प्रपंचातून निवृत्त झालेल्या मनात क्षमाभाव विकसित होऊ शकत नाही. म्हणूनच संत ज्ञानदेवांनी आत्मज्ञानाच्या प्राप्तीचा मार्ग सांगितला. आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंतर क्षमाभाव आपोआप विकसित होईल. क्षमा केली की प्रपंचाशी जोडलेला अंतिम धागासुद्धा गळून पडेल आणि मग परिपूर्ण शांतीचा आणि चिरकाल शांतीचा अनुभवही प्राप्त होईल. कुंडलिनी शक्तीच्या जागृतीनंतर येणारे अनुभव कथन करणार्या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचे हे अध्यात्मिक विवेचन...
संत शिरोमणी ज्ञानदेवकृत ही रचना आहे. कुंडलिनी जागृतीचा उल्लेख ज्ञानदेवांनी या अभंगात केलेला आहे. कुंडलिनी जागृतीवर हा अभंग भाष्य करतो. या कुंडलिनीला यौगिक, तंत्र, मंत्र मार्गाने किंवा आत्मज्ञानाने उर्ध्वगामी करणे शक्य असते. ज्ञानदेव जो उल्लेख करत आहेत, तो बराचसा यौगिक मार्ग आहे. पण, ते इथे गुरुकृपेने साधल्याचा आदरपूर्वक उल्लेख करतात. कुंडलिनी ही चेतनास्वरूप आहे. त्या चेतनेला ध्यानक्रियेत स्थित होऊन आधी अनुभवायचे असते. त्यानंतर तिच्यावर नियंत्रण मिळवून मानसपूजा सुरू झाली की, तिला एकेका चक्रातून उर्ध्वगामी न्यायचे असते. ही संपूर्ण क्रिया मानसिक आहे आणि ही सहजसाध्य नाही. ध्यानाच्या रूपातून साधली, तरी त्या चेतनेचे अस्तित्व उमगणे आणि तिला नियंत्रणात ठेवणे कठीण असते. त्याला पूर्व सुकृत आणि गुरुकृपा दोन्ही अत्यावश्यक आहे.
या अभंगात या क्रियेचा उल्लेख कसा आहे, ते समजून घेऊ.
निवृत्ती परम अनुभव नेमा।
शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो॥6॥
इथे निवृत्तीनाथांचा ज्येष्ठ बंधू म्हणून नाही, तर सद्गुरू म्हणून उल्लेख आहे. ज्ञानदेवांना हा परम अनुभव निवृत्तीनाथांनी मिळवून दिला. या अनुभवामुळे पूर्णत्व अनुभवता आले आणि परम शांती आणि परम क्षमाभाव विकसित झाला, हा ऋणनिर्देश इथे केला आहे. हे झाले अनुभवाचे फळ. आता त्या क्रियेचे विवेचन समजून घेऊ.
अरे अरे ज्ञाना झालासी पावन।
तुझे तुज ध्यान, कळो आले॥1॥
यातील ‘अरे अरे’ हा उल्लेख, त्या कुंडलिनी शक्तीच्या अत्यंत वेगवान उर्ध्वगामी प्रवासाचा आहे. मूलाधारातील ती चेतना साडेतीन वेटोळे मारून, एखाद्या निद्रिस्त सर्पिणीसारखी होती आणि ती जागृत होताच, ‘अरे अरे’ म्हणेतो थेट सहस्त्रारात पोहोचली. या चेतनेच्या जागृत होण्याने आत्मज्ञानाची प्राप्ती झाली.
आत्मज्ञान काय प्राप्त झाले, तर तो म्हणजे तूच आहेस. अर्थात, वेदातील महावाक्य ’तत्त्वमसि’! आपल्या देहाला धारण करणारी प्राणशक्ती आणि सहस्त्रार चक्रातील सदाशिव तत्त्व मिळून असलेला आत्मा हेच अंशात्मक ब्रह्मतत्त्व आहे, या सत्याचा उलगडा झाला.
तुझा तूंची देव, तुझा तूंची भाव।
फिटला संदेह अन्य तत्वी॥2॥
आपण अंशात्मक ब्रह्मतत्त्व आहोत आणि आपल्यातील जागृत चेतना हीसुद्धा वैश्विक चेतनेच्या इतकीच परिपूर्ण आहे, हे ज्ञान प्राप्त झाल्याने आता अन्य तत्त्वांना द्वैतीमार्गे उपासनेतून जाणून घेण्याची आवश्यकता उरली नाही. काश्मिरी शैव तंत्रात, मानवी देह हा 36 तत्त्वांचा बनलेला आहे, असे मानले जाते. ज्यात पाच शुद्ध तत्त्वे असतात. एक मायातत्त्व शुद्धाशुद्ध असते आणि उर्वरित 30 तत्त्वे ही अशुद्ध तत्त्वे मानली जातात. इथे ज्या अन्य तत्त्वांचा उल्लेख केला आहे, तो अशुद्ध भौतिक तत्त्वांचा केलेला आहे. त्यांच्या अस्तित्वाबद्दलचे पूर्ण ज्ञान मिळाले आहे आणि त्यांची मर्यादा आणि कार्यकारणभाव उमजला आहे.
