रसिद्ध करावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी माधव नेत्रालय नेत्र चिकित्सा आणि संशोधन केंद्राच्या नवीन विस्तारित इमारतीची म्हणजे माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी करतील. २०१४ मध्ये स्थापन झालेले हे नेत्रालय नागपूरमधील एक प्रमुख सुपर-स्पेशालिटी नेत्ररोग सेवा सुविधा केंद्र आहे. गोळवलकर गुरुजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही संस्था स्थापन करण्यात आली होती. नव्या प्रकल्पात २५० खाटांचे रुग्णालय, १४ बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि १४ मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर असतील. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि जागतिक दर्जाच्या नेत्ररोग संबंधित सेवा प्रदान करणे आहे, हा यामागील उद्देश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हजारो अनुयायांसह १९५६ मध्ये ज्या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्या दीक्षाभूमीला भेट देऊन पंतप्रधान आदरांजली वाहतील.
दारुगोळा केंद्रासही देणार भेट
पंतप्रधान मोदी नागपुरातील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या दारूगोळा केंद्राला भेट देणार आहेत. नि:शस्त्र हवाई वाहनांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या 1250 मीटर लांब आणि 25 मीटर रुंद हवाई पट्टीचे आणि लोइटरिंग युद्धसामग्री आणि इतर मार्गदर्शित युद्धसामग्रीची चाचणी घेण्यासाठी प्रत्यक्ष युद्धसामग्री आणि वॉरहेड चाचणी सुविधेचे उद्घाटन करतील.
संघ मुख्यालयात जाणारे दुसरे 'स्वयंसेवक पंतप्रधान'
संघ मुख्यालयात जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे स्वयंसेवक पंतप्रधान ठरणार आहेत. यापूर्वी २७ ऑगस्ट २००० रोजी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि उपपंतप्रधान व गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी संघ मुख्यालयास भेट दिली होती.