वैदिक म्हणजे ज्ञानमय जीवनात स्वस्तिक चिन्हाला फार महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेतील सर्व शुभकार्यांची सुरुवात स्वस्तिकपूजनापासून होते. ‘सु + अस्ति’ म्हणजे स्वस्तिक होय. ज्यामुळे चांगल्या अवस्थेचे रक्षण होते, त्या अवस्थेचे चिन्ह वा प्रतीक म्हणजे स्वस्तिक होय. इराक देशात झालेल्या उत्खननातून, तीन हजार वर्षांपूर्वीच्या एका स्वस्तिक चिन्ह धरणार्या प्रस्तराची प्राप्ती झाली. स्वस्तिक चिन्ह वैदिक धरले, तर आजपासून तीन हजार वर्षांपूर्वी इराकसारख्या आजच्या मुसलमान देशात वैदिक संस्कृती नांदत असली पाहिजे, हे उघड आहे. तुर्कस्तानातील उत्खननात प्राचीन काळातील मोठ्या लोखंडी कड्या सापडल्या असून, त्यावर या काळात तिथे वैदिक परंपरेनुसार यज्ञ झाल्याचे नोंदले आहे. यज्ञ वैदिक परंपरेची पद्धती धरल्यास तीन हजार वर्षांपूर्वी तुर्कस्तानातसुद्धा वैदिक परंपरा संपन्न होत्या, असा यातून अर्थ निघतो.
नाईल नदीच्या मध्य भागात तीन ते चार हजार वर्षांपूर्वीची भव्य मंदिरे बांधलेली आहेत. त्या मंदिरातील एका स्तंभावर त्याकाळच्या न्यूबीयन उपाध्यायाचे चित्र कोरले आहे. त्याच्या गळ्यातील ताईतामध्ये चक्क स्वस्तिक चिन्ह कोरले आहे. यावरून प्राचीन नाईलच्या खोर्यातही वैदिक संस्कृती नांदत होती, हे स्पष्ट आहे. ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवासी मावरी लोक वसंत ऋतूत एक उत्सव साजरा करतात. त्या उत्सवात पती जमिनीवर फुलांनी स्वस्तिक काढतात, तर आपल्या पतीच्या पाठीवर पत्नी फुलांच्या रंगांनी दुसरे स्वस्तिक काढतात. याचा अर्थ असा की, प्राचीन काळात सर्व जग वैदिक संस्कृतीने भारले होते व संपन्न होते.सर्व विश्व वैदिक परंपरा आणि संस्कृतीचेच उपासक होते. विस्मरणाने विलगता आली आणि विभिन्न धर्म सांप्रदाय उत्पन्न झाले. सर्व जग पुन्हा वैदिक संस्कारांनी संपन्न झाल्यास, त्यात जगाचे कल्याणच आहे.
स्वस्तिक चिन्हातील विज्ञानही तितकेच महत्त्वाचे आहे. दोन सरळ रेषा एकमेकींना काटकोन करून मध्य बिंदूत छेदतात. त्यामुळे त्यापासून चार दिशांना जाणार्या चार सरळ रेषा निर्माण होतात. त्या सरळ रेषांच्या डोक्यावर पुन्हा चार सरळ स्पर्शरेषा, काटकोन पद्धतीने दाखविल्या असतात. अशा तर्हेने स्वस्तिक चिन्ह तयार होते. जीव आणि शिव या दोन आत्मपरमात्म शक्ती परस्परास संलग्न व छेदन करूनच सतत गतिमान असतात. प्रकृती व पुरुषापासून जग उत्पन्न झाले आहे. जगाची उत्पती व विकास चारही बाजूंना असतो, म्हणूनच या रेषा बाह्यवर्ती असतात. जगातील प्रत्येक वस्तूची संकल्पना वा अस्तित्व लांबी, रुंदी, उंची व काळ या मात्रांवरच अवलंबून आहे! काळमात्रेवरच वस्तूची धारणा असते. स्वस्तिकातील चार रेषा म्हणजे त्या चार मात्रा होय. प्रत्येक वस्तू व अस्तित्व निरंतर गतिमान असते. अस्तित्वाची गती सव्य असते, हे आपण पाहिलेच आहे. म्हणून त्या चार सरळ रेषांनी प्रदक्षिण गती दाखवणार्या चार स्पर्शरेषा, प्रत्येक रेषेच्या वर दाखवल्या आहेत.
जग म्हणजे घटनांचा बाजार होय. घटनांकरिता सव्य गती आवश्यक असल्याने, सर्व कार्यांत स्वस्तिक चिन्हांचा वापर केला आहे. असल्या या वैज्ञानिक शास्त्रशुद्ध चिन्हाचा वापर, जगातील सर्व धर्मीयांनी पुन्हा करायला हरकत नाही. ‘क्रॉस’ ही प्राचीन कालातील स्वस्तिक चिन्हाची उसनवारी होय. यावरून सर्व विश्व एके काळी पूर्ण वैदिकच होते, हे सिद्ध होते.