देव आणि भावाचा जो उल्लेख आहे, तो शिवशक्तैक्य स्वरूप वगळता, अन्य तीन कारक शुद्ध तत्त्वांचा आहे. ही तीन तत्त्वेसुद्धा शिवशक्ती ऐक्यरुपात लीन असल्याने, देहात शिवशक्ती ऐक्य-मिलन साधले की, ही अन्य शुद्ध तत्त्वे लीन होतात. त्याचवेळी 30 भौतिक तत्त्वांचे ज्ञान हे मायातत्त्व उलगडू देत नाही. मायातत्त्व हे शुद्धाशुद्ध तत्त्व आहे, ते मनात विकल्प अर्थात संदेह निर्माण करते. त्यामुळे साधकाला आत्मस्वरुपाची जाणीव होत नाही. परंतु, शिवशक्तैक्य अनुभूतीने या तत्त्वांबद्दलचा संदेह फिटला. सर्व ईश्वरी तत्त्वे आपल्यातच स्थित आहेत, त्यामुळे आपणच आपले देव आहोत, याची जाणीव झाली. हा आत्मभाव जागृत होताक्षणी, अन्य विकल्प विरघळून गेले असा या पंक्तींचा अर्थ आहे.
मुरडुनिया मन उपजलासी चित्ते।
कोठे तुज रिते न दिसे रया॥3॥
समयाचार तंत्राच्या मार्गाने कुंडलिनी जागृती ही सहजसाध्य नाही. सगळ्यात पहिली गोष्ट जीवात्म्याचे पूर्वसुकृत हवे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्या पूर्व पात्रतेमध्ये शम, दम आणि अन्य मार्गाने चित्तशुद्धी साधावी लागते. इथे ज्ञानदेव गुरूच्या मार्गदर्शनाच्या खाली केलेल्या त्या दमनरुपी उपासनांचा उल्लेख करत आहेत. मनाला मुरडून मग जी चित्तशुद्धी साधली आहे, त्या चित्तात आता सर्वव्यापी असण्याचा हा भाव उत्पन्न झाला आहे.
जो साधक स्वदेहात शिवशक्तीमिलन अनुभवतो, तो वैश्विक चेतनेशी संलग्न होतो आणि त्याला जाणीव होते की, या संपूर्ण विश्वाच्या पसार्यात प्रत्येक चर आणि अचर याच चेतनेने व्यापला आहे. अर्थात, या संपूर्ण विश्वात रिते, अर्थात चेतनाहीन असे काहीही नाही.
दीपकी दीपक मावळल्या ज्योती।
घरभरी वाती शून्य झाल्या॥4॥
आत्मज्ञान प्राप्त न झालेल्या साधकाच्या हृदयात ज्यावेळी आत्मज्ञानाचा प्रकाश उमलतो, त्यावेळी त्याच्या हृदयात जणू सहस्त्र सूर्यांचा उदय होतो. एखाद्या काळोख्या गुहेत ज्याप्रमाणे लकाकता सूर्यप्रकाश प्रवेश करतो, त्यावेळी आतील जाळ्याजळमट, वटवाघळासारखे दिवाभीत प्राणी अक्षरशः भस्मीभूत होऊन जातात. त्यांचे अस्तित्व लयाला जाते. त्याचप्रमाणे ज्यावेळी एखाद्या जीवात्म्याला हे आत्मज्ञान प्राप्त होते, तेव्हा त्याच्या देहातील षड्र्िपू आणि त्याला देहभावात बांधून ठेवणारी प्रत्येक गोष्ट भस्मीभूत होते आणि उरतो, आत्मज्ञानाचा सहस्त्रसूर्याचा प्रकाश. म्हणून या देहरुपी दिपकात आत्मज्ञानाची ज्योत पेटली आणि मग तिच्या प्रकाशात अन्य वासनांच्या, कामनांच्या, इच्छांच्या ज्योती जळून नष्ट झाल्या.
वृत्तीची निवृत्ती अपरा सकट।
अवघेंची वैकुंठ चतुर्भूज॥5॥
वृत्ती म्हणजे प्रापंचिक गोष्टींचे भान आणि ज्ञान. आत्मज्ञान प्राप्त झालेल्या जीवात्म्याचा प्रापंचिक गोष्टीमधील रस पूर्ण संपून जातो. याचा एक गुह्य अर्थसुद्धा आहे. कामभावना ही मानवाची प्राथमिक पातळीवरील भावना आहे आणि हिच्यापासून मुक्त होणे हे खूप कठीण असते. कामभावनेत लीन राहणे, ही मानवाची मूलभूत वृत्ती आहे. या वृत्तीपासून आत्मज्ञान प्राप्त झाले की निवृत्त होता येते. इथे षड्र्िपुंपैकी कामभावना जिला शमवणे अत्यंत कठीण असते, तिचे शमन या समयाचार उपासनेतून कसे साधले जाते, ते समजून घेऊ.
