रोज रात्री घुबडाच्या आवाजाने सोसायटी दुमदुमते; मुंबईतील 'या' सोसायटीत बहिरी घुबडाचा ठिय्या

    27-Mar-2025   
Total Views |
brown hawk owl



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
गोरेगावच्या गोकुळधाम सोसायटीमधील रहिवाशी मंगळवार दि. २५ रोजीच्या रात्री एका विचित्र आवाजाने जागे झाले (brown hawk owl in gokuldham). या विचित्र आवाजाने सोसायटी परिसर दुमदुमून गेला होता (brown hawk owl in gokuldham). निरीक्षणाअंती हा आवाज बहिरी घुबडाचा असल्याचे लक्षात आले आणि रहिवाशांनी निश्नास सोडला (brown hawk owl in gokuldham). मात्र, एरवी जंगलात अधिवास करणारा हा पक्षी भर वस्तीत शिरल्याने कुतूहल निर्माण झाले आहे. (brown hawk owl in gokuldham)
 
 
गोरेगावची गोकुळधाम सोसायटी मंगळवारी दि. २५ रोजी रात्री झोपी गेली होती. मात्र, रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक विचित्र आवाज सोसायटीच्या आवारातून येण्यास सुरुवात झाली. परिसरात हा आवाज घुमू लागला. रहिवाशांनी घराबाहेर पडून सोसायटीच्या आवारात या आवाजाचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आवाजाची दिशा त्यांनी समजली नाही. तेवढ्यात हा आवाज झाडावरुन येत असल्याचे लक्षात आले. रहिवाशांनी झाडांवर निरीक्षण केला असता, त्याठिकाणी एक पक्षी हा आवाज काढत असल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच स्थानिक पक्षीनिरीक्षक महेश यादव यांना पाचारण केले. त्यांनी या पक्ष्याचे निरीक्षण केल्यावर तो बहिरी घुबड असल्याचे त्यांना समजले. रात्री १० ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत हा घुबड सोसायटीच्या वेगवेगळ्या भागात जाऊन आवाज देत होता.
 
 
 
बहिरी घुबड हे प्रामुख्याने वन अधिवासात राहण्यासाठी ओळखले जाते. मात्र, भरवस्तीत हा पक्षी दिसल्याने हे एक प्रकारचे कुतूहल असल्याचे यादव यांनी सांगितले. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे दुग्ध वसहतीमध्ये बहिरी घुबडाचा अधिवास आहे. त्यामुळे आरेमधून गोकुळधाम सोसायटीमध्ये हे घुबड आल्याची शक्यता आहे.
इतर पक्ष्यांचे डोळे डोक्याच्या दोन्ही बाजूला असतात. मात्र, घुबडांचे डोळे माणसांप्रमाणेच डोक्याच्या समोर असतात. मोठे आणि बटबटीत डोळ्यांमुळे त्याचे दिसणे अपशकूनी मानले जाते. ससाण्यासारखा दिसणारा बहिरी घुबड हा आपल्या बटबटीत पिवळ्या डोळ्यांसाठीच ओळखला जातो. या मोठ्याला डोळ्यांमुळेच रात्री त्याला अंधुक उजेडातही शिकार करता येते.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.