मुंबई: ( loan available on Occupier Class 2 land Chandrashekhar Bawankule ) राज्यातील भोगवटादार वर्ग-2 म्हणून जमीन धारण करणार्या शेतकर्यांना बँकांकडून कर्ज मिळविण्यात येणार्या अडचणी दूर करून आता भोगवटादार वर्ग-2च्या जमिनीवर तारणकर्ज देता येणार आहे. याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले आहे.
सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकार्यांनी दि. 11 मार्च रोजी भोगवटादार वर्ग-2च्या जमिनीबाबत बैठक घेऊन हा प्रश्न महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिला होता. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय केवळ एका बँकेपुरता मर्यादित न ठेवता राज्यातील सर्वच भोगवटादार वर्ग-2 खातेधारकांची अडचण लक्षात घेऊन त्यांना भोगावटादार वर्ग-2च्या जमिनी बँकेला तारण घेता येतील, असा निर्णय घेतला. यापूर्वी 1990 मध्ये याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले होते. आता त्याचे स्मरणपत्र महसूल विभागाने निर्गमित केले आहे.
शेतकर्यांच्या हितासाठी जिल्हा बँका शेतकर्यांना कर्जपुरवठा करतात. मात्र, एखादा शेतकरी कर्ज परतफेड करू शकला नाही, तर बँक अडचणीत येते. अशा वेळी बँकेने त्याच्याकडून तारण घेतलेली जमीन भोगवटा वर्ग-2 असेल, तरी त्यावर बोजा चढविता येत नाही, असे बँकांचे म्हणणे होते. त्यामुळे भोगवटादार वर्ग-2च्या जमिनी बँकेकडून तारण ठेवल्या जात नव्हत्या. तसेच शेतकर्यांना कर्जही मिळत नव्हते. आता जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयकृत बँकांनाही या जमिनी तारण म्हणून घेता येणार आहेत. याबाबतचे स्मरणपत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.