प्राणशक्ती ऊर्फ कुंडलिनी ही षोडशवर्षीय कन्या, स्वरुपात मूलाधारात स्थित आहे. तिला जागृत करून उर्ध्वगामी केले जाते. ती एक एक चक्र भेदत जाते. ती आज्ञाचक्रापर्यंत पोहोचताना पंचविशीतील पक्व तरुणी होते, जिचा पती सदाशिव सहस्त्रारात स्थित आहे. ही चेतना सहस्त्रारचक्रात जणू नववधू स्वरुपात जाते आणि तिचे सहस्त्रारात शिवाशी मिलन होते. या मिलनातून मिळणारा आनंद हा सच्चिदानंद आहे. सहस्त्रार चक्रात शिव आणि शक्ती ऐक्यस्वरूप होतात. अर्थात, चतुर्भुज होतात. या मिलनातून पाझरणार्या रसाला ‘कौलरस’ म्हणतात. तो आपल्या जिभेवर त्याचे बिंदू पडतात आणि त्यातून शरीरातील संपूर्ण 72 हजार नाड्यांचे पोषण होते. जो साधक स्वदेहात हे शिवशक्ती मिलन अनुभवतो, तो जणू सृष्टीचक्रनिर्मितीच स्वदेहात अनुभवत आहे. आपल्याकडील जो पिंडी ते ब्रह्मांडी हा सिद्धांत आहे, त्याला अनुसरून ब्रह्मांडातील शिवशक्तीमिलन तो साधक स्वदेहात सहस्त्रार चक्रात अनुभवतो.
या सहस्त्रार चक्राचा उल्लेख ज्ञानदेव ‘वैकुंठ’ असा करतात. याला आपण सदेह स्वर्गप्राप्तीची अनुभूती म्हणून वैकुंठ केला असेल, असे समजू शकतो. शिवशक्तीमिलनातून विश्वोत्पत्ती झाली, आता तिचे पालन हा पुढील भाग झाला. मग जो साधक ही अनुभूती घेईल, तो विष्णुस्वरूप होऊन संपूर्ण विश्वाच्या हिताची आणि पालनाची कामना करेल. अर्थात, भौतिक नाही, तर आत्मिक पातळीवर.
यानंतरच ज्ञानदेवांनी ‘भावार्थदीपिका’ रचली. जेणेकरून सर्वसामान्य जनांची आत्मिक उन्नती व्हावी, या हेतूने भगवद्गीतेवरील टीकेच्या स्वरूपात त्यांनी वेदांताचा सिद्धांत सांगितला. कोट्यवधी जीवात्म्यांच्या आत्मिक पोषणाचे कार्य करणे, हे विष्णुस्वरूपच आहे आणि म्हणूनसुद्धा त्यांनी, या प्रेरणेचे स्थान सहस्त्रार चक्र म्हणून वैकुंठ उल्लेख केला असेल.
निवृत्ती परम अनुभव नेमा।
शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो॥6॥
या परम अनुभवाचा लाभ गुरू निवृत्तीनाथांनी करून दिला आहे आणि त्यामुळे, ज्ञानदेवांना पूर्ण शांती आणि क्षमाशील वृत्तीचा लाभ झाला आहे. त्याबद्दलची कृतज्ञता ज्ञानदेव व्यक्त करत आहेत. याचा अजून एक भिन्न अर्थ असाही होतो की, संपूर्ण प्रपंचातून निवृत्त होऊन हा परम अनुभव प्राप्त करा आणि याची अनुभूती वारंवार घ्या. त्यातून तुम्हाला पूर्ण शांतीचा लाभ होईल आणि चित्तात क्षमाभाव निर्माण होईल.
माणूस प्रपंचातून निवृत्त होऊ शकतो, पण आपल्या भौतिक जीवनातील जे कडू-गोड अनुभव असतात आणि ते ज्या लोकांच्यामुळे प्राप्त झालेले असतात, त्यांच्याबद्दल मनात कटुता कायम असते. प्रपंचातून निवृत्त झालेले मनसुद्धा हा क्षमाभाव विकसित करू शकत नाही. म्हणूनच ज्ञानदेव सांगतात, आत्मज्ञान प्राप्त करा, मग हा क्षमाभाव आपोआप विकसित होईल. क्षमा केली की प्रपंचाशी जोडलेला अंतिम धागासुद्धा गळून पडेल आणि मग परिपूर्ण शांतीचा आणि चिरकाल शांतीचा अनुभव प्राप्त होईल.