संगीत, प्रेरणा आणि जिद्दीचा संगम; ‘आता थांबायचं नाय’चे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला!
27-Mar-2025
Total Views | 13
मुंबई : महाराष्ट्राच्या मातीतील एका प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित ‘आता थांबायचं नाय' हा नवा मराठी चित्रपट १ मे पासून आपल्या जवळच्या थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. महिलादिनी झी स्टुडिओज, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ यांनी ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता. आता ह्याच सिनेमाचं मनाला भिडणारं शीर्षक गीत ‘आता थांबायचं नाय’ प्रदर्शित झालंय. हे गाणं, असं सेलिब्रेशन आहे जे जीवनाच्या नवीन प्रवासाचा, उंच भरारी घेण्याचा, नवे स्वप्न पाहण्याचा आणि ते पूर्ण करण्यासाठी घेतलेला ध्यासाचा आनंद व्यक्त करते. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील अनेक उत्तम कलाकार ह्या एका गाण्यात आहेत .
'आता थांबायचं नाय' हे गाणं मनामनावर प्रभाव पडणारे असून या गाण्याला अजय गोगावले यांचा आवाज लाभला आहे, या गाण्यात त्यांचा आवाज अतिशय आल्हाददायक वाटतो तर गायिका आनंदी जोशी हिने सुद्धा आपल्या सुरांनी या गाण्याला साज चढवला आहे. या सिनेमासाठी नव्या दमाचे संगीतकार गुलराज सिंग यांनी सर्व गाणी संगीतबद्ध केली आहेत तर मनोज यादव हे गीतकार आहेत. प्रेरणादायक आणि सकारात्मक ऊर्जा देणारं हे गाणं प्रत्येक वयोगटातील व्यक्ती साठी आहे. हे गाणं पाहून तुम्ही नक्कीच गुणगुणणार ‘आता थांबायचं नाय’ !
गायक अजय गोगावले ह्यांनी या वेळी आपलं मत व्यक्त करताना सांगितलं,“संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांना प्रेरणा देणं आणि सकारात्मक विचार देणं हे खूप महत्त्वाचे आहे, आता थांबायचं नाय हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे, गाणं गाण्यापूर्वी त्यामागची गोष्ट समजून घेण्यावर मी भर देतो. त्यामुळे हे माझं भाग्य आहे कि अशा प्रेरणादायी संदेश देणाऱ्या चित्रपटाचा मी एक भाग आहे”
शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव,सिद्धार्थ जाधव,प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, ओम भुतकर, पर्ण पेठे, प्रवीण डाळिंबकर,रूपा बोरगांवकर त्याच बरोबर रोहिणी हट्टंगडी आणि आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी आणि धरम वालिया हे सिनेमाचे निर्माते आहेत. झी स्टुडिओज् प्रस्तुत 'आता थांबायचं नाय' हा चित्रपट केवळ एक मनोरंजक अनुभव नाही तर तो जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची शिकवण देणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे. हा सिनेमा महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे !!