भंपक ‘शेठ’
‘करून करून भागला आणि देवपूजेला लागला’ अशी उबाठा गटाच्या भास्कर जाधव यांची गत. पण, त्यांची कुकर्मे विसरून जातील, इतके महाराष्ट्रातील लोक विसरभोळे नाहीत. विधानसभेचा विरोधी पक्षनेता होण्यासाठी त्यांनी ना ना तर्हेचे प्रयत्न करून पाहिले, पण ते अयशस्वीच ठरले. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या घटिकेपर्यंत ते आशावादी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांनी शेवटपर्यंत पायघड्या घातल्या, भर सभागृहात त्यांचे तोंडभरून कौतुक वगैरेही केले. देवाभाऊ राग विसरतील आणि पदरात घेतील, अशी त्यांना अपेक्षा होती. पण, भास्करशेठनी आपल्या श्रद्धास्थानांनाच दुखावले म्हटल्यावर त्यांना माफी देतील, ते फडणवीस कसले?
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भास्कर जाधव यांच्या जिभेला हाडच उरले नव्हते. राजकीय मंच असो वा विधिमंडळाचे सभागृह, त्यांनी भल्याभल्यांना डिवचले. हद्द तेव्हा झाली, जेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विधानसभेत नक्कल केली होती. विरोधात असलेल्या भाजपने त्यांना ताकदीनिशी विरोध केला खरा; पण सत्ता नसल्यामुळे मर्यादा आल्या. पुढे दिवस बदलले, उद्धव ठाकरेंची खुर्ची गेली. यंदाच्या विधानसभेत तर सुपडा साफ झाला. विरोधी पक्षनेता होण्यासाठी लागणारे संख्याबळही मिळवता आले नाही. त्यामुळे पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी देवाभाऊंचा धावा करण्यापलीकडे गत्यंतर नाहीच. दस्तुरखुद्द उद्धवरावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन विनवण्या कराव्या लागल्या. बरे, भास्करशेठऐवजी अन्य कोणाचे नाव असते, तर देवाभाऊ कदाचित राजी झालेही असते, पण भाजपच्या 12 आमदारांना निलंबन करणारा, मोदींची नक्कल करणारा, भाजपच्या हिंदुत्वावर द्वेषपूर्ण टिप्पणी करणारा माणूस विरोधी पक्षनेता म्हणून कसा मान्य होऊ शकतो? हे कळल्यामुळेच भास्करशेठनी तलवार म्यान केली आणि ‘मी नको असेन, तर दुसर्या कोणाला संधी द्या, पण विरोधी पक्षनेता आजच जाहीर करा,’ अशी भूमिका घेतली. विधानसभा अध्यक्षांना तशा प्रकारचे पत्र गेल्याशिवाय मान्यता मिळणे अशक्यच. तरीही जाधव यांनी सभागृहात ‘पराचा कावळा’ केला. गरागरा हातवारे करून नौटंकीबाज बतावणी केली की, लोक खोट्याला खरे मानतात, असा बहुदा त्यांचा समज झाला असावा. पण, त्यांच्या बतावणीला भुलेल, इतकी महाराष्ट्रातील जनता अज्ञानी नाही!
चंपक ‘विजू’
नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार म्हणजे ‘कार्टुन नेटवर्क’वरील जणू उंदरा-मांजराची जोडीच! त्यांचे कारनामेही तसेच. नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्षपद काढल्यावर ते वडेट्टीवारांनाच मिळेल, असे कयास अनेकांनी बांधले. परंतु, हायकमांडने त्यांना सबुरीचा सल्ला दिला. त्यामुळे सर्वाधिक खुश झाले ते नानाच. पण, त्यांची खुशी फारकाळ टिकली नाही. नितीन राऊतांना विधानसभेचे गटनेते करायचे नसल्याने वडेट्टीवारांच्या गळ्यात माळ घालण्यात आली. साहजिकच नानांच्या पुढची खुर्ची विजूभाऊंना मिळाली, नाना दुसर्या रांगेत ढकलले गेले. त्यात आव्हाडांच्या शेजारची जागा मिळाल्याने नाखुशीत आणखीनच भर!
वडेट्टीवारांना बाजूला केल्याशिवाय पक्षात पूर्वस्थान मिळणार नाही, याची कल्पना आल्याने नानांनी संपूर्ण अधिवेशनभर त्यांच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न केला. ‘मीच किती हुशार’ हे ते पदोपदी दाखवत राहिले. पण, विजूभाऊंच्या आवाजापुढे त्यांचे काही चालले नाही. वडेट्टीवार मोठ्या आवाजात बोलतात, म्हणजे आपल्यापेक्षा काहीतरी चांगले करतात, असा समज नानांनी करून घेतला आणि अस्तित्त्वात नसलेल्या नियमांचा आधार घेत भाषणबाजी केली. त्याने हसे होण्यापलीकडे काहीच साध्य झाले नसले, तरी नानांना आत्मसमाधान मिळाले, हे खरे! बरे, या टिवल्या-बावल्यांच्या लढाईने मनोरंजन होऊन कामाचा क्षीण जात असल्यामुळे बहुदा देवाभाऊंनी नानांना चिमटा काढला आणि वडेट्टीवारांना विधिमंडळ समितीवर घेतले. अत्यंत महत्त्वाच्या अशा लोकलेखा समितीच्या अध्यक्ष पदावर त्यांच्या नियुक्तीचे आदेश नुकतेच काढण्यात आले.
लोकलेखा समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षातील असावा, असा संकेत असल्याने नाना पटोले, नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड, सुनिल प्रभू आणि अजय चौधरी इच्छुक होते. त्यांनी तशी मोर्चेबांधणीही केली होती. काहीजण खासगीत मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींना भेटून आले. पडद्याआडून मदत करण्याची ऑफरही दिली. पण, असल्या भंपकांना कवेत घेतील, ते देवाभाऊ कसले? या पदावर विजय वडेट्टीवारांना संधी देत त्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले. नाना आणि विजूभाऊंमधील गृहयुद्ध कायम ठेवलेच, पण हिंदूद्वेषींना जवळ करणार नाही, हा संदेशही दिला.