पंजाबचे बदलते रंग

    27-Mar-2025   
Total Views | 18
punjab government on drugs


पंजाब सरकार सध्या भलतेच तेजीत आहे. पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकर्‍यांच्या नावाने आंदोलकांनी लोकांना जेरीस आणले होते. भगवंत मानच्या पंजाब सरकारने या आंदोलकांना धडा शिकवला. तसेच, अमली पदार्थ व्रिकेत्यांच्या घरावर याच काळात पंजाब सरकारने बुलडोझर फिरवले. ‘उडता पंजाब’ म्हणत, पंजाब राज्याची बदनामी होत असते. मात्र, नशेविरोधात भगवंत मान सरकारने कडक कारवाई केली. आजपर्यंत पंजाबमध्ये निष्क्रियपणेच कारभार चालवणार्‍या भगवंत मान यांच्या सरकार, प्रशासनाने इतकी तत्पतरता कार्यक्षमता का दाखवली असेल? तर राजनैतिक अभ्यासकांचे मत आहे की, भगवंत मान यांना सक्रियता दाखवण्याशिवाय पर्यायच नाही. कारण, आजपर्यंत त्यांची प्रतिमा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या हातचे बाहुले अशीच होती. पंजाब राज्याचे सगळे निर्णय अरविंद केजरीवालच घेत होते, असेच चित्र. मात्र, आता परिस्थिती पालटली आहे. दिल्लीचा सारीपाट केजरीवाल यांनी गमावला आहे. दारुण पराभव झाला. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्न उभे राहिले. सत्ता गेली, त्यायोगे येणारे वैभव, सन्मान, अधिकार सगळे गेले. त्यानंतर अशी आवई उठली की, अरविंद केजरीवाल हे पक्षासाठी पंजाबचे मुख्यमंत्रिपद स्वीकारतील. अरविंद यांना पंजाबचे मुख्यमंत्री व्हायचे, तर पहिल्यांदा भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागेल. नेमके हेच भगवंत मान यांना मान्य नाही. त्यासाठी त्यांनी पंजाबच्या हितासाठी आपण किती तत्पर आहोत, हे दाखवणारे निर्णय घेण्याचा धडाकाच लावला आहे. यासाठी भगवंत मान यांनी अमृतपाल सिंह याच्यावरचा ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्या’अंतर्गत कारवाईचा कालावधी वाढवला नाही. हा खलिस्तानी अमृतपाल दिब्रुगडच्या तुरुंगात शिक्षा भोगतो आहे. पण, भगवंत मान यांच्यामुळे अमृतपालवरची कारवाई तूर्तास टळली. त्यामुळे खलिस्तानीसुद्धा भगवत मान यांना समर्थन देतील, असा अंदाज वर्तवला जातो. एकंदर पंजाबी नागरिकांमध्ये आपली ‘पंजाब दा असली पुत्तर’ ही प्रतिमा रंगवण्यामध्ये भगवंत मान रंगले आहेत. पण, हे त्यांचे रंगणे पंजाबसाठी नाही, तर अरविंद केजरीवालच्या रंगात पंजाब रंगू नये, यासाठी आहे हे नक्की!


दलवाईंची वंशावळ


“औरंग्याला त्याच्या हाताखाली असलेल्या पंडितांनी सांगितले की, संभाजी महाराजांची हत्या ‘मनुस्मृती’मध्ये सांगितल्यानुसार क्रूरपणे कर. त्यामुळे त्याने महाराजांची ‘मनुस्मृती’मध्ये सांगितल्याप्रमाणे, क्रूर हत्या केली,” असा अजब दावा केला तो काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाईंनी. ‘बाटग्याची बांग मोठी’ असे म्हटले जातेे, ते अगदी खरे. औरंग्याचे चित्र सकारात्मक रंगवण्याचा दलवाई यांचा हा प्रयत्न पाहिला की, वाटते ‘तुका म्हणे एशा नरा, मोजूनी माराव्या पैजारा!’ असो. कोणत्याही कृत्याचे खापर पंडितांवर आणि ‘मनुस्मृती’वर फोडले की, मग तर काय आपण मोठे नेता होणार, असा जावईशोध सध्या काही महामूर्ख लोकांना लागला आहे. काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई सध्या याच भूमिकेत आहे. हुसेन दलवाई यांचे म्हणणे वरवर दिसते, तितके मूर्खत्वाचे नाही, तर या विधानाला अनेक कंगोरे आहेत. दलवाईंना वाटते की, ‘मनुस्मृती’ वगैरे नाव घेतले की, हिंदू समाजात मोठे दोन गट पडतील. एक जण ‘मनुस्मृती’ किती चांगली आहे सांगणार, तर दुसरा ‘मनुस्मृती’ किती बेकार, हे सांगणार. या वादात हिंदू समाजात तेढ निर्माण झाली की, हुसेन दलवाई नावाचा काँग्रेसी नेता त्यावर आपली पोळी भाजण्यास सरसावणार. तसेच, दलवाईंच्या विधानात एक अस्पष्ट संदेश आहे. त्यांच्या मते, “औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांना इतक्या क्रूरपणे मारायचेच नव्हते. औरंग्याला तसे करण्यासाठी त्याच्या पदरी असलेल्या पंडितांनी सांगितले होते.” मराठा आणि इतर समाज विरोधात ब्राह्मण (दलवाईंच्या भाषेत ‘पंडित’) यांच्यामध्ये संघर्ष निर्माण व्हावा, असे तर दलवाईंच्या मनात नसेल ना? कारण, महापुरुष आणि श्रद्धास्थानांच्या बाबतीत महाराष्ट्र अत्यंत संवेदनशील आहे. महाराष्ट्राच्या या संवेदनशील श्रद्धावृत्तीचा वापर करून, महाराष्ट्रात असंतोष निर्माण करण्याचे कटकारस्थान देशसमाज विघातक शक्ती नेहमीच करते. तसाच दलवाईंचा डाव असेल का? छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारणार्‍या औरंग्याचा निषेध करण्याची हिंमत दलवाईंमध्ये आहे का? नसणारच! हिंदू समाजातील गटाला लक्ष्य करून दलवाईंनी औरंग्याला आपला बाप मानणार्‍या काही मुसलमानांना खुश केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येप्रकरणी औरंग्याला ‘क्लीनचिट’ देणार्‍या दलवाईंचे आणि औरंग्याचे नाते ते काय? दलवाईंची वंशावळ तपासायला हवी!

९५९४९६९६३८


योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121