उन्हाच्या तीव्र झळा सुरू झाल्या आणि बच्चेकंपनीला सुटी लागली की, अनेक पालकांना पर्यटन आणि भ्रमंती खुणावते. नोकरदारवर्गासोबतच तरुणाईलाही भटकंतीचे वेध लागतात. त्यानिमित्ताने गेल्या काही वर्षांतील पर्यटन व्यवसायातील बदलत्या ट्रेंड्सचे आकलन करणारा हा लेख...
पूर्वी उन्हाळी सुट्टीत फक्त गावी जायचे, हा ट्रेंड आता काहीसा बदललेला दिसतो. आता सोशल मीडिया आणि रिल्सच्या युगात पर्यटनासाठी काही कुटुंबांचा ठराविक ‘बजेट’ वेगळे काढून ठेवण्याकडेही कल हल्ली दिसून येतो. शनिवार-रविवारची भटकंती हा तर वेगळाच विषय! पण, नियोजन करुन, रीतसर सुट्ट्या काढून आणि विरंगुळा म्हणून बाहेरगावी जाणार्यांच्या प्रमाणात ‘कोविड’ काळानंतर लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. ‘कोरोना’मुळे ‘लॉकडाऊन’च्या काळात जो एकाकीपणा प्रत्येकाच्या वाट्याला आला, त्यावर उपाय म्हणून नंतर बहुसंख्येने मुसाफिर बाहेर पडले. अनेकांनी ‘सोलो ट्रीप’ केल्या, तर काहींनी कुटुंबासोबत, मित्र परिवारासोबत पर्यटनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर सोशल मीडियाचा असलेला प्रभाव हा प्रत्येकाला बाहेर भटकंतीसाठी प्रवृत्त करू लागला.
होम-स्टे, छोटेखानी हॉटेल्स, खवय्यांच्या आवडत्या ठिकाणांनी डिजिटल व्यासपीठ थाटले. सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्सनी तिथे भेटी दिल्या. मग आपसूकच अशा स्थळांकडे पर्यटकांचा राबता वाढू लागला तो कायमचाच. आता उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. पर्यटकांनी सुट्ट्यांची, खरेदीची आणि अन्य तयारीची जुळवाजुळव सुरूही केलेली दिसते. उन्हाच्या झळांपासून मोकळीक मिळेल, अशा ठिकाणांच्या शोधात सध्या पर्यटक आहेत. हिमाचल प्रदेशातील पर्वतीय प्रदेश असो, कोकण-गोवा किंवा केरळ किनारपट्टीचा भाग असो किंवा व्हिसामुक्त असणारे देश, अशा अनेक पर्यायांची चाचपणी पर्यटकांकडून सुरु असल्याचे समजते. पर्यटन घडवून आणणार्या एका कंपनीच्या अहवालानुसार, यंदा जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पूर्वोत्तर राज्ये आणि महाराष्ट्रातील कोकणासह, गोवा आणि केरळपासून लक्षद्वीप यांसारखे बहुविध पर्याय पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.
विदेश पर्यटन स्थळांमध्ये युरोपातील स्वित्झर्लंड, इटली, फ्रान्स, स्पेन, हंगेरी, ऑस्ट्रिया हे देशही पर्यटकांच्या पसंतीक्रमावर. याशिवाय मोफत व्हिसा उपलब्ध होणार्या अन्य देशांकडेही पर्यटकांचा कल दिसून येतो. उदा. भूतान, नेपाळ, थायलंड, मॉरिशससारख्या देशांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत भारतीय पर्यटकांचा कायमच ओढा असतो. व्हिसामुक्त देशांची अन्य काही वैशिष्ट्येसुद्धा आहेत. उदा. मॉरिशसमध्ये पाण्याखाली सूर मारत समुद्राच्या तळाशी असलेले सुंदर विश्व अनुभवणे, मालदीवमध्ये मिशेलीन स्टार अंडरवॉटर रेस्टोरंट म्हणजेच समुद्राखाली सजवण्यात आलेल्या एका शानदार हॉटेलमध्ये जेवण, जिथे आजूबाजूला फक्त मासे आणि समुद्री जीव तुमच्या अवतीभवती तरंगत असतील, तिथे जेवणाचा एक आगलावेगळा अनुभव. काहींना तर चक्क अंटार्क्टिकसारखा ध्रुवीय प्रदेश गाठण्याची जगावेगळी हौस, तर काहींना फिनलंडच्या ध्रुवीय प्रकाशात (नॉर्दन लाईट्स) अक्षरश: न्हाहून निघण्याची चमकदार इच्छा. इथल्या काचबंद इग्लूची अनुभूती घेणारा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. फिनलंडमध्ये डौलदार वृक्षांच्या मधोमध उभारलेल्या घरांमध्ये राहाण्यासाठी उन्हाळी सुट्ट्या हा उत्तम काळ. याशिवाय द. आफ्रिकेतल्या द्राक्षांच्या बागांची, जंगल सफारीसाठी दुचाकी किंवा चारचाकीने फेरफटका मारणार्यांमध्ये भारतीयांची संख्याही दखलपात्र आहे.
आपल्याकडे सध्या लग्नसराईचा, उन्हाळी सुट्ट्यांचा, औद्योगिक परिषदांचा काळ सुरू आहे. त्या कारणास्तव हॉटेल्सही गजबजलेली. शिवाय दैनंदिन कामकाजापेक्षा दहा टक्के जास्त पर्यटकांचा राबता. महाराष्ट्रातही कोकण, महाबळेश्वरसारख्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. परदेशातील भ्रमंतीपेक्षा देशांतर्गत पर्यटन हा विषय तुलनेने खिशाला परवडणारा असल्याने देशांतर्गत भ्रमण करणार्यांची संख्याही जास्त आहे. तीर्थाटन करणार्या यात्रेकरूंच्या संख्येने यंदा कुंभमेळ्यात विश्वविक्रम केला. महाकुंभमध्ये अमृतस्नानासाठी येणार्यांची एकूण संख्या ६० कोटींच्या घरात पोहोचली होती. देशविदेशातील भाविकांनी इथे पवित्र संगमावर श्रद्धेने स्नान केले. ४५ दिवसांत, तीन लाख कोटींची उलाढाल एकट्या प्रयागराजमध्ये झाली. राममंदिराला भेट देणार्या भाविकांची संख्या ११ कोटींहून अधिक झाली. कुंभमेळ्याच्या निमित्ताने होणारी गर्दी पाहता, मंदिर दर्शन खबरदारी म्हणून बराच काळ बंद ठेवावे लागले होते. ताजमहाल हे जगातील आश्चर्य म्हणून गणले जात असले, तरीही तिथे भेट देणार्या पर्यटकांपेक्षाही जास्त संख्या राममंदिरात पाहायला मिळाली.
भारत हा पूर्वापार तीर्थाटनाचाच देश. त्यामुळे आपल्या पूर्वजांपासूनच प्रत्येकाला तीर्थाटनाच्या निमित्ताने भ्रमंती करण्याची सवय होती. त्यामुळे पर्यटन, भटकंती, सहली हा काही पाश्चिमात्य देशांतून आलेला विषय नव्हे. पाश्चिमात्य देशांनी पर्यटनाला उद्योगाचे स्वरुप देऊन त्याची गोमटी फळे चाखली. मात्र, हळूहळू भारतीयांनीही ‘अतिथी देवो भव’ हे मातीतले संस्कार उद्योगरुपी आत्मसात केले. त्यामुळे सेवा क्षेत्रात आपण स्वतःला अलगद सामावून घेतले. उत्तर पूर्व भारतातील मेघालय, मणिपूर आणि हिमाचल प्रदेशसारख्या राज्यांमध्ये अनेक लहान-सहान हॉटेल्स विदेशी पर्यटकांना अत्यंत उत्तम आणि अव्याहत सेवा देतात. इथल्या स्थानिकांना त्यानिमित्ताने रोजगार मिळतो. उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात हिमाचलमध्ये येणार्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. इथल्याच डलहौजी नावाचे शहर उन्हाळ्याच्या दिवसात देशभरातील पर्यटकांनी ओसंडून वाहत असते. यामुळे इथल्या छोट्या-मोठ्या उपहारगृहांचे, स्टॉल्सधारकांचे साहसी आणि करमणुकीचे खेळ करणार्यांच्या हातात चार पैसे सुटतात.
महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये तर पर्यटकांचा वर्षभर राबता असतो. उन्हाळ्याच्या सुट्टीचा काळ मात्र त्यात तुलनेने अधिक गजबजलेला. कोकणातील हापूसची चव चाखण्यासाठीही काही आम्रप्रेमी पर्यटक हजेरी लावतात. कोकणाने आता नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतलेच आहे. इथल्या तरुणाईने सोशल मीडियावर रिल्स आणि ब्लॉगमुळे पर्यटकांसाठी अनेक दारे खुली केली. कोकणातील होम-स्टे, हॉलिडे कॉटेज, बंगले विरंगुळ्यासाठी तयार केलेल्या नारळी-पोफळीच्या बागा पर्यटकांना खुणावू लागतात. कोकणचा सुका मेवा, काजू, फणस, आंबे यांची चव पर्यटकांना खेचून आणते.
यंदा देशात पर्यटकांची संख्या १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रासाठी यंदाचा हंगाम हा आशेचा किरण ठरु शकतो. या सगळ्यात स्थानिक अर्थकारण आणि व्यवसायांना मोठा बुस्टर मिळतोच. शिवाय पर्यटन कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची गरज जास्त भासते. त्यामुळे नव्या संधीही निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे.
मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.