मुंबई : परदेशी गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकीत खंड पडू न दिल्यामुळे भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी ३१७ अंशांची उसळी घेतली आहे. या उसळीमुळे सेन्सेक्स ७७,६०६ अंशांवर थांबला. निफ्टीमध्येही १०५ अंशांची उसळी घेतल्याने निर्देशांक २३,५९१ अंशांवर थांबला. परदेशी गुंतवणुकदारांनी गुंतवणुक कायम ठेवलेली असली तरी भारतीय शेअर बाजारावर अमेरिकी ट्रम्प प्रशासनाच्या आयातशुल्कवाढीचे सावट कायम आहे. गुंतवणुकवाढीमुळे सरकारी बँकिंग क्षेत्राचे शेअर्स वधारले.
गुरुवारी शेअर बाजारात बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, इंडसइंड बँक, एल अँड टी, बजाज फायनान्स या कंपन्यांचे शेअर्स जोरदार वधारले. याउलट टाटा मोटर्स, सन फार्मा, हिंदुस्थान युनिलिव्हर, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअर्सना फटका बसला. स्मॉल कॅप आणि मिडियम कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. बुधवारी ट्रम्प प्रशासनाकडून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तुंवर २५ टक्के कर लादण्यात आला. त्याचे पडसाद शेअर बाजारात वाहन निर्मिती क्षेत्रात उमटले. टाटा मोटर्ससह महत्वाच्या वाहन कंपन्यांचे शेअर्स घसरले.
भारतीय शेअर बाजारातील गुरुवारच्या उलाढालींवर तज्ज्ञांकडून सावध पवित्रा व्यक्त करण्यात आला आहे. देशी संस्थात्मक गुंतवणुकदारांकडून सातत्याने गुंतवणुकीसाठी उत्साह दाखवण्यात येतो आहे. यामागे परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांकडून होत असलेली गुंतवणुक कारणीभूत आहे. ट्रम्प प्रशासनाकडून लादण्यात आलेल्या आयातशुल्कानंतरही भारतीय बाजाराने राखून ठेवलेला विश्वास हा भविष्यातील प्रगतीची नांदी ठरु शकतो. असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.