सायन रुग्णालयाचे ‘मिशन टीबीमुक्त धारावी’

    27-Mar-2025
Total Views | 5

TB-Free Dharavi
 
अमेरिकेतील ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन’ने प्रकाशित केलेल्या आणि मुंबई महानगरपालिकेसह डॉक्टर आणि संशोधकांच्या टीमने तयार केलेल्या एका सविस्तर अहवालानुसार, दरवर्षी सुमारे 300 धारावीकर औषधांना प्रतिरोध करणार्‍या क्षयरोगासाठी पॉझिटिव्ह आढळतात. या पार्श्वभूमीवर क्षयरोगावर मात करण्याचे ‘मिशन टीबीमुक्त धारावी’ या विषयी सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा विशेष संवाद.
 
‘टीबी’च्या प्रतिबंधासाठीचे 100 दिवसांचे ‘मिशन टीबीमुक्त धारावी’विषयी काय सांगाल?
 
‘टीबी’वर अद्याप आपण विजय मिळवू शकलेलो नाही. 1984 मध्ये ‘वॉर ऑन टीबी’ अशी घोषणा केली होती. हे ‘वॉर ऑन टीबी’ विकसनशील देशांत मोठ्या प्रमाणात करावे लागणार, असे जागतिक आरोग्य संघटनेला वाटले होते. यातून एक ते दोन वर्षांत बर्‍यापैकी ‘ट्यूबर क्युलॉसीस’चे (टीबी) रुग्ण हे कमी होतील आणि त्यामुळे लोकांचे जीवन सुसह्य होईल, असे वाटत होते. परंतु, हे युद्ध काही संपले नाही. फुप्फुसाचा टीबी त्याच्यानंतर ‘टीबी’मुळे होणार्‍या वेगवेगळ्या गाठी यासुद्धा बर्‍याच प्रमाणात दिसून येतात. आतड्याचा ‘टीबी’ आणि हाडांचा ‘टीबी’ म्हणजे ज्याच्यामुळे आपले मणके झिजणे अशा तर्‍हेचे प्रकार बर्‍याच रुग्णांमध्ये दिसून येतात. या आजारावर देशाच्या आरोग्य यंत्रणेला बराच खर्च करावा लागत आहे. तसेच या आजारामुळे रुग्णांचे खच्चीकरणही होते. याविषयी निश्चितपणे केंद्र सरकार हे संवेदनशील आहे. या मोहिमेचा उद्देश रुग्णांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांच्या तपासण्या करणे आणि उपचार करणे, असा आहे.
 
मुंबईत या मोहिमेतून समोर आलेली आकडेवारी नेमकी काय दर्शविते?
 
धारावी हा निश्चितच दाटीवाटीचा परिसर. या परिसरात निश्चितपणे ‘टीबी’चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. दुसरी गोष्ट अशी की, ‘मल्टी ड्रग्ज रेजिस्टंट’ या ‘टीबी’चेही प्रमाण याठिकाणी जास्त आहे. ‘टीबी’चा प्रसार हा खोकल्यातून किंवा ज्याला आपण ‘फोमाईट्स’ म्हणतो, त्यामधून होतो. या परिसरातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न फार कमी आहे. त्यामुळे केवळ दाटीवाटीमध्ये राहतात म्हणूनच नाही, तर उत्पन्नही कमी असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. कारण, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती बर्‍याच प्रमाणात कमी असते आणि त्यामुळेही ते ‘टीबी’सारख्या रोगाला बळी पडतात.
अनेक गैरसमजांतून ‘टीबी’वरील उपचारांवर टाळाटाळ केली जाते. हे धारावीत या रोगाच्या फैलावासाठीचे एक प्रमुख कारण आहे, असे तुम्हाला वाटते का?
 
केवळ धारावीमध्येच नव्हे, तर सर्वच ठिकाणी जिथे जिथे लोक अगदी दाटीवाटीने राहतात, तिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही. अशा ठिकाणी जे लोक वास्तव्य करतात, त्यांचे खाणेपिणेही संयुक्तिक नसते. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. अशा लोकांना निश्चितपणे त्रास होतो. दुसरी गोष्ट की, ‘टीबी’ झाला, असे सांगणे किंवा आजूबाजूच्या लोकांना त्याविषयी कळणे, हा आजसुद्धा एक सामाजिक कलंक मानला जातो. त्यामुळे काही वेळा ‘टीबी’चे रुग्ण हे लपवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आरोग्यविषयक जनजागृतीतून त्यांना या आजाराबाबत संयुक्तिकरित्या सांगणे फार महत्त्वाचे आहे. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार किंवा कंट्रोल प्रोग्रॅम आणि महानगरपालिका, हे सर्वजण ‘टीबी’ आजारावरील मार्गदर्शक तत्वांनुसार कार्यरत आहेत. त्याप्रमाणे रुग्णांना मदतही केली जाते. परंतु, ‘टीबी’च्या रुग्णाने याविषयी आजूबाजूला कळू न देणे किंवा ‘टीबी’च्या दवाखान्यात गेला होता, असे जर कोणाला कळले, तर आपल्याला समाजातून बहिष्कृत केले जाईल, यामुळे ‘टीबी’चे रुग्ण ‘अनडिटेक्टेड’ राहतात किंवा ते औषधोपचारासाठी पुढाकार घेत नाहीत.
बरेचदा असाही प्रश्न पडतो की, ‘टीबी’वरील उपचार खासगी रुग्णालयांत घ्यावे की सरकारी?
 
