कौटुंबिक अत्याचाराने पीडित महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत जागृत करण्याचे काम निस्वार्थभावे करणार्या अॅड. शुभांगी संदीप सारंग यांच्याविषयी...
‘समाजाचे आपण देणे लागतो,’ हे बाळकडू लहान वयातच मनात रूजल्याने, आपणही समाजासाठी काहीतरी करावे, अशी भावना अॅड. शुभांगी संदीप सारंग यांच्या मनात जागृत झाली होती. आपल्या वडिलांकडे पाहून आणि सिंधुताई सपकाळ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, शुभांगीताई समाजातील कौटुंबिक अत्याचाराने पीडित महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत जागृत करण्याचे काम करीत आहेत. त्यांच हे समाजकार्य सुरू आहे, ते त्यांनी उभ्या केलेल्या ‘जिजाऊ वूमेन लिगल फोरम’च्या माध्यमातून.
तसे पाहिले तर शुभांगीताईंचे बालपण धुळे जिल्ह्यात गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण ‘कनोसा कॉन्व्हेन्ट हायस्कूल’मध्ये झाल्याने साहजिकच त्यांच्यावर इंग्रजीचा जास्त प्रभाव होता. घरात मात्र सर्वजण मराठीतच बोलायचे. त्यानंतर ‘शिवाजी विद्या प्रसारक संस्थे’तून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पूर्वी १८ वर्षे पूर्ण झाली की, आईवडील मुलीचे लग्न लावून निर्धास्त होत. त्यानुसार एकीकडे शिक्षण सुरू असतानाच, १९९८ साली आईवडिलांनी त्यांचे लग्न लावून दिले. आईवडील, पाच भावंडे असे त्यांचे कुटुंब. शिक्षणाची आवड असल्याने परिवारात उच्चशिक्षित असलेल्या शुभांगीताई या एकमेव. त्यांचे वडील समाजसेवक होते. त्यामुळे शुभांगीताईंमध्ये समाजकार्याबाबत आधीपासूनच ओढ निर्माण झाली होती. आपणही समाजासाठी काहीतरी करावे, ही भावना त्यांच्या मनात जागृत झाली.
लग्न झाल्यानंतर शुभांगीताई मुंबईत आल्या. घरात सासू, नणंद, दीर मुलगा आणि पती असे छोटे कुटुंब होते. शुभांगीताईंना भक्कम पाठिंबा त्यांच्या घरातून होताच. पण, मित्रपरिवाराने, गुरूंनी कायमचा मार्गदर्शन देऊन त्यांना एक दिशा दिली. मगाशी म्हटल्याप्रमाणे, सिंधुताईंनी ज्याप्रमाणे अगदी निस्वार्थपणे मुलांचा सांभाळ केला, त्याप्रमाणे शुभांगीताईंना समाजासाठी काहीतरी करावे असे वाटत होते. कायद्याचा अभ्यास करत असताना एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. ती म्हणजे, बर्याच महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना कायद्याची माहिती नसल्यामुळे त्यांच्यावर मानसिक तसेच शारीरिक अत्याचार होतो आणि त्यावर कायद्यामध्ये काय तरतूद आहे, हे त्यांना ठावूक नसते. त्यामुळे आपण जे शिकलो, त्याचा समाजासाठी उपयोग करू शकतो का, असा विचार शुभांगीताईंच्या डोक्यात आला आणि २०१६ साली ‘जिजाऊ वूमेन लिगल फोरम’ची स्थापना झाली. शुभांगीताईंसह मुंबई उच्च न्यायालयातील आठ महिला वकिलांनी महिलांसाठी तयार केलेली ही संस्था. गुरू रवींद्र संकपाळ आणि संदीप डोळस यांचे आशीर्वाद कायम सोबत असल्याचे त्या आवर्जून अधोरेखित करतात.
आजच्या काळात वकिलांना कुठलीही कागदपत्रे दाखवायची म्हटली, तर ती तपासण्यासाठी विशिष्ट फी आकारली जाते, जी सहसा गोरगरिबांना परवडत नाही. मग अशावेळी त्यांचे काय? त्यांच्यासाठी सुरुवातीला ‘मोफत सल्लामसलत’ संस्थेतर्फे सुरू केली. त्यानंतर पुढे प्रामुख्याने कौटुंबिक अत्याचार आणि ज्येष्ठ नागरिक कायदा हे दोन मुद्दे केंद्रस्थानी आले. कौटुंबिक अत्याचाराने पीडित १,७००-१८०० महिला संस्थेच्या संपर्कात आल्या. असे असले तरी कोर्टाची पायरी चढायची म्हटल्यावर त्यातून बर्याचजणी माघारी फिरायच्या. काही महिला तक्रार माघे घ्यायच्या आणि पुन्हा महिनाभराने तिच तक्रार घेऊन परतदेखील यायच्या. अशाने कोर्टात त्यांना न्याय मिळवून देणे कठीण जायचे. समाजातील अशा महिलांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. त्यांची नेमकी चूक कुठे होते, हे या महिलांना समजावून सांगण्याचे काम ही संस्था करते. त्यासोबतच महिलांना त्यांच्या आयुष्यात स्वावलंबी कसे करता येईल, या दृष्टिकोनातून संस्था कृतिशील आहे. ‘जिजाऊ वूमेन लिगल फोरम’च्या माध्यमातून स्वावलंबी झालेल्या आणि स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या राहिलेल्या महिलांची मुंबईत एकूण ७० ते ८० जणांची टीम तयार झाली आहे, ज्या आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्याही इतक्या सजग आहेत की, कुठे कौटुंबिक अत्याचाराची घटना घडताना जाणवली की, त्या संस्थेपर्यंत त्याची माहिती पोहोचवतात.
ज्येष्ठ नागरिकांबाबत सांगायचे झाल्यास, बर्याच ज्येष्ठ नागरिकांना कायद्याने दिलेले हक्क काय आहेत, हे ठावूकच नसते. ज्याप्रमाणे त्यांनी आपल्या मुलांचा सांभाळ केला, त्याचप्रमाणे भविष्यात मुले आपला सांभाळ करतील का? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभे असतात. मग अशावेळी ज्येष्ठ नागरिक कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत, त्याबाबत ज्येष्ठ नागरिकांना समजावून सांगण्याचे कार्य ‘जिजाऊ वूमेन लिगल फोरम’च्या माध्यमातून केले जाते. २०० हून अधिक ज्येष्ठ नागरिक या माध्यमातून संस्थेशी जोडले गेले आहेत. शुभांगीताई ‘सहकार भारती’च्या दक्षिण मुंबई महिला अध्यक्ष झाल्यानंतर महिलांचे सहकार क्षेत्रात काय योगदान असू शकते, याबाबत त्यांनी अनेकांना माहिती करून दिली. त्याचबरोबर समाजाला अध्यात्माची गोडी लागावी, म्हणून संस्थेच्यावतीने २०१८ साली ‘महाशिवपुराण’ आयोजित करण्यात आले होते. अनेकांना याचा फायदा असा झाला की, अनेकजण मानसिक तणावातून मुक्त झाले.
नुकतेच शुभांगीताईंना ‘जागतिक संस्कृती’ आणि ‘पर्यावरण आयोगा’तर्फे ‘डॉक्टरेट’ ही पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावे असले, तरी गरजूंना मदत करत त्यातून मिळणारे समाधान त्यांच्यासाठी पुरस्कारासमान आहे. अॅड. शुभांगी सारंग यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने अनेक शुभेच्छा!
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक