मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भजन गायिका शहनाज अख्तर (Shehnaaz Akhtar) यांनी उत्तर प्रदेशातील बांदा येथे आयोजित बांदा महोत्सवात सादर केलेल्या भक्तीगीतांनी अनेकांची मने जिंकली. मात्र यानंतर जे घडले ते अनेकांना भारावून टाकणारे होते. शहनाज यांनी आपली कहाणी सर्वांसमोर मांडली, ज्यात आयुष्यभर त्यांना कशाप्रकारे कट्टरपंथींच्या त्रासाला सामोरे जावे लागले, याबाबत सांगितले.
शहनाज म्हणतात, सनातन धर्म हीच त्यांची ओळख आहे. त्या हिंदू देवी-देवतांचे भजन गातात आणि त्यांची पूजा करतात, म्हणून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला खूप काही सहन करावे लागलेय. समाजातील काही लोकांनी हिंदू देवतांचे भजन गाण्याबद्दल त्यांना नरकात जाण्याची धमकी सुद्धा दिली आहे. जेव्हा त्यांनी सनातन धर्म स्वीकारला आणि भजने गायला सुरुवात केली तेव्हा मुस्लिम समाजातील कट्टरपंथीयांनी त्यास विरोध केला होता.
मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील बरघाट येथे एका मुस्लिम कुटुंबात शहनाज यांचा जन्म झाला. त्यांचे आयुष्य तेव्हा बदलत गेले जेव्हा त्या लहानपणी एका गणेश मंदिरात लाडू खरेदी करण्यासाठी गेल्या. तेथील भजन, कीर्तन ऐकून त्यांचे मन सनातन धर्माकडे ओढले गेले. वयाच्या १० व्या वर्षी त्यांनी हिंदू देवी-देवतांचे भजन गायला सुरुवात केली. मात्र त्यांच्या समाजातील लोकांचा यास विरोध होता. हळूहळू परिस्थिती इतकी बिकट झाली की त्याच्या घरावर हल्ला झाला. त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली.
मधल्या काळात शहनाज यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. नुकताच एक रील व्हायरल झाला होता ज्यामध्ये त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शहनाज यांनी आतापर्यंत ७५ हून अधिक भजन अल्बम रिलीज केले आहेत. त्यांचा पहिला अल्बम २००५ मध्ये रिलिज झाला होता, तेव्हापासून त्या चर्चेत आहेत.