एक गोष्ट निश्चित आहे की, रुग्णांनी सुयोग्य डॉक्टरकडे गेले पाहिजे. आता ‘टीबी’च्या तपासण्या होतात. पूर्वी एक्स-रे काढला आणि एक्स-रेमध्ये ‘टीबी’सदृश एखादी ‘लिजन’ दिसली की आपण त्या रुग्णावर ‘टीबी’चे उपचार सुरू करायचो. कदाचित ते सयुक्तिक नव्हते. परंतु, आता ‘टीबी’च्या चाचण्या बर्‍याच अंशी प्रगत आहेत. या तपासण्या निश्चितच महागड्या आहेत. मात्र, महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये किंवा इतर ‘स्पेशल टीबी ओपीडी’मध्ये या तपासण्या मोफतही उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णाया यासाठी प्रत्येक वेळी मोठ्या रुग्णालयांमध्ये खेटे घालावे लागणार नाहीत. त्याच्या जवळच्या ‘टीबी’ सेंटरमधूनही रुग्णाला योग्य ती तपासणी आणि औषधांचा पुरवठा होऊ शकतो. त्यामुळे अतिश्रीमंत माणूस असेल, तर त्यांनी खासगी रुग्णालयामध्ये जावे, मात्र जर मध्यमवर्गीय किंवा जे ‘पिवळे रेशनकार्ड’ आणि ‘केशरी रेशनकार्ड’ धारक आहेत, अशांनी सरकारी, महानगरपालिकेच्या दवाखान्यात येऊन उपचार घेणे फायदेशीर आहे.
‘टीबी’ची उपचारपद्धती नेमकी काय? हा आजार पूर्ण बरा होतो का?
 
फुप्फुसासाठी साधारण सहा महिन्यांचे उपचार आहेत. उदाहरणार्थ, हाडांच्या ‘टीबी’साठी कधी कधी नऊ महिने ते 12 महिने इतका अवधी लागू शकतो. अनेकदा आपण 18 महिन्यांपर्यंतसुद्धा उपचार करतो. अनेकदा ‘टीबी’चे उपचार केल्यानंतर इतर काही समस्या उद्भवतात; म्हणजे एखाद्याचे यकृताचे कार्यही बिघडू शकते. एखाद्याला उलट्यांचा त्रास जाणवू शकतो, तर अशा वेळी काही वेळा काही ठराविक औषधे बंद करून किंवा डोस हळूहळू पुन्हा चालू करून उपचार करावे लागतात. यामुळे उपचारांचा कालावधी वाढूही शकतो. एखादा रुग्ण त्यामुळे सात महिन्यांत बरा होईल, असे नाही. पण, योग्य पद्धतीने त्याच्या रोगाचे निदान झाले आणि योग्य डोसेसमध्ये त्या रुग्णाला औषधे मिळाली, तर तो रुग्ण निश्चितपणे बरा होतो.
 
‘टीबीमुक्त धारावी’ हे मिशन कसे राबविले जात आहे?
 
धारावीमध्ये ‘एकनाथराव गायकवाड रुग्णालया’त आमचे ‘अर्बन हेल्थ सेंटर’ आहे. याठिकाणी ‘कम्युनिटी हेल्थ मेडिसिन’ची जी शाखा आहे, त्या ठिकाणी ‘रेग्युलर कम्युनिटी ओपीडी’ आम्ही चालवतो. यासोबतच धारावीत ‘एक्झिक्युटिव्ह हेल्थ ऑफिसर’च्या माध्यमातून ‘टीबी’ची स्पेशल ओपीडी आठवड्यातून दोन ते तीन दिवस चालवली जाते. यात ‘प्रिव्हेंटिव्ह अ‍ॅण्ड सोशल मेडिसिन’ या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही लहान मुलांना पोषक आहार देण्याचा प्रयत्न करतो. याठिकाणी ‘स्पेशल न्यूट्रिशन’चे डॉक्टर आहेत. आम्ही तिथे ‘वेलनेस क्लिनिक’ चालवतो. यांच्या माध्यमातून साध्या साध्या गोष्टींमध्ये म्हणजे ‘डायटरी रियाबिलिटेशन’ म्हणजे शेंगदाणा किंवा ज्याच्यामध्ये प्रथिने मिळतील ते खा, प्रथिने, पोषणमूल्ये कसे मिळवावे, याविषयी मार्गदर्शन केले जाते. विशेषतः महिलांना आणि लहान मुलांना मार्गदर्शन केले जाते.
धारावीकरांच्या निरोगी आरोग्यासाठी पुनर्विकास प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. याकडे तुम्ही कसे पाहता?
 
पुनर्विकास प्रकल्प आणि त्याची आर्थिक व्यवहार्यता हे धोरणात्मक स्तरावरील निर्णय आहेत. परंतु, निश्चितपणे एखादा माणूस जर झोपडपट्टीतून चांगल्या एखाद्या घरात राहायला गेला, जिथे त्याला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, मुबलक सूर्यप्रकाश, ऊन जिथे व्यवस्थित मिळू शकते, स्वच्छ हवा मिळू शकते, तर निश्चितपणे कोणत्याही नागरिकाच्या, रुग्णाच्या दृष्टीने हे चांगलेच आहे. यासाठी पूर्वी अशी एक संकल्पना होती की, ‘टीबी’ची ‘सॅनिटोरियल’ ठिकाणी जसे की, महाबळेश्वर, पाचगणी अशा मोकळ्या ठिकाणी असायची. मात्र, आज ही संकल्पना मागे पडली आहे. आज आपल्याकडे प्रभावी औषधे उपलब्ध आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121