विघटन-अपसव्य आणि ब्रह्मास्त्र
विश्वाची विघटनात्मक गती अपसव्य आहे. वाममार्गीसाधक स्मशानात जाऊन, अपसव्य परिक्रमा करून त्याद्वारे इष्ट ते वामाचार घडविण्याचे स्वतःत सामर्थ्य आणतात. गायत्री मंत्र घटनात्मक म्हणून विश्वगतीला, विश्वस्वास्थाला तारक आहे. म्हणूनच त्या मंत्राला ‘गायत्री’ म्हटले आहे. गायत्री मंत्राची घटना प्रदक्षिण म्हणजे सरळ आहे. जसे, ‘ओम भूः भुवः स्वः तत्सवितुः वरेण्यं भर्गो देवस्य धीमही धियो यो नः प्रचोदयात्।’ प्रत्येक विश्वघटनेकरिता वैदिक परंपरेत प्रदक्षिण गतीचे अवलंबन केले जाते. अशाने ती कार्ये शुभ होतात. पितर कर्माकरिता अपसव्य गतीचे अवलंबन करतात. जडशरीर सोडण्याच्या विघटन कार्यापासून त्यांची उर्ध्वगती सुरू असल्यामुळे, ती अपसव्य गती असते. त्या अपसव्य गतीला पोषक अशी अपसव्य गतीचीच कर्मे, पिंडदानादि श्राद्ध कर्मांत करतात. विघटन म्हणजे मृत्यू व विघटनात्मक गती वा क्रिया म्हणजे मृत्यूकडे वाटचाल होय.
ब्रह्मास्त्र
ब्रह्मास्त्राची कल्पना अशीच काही आहे. मंत्रशास्त्रानुसार ब्रह्मास्त्राची प्राप्ती, गायत्री मंत्राच्या अगदी उलट अक्षरपंक्तींनी करतात. ब्रह्मास्त्र प्राप्त करण्याचा साधनामंत्र गायत्रीच्या अगदी उलट म्हणजे ‘तयादचोप्र नः योयोधिः ही मधी स्यवदे र्गोभण्यरेर्वतु वित्सत स्वःवः भू भूः ओम’ असा ब्रह्मास्त्राचा मंत्र मानतात. घटनांना तोडून जे विघटन आणेल, ते ब्रह्मास्त्र होय. विघटन म्हणजे शून्य अवस्था. ब्रह्म म्हणजेच ही शून्य अवस्था होय. म्हणूनच ब्रह्माकडे नेऊन त्या अवस्थेत साधकाला सुरक्षित ठेवण्याची जी किमया आहे, तिला ‘ब्रह्मास्त्र’ असे म्हटले आहे. ब्रह्म वा शून्य याचा खरा विचार केल्यास त्या ब्रह्माचे जे रक्षण करेल, त्याला ब्रह्मास्त्र म्हणता येईल. जे आहे, त्याचे रक्षण करणे म्हणजे अस्त्र, ब्रह्मास्त्र होय. या दृष्टीने ब्रह्मास्त्राचा विचार केल्यास ते भयानक वा विद्ध्वंसक नसून, साधकास उच्च ब्रह्मावस्था प्राप्त करून देण्याचे साधन आहे. व्यवहारात ब्रह्मास्त्राला भयंकर विनाशक मानतात. तसा भयानक अर्थ ब्रह्मास्त्र या शब्दयोजनेतून निघत नाही. त्या शून्य म्हणजे ब्रह्म अवस्थेत जाताना साधकाला काय काय अनुभव येतात, त्यांचे शब्दापलीकडील वर्णन शब्दांंकित करण्याचा प्रयत्न, नासदीय सुक्ताद्वारे ऋषि करतात. त्या मूलावस्थेचे वर्णन असे, नासदासीन्नो सदासीत्तदानी..... स्वधया तदेकं तस्माद्धान्यन्नपरः किं चनास॥ऋग्वेद॥ जेथून सर्व विश्वोत्पत्ती होते, त्या मूलावस्थेत सत् नव्हते की असत् नव्हते. धारण करणारी अवस्था (अद्रजो) नव्हती की धार्य असे तत्त्व नव्हते. त्या सर्वांना धारण करणारे परात्पर सीमारहित व्योम म्हणजे अवकाशही नव्हते (न व्योमयत्). मग अशा अवस्थेत कोणी कोणाला धारण केले, आवरण घातले व कोणते तत्त्व त्यातून निघाले? आणि ते सर्व ज्यात सामावले होते, ते गहन गभीरत्व कोठे होते? त्यावेळी मृत्यू म्हणजे नाश नव्हता की अमरत्व नव्हते. त्यावेळी रात्र म्हणजे अप्रकाश नव्हता की प्रकाशमय गतिमानता नव्हती (न रात्र्या अह्न आसीतप्रकेतः), त्यावेळेस एकच होते आणि ते स्वतःत स्पंदन करीत होते (आनीदवातं स्वधया तदेकम्). याशिवाय आणखी काय होते? (क्रमशः)
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9702937357