गिरणगावच्या हिंदू नववर्ष शोभायात्रेत 'मराठी भाषेचा जागर'

    27-Mar-2025   
Total Views |

Girangaon Shobha Yatra 2025

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Girangaon Shobha Yatra 2025)
‘गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान’च्या वतीने यंदाच्या हिंदू नववर्ष शोभायात्रेतून मराठी भाषा 'स्व'त्वाच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचे प्रतीक यांचा जागर होणार असल्याची माहिती आहे. रविवार, ३० मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या या शोभायात्रेत पारंपरिक प्रात्यक्षिकांसह अनेक चित्ररथांचा सहभागही असणार आहे.

हे वाचलंत का? : भजन गातात म्हणून इस्लामिक कट्टरपंथींनी....; वाचा शहनाज अख्तरची थक्क करणारी जीवनकहाणी

परळ येथील श्री स्वामी समर्थ मठातून ३० मार्च रोजी सकाळी ८ वाजता नववर्ष स्वागताच्या शोभायात्रेची सुरुवात होईल. 'गिरणगावाचा राजा' चिंचपोकळी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुक्ता जयहिंद सिनेमागृह येथे समारोप होईल.
या शोभायात्रेत शिवकालीन देखावा (गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान लालबाग – परळ), अभिजात मराठी (स्वयंसिध्दा महिला मंडळ परळ), हिंदूपदपादशाही (आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ), अमृत गोडी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ('आपली सोसल वाहिनी' अर्थात आसोवा - मराठी युट्युब चॅनेल), एकमेकां साहाय्य करू । अवघे होऊ श्रीमंत।। (मराठी उद्योजक - सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट) असे चित्ररथ असणार आहे.

तसेच 'भारतमाता पालखी', पथनाट्य(आसोवा - मराठी युट्युब चॅनेल) महाराष्ट्रातील दांडपट्टा, लाठीकाठी अशा पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिके, मल्लखांब, ढोलताशा हे शोभायात्रेचे मुख्य आकर्षण असणार आहे. या शोभायात्रेत आशियाई महिला कबड्डी स्पर्धा-२०२५ मध्ये अजिंक्यपद पटकावणाऱ्या भारतीय कबड्डी महिला संघाची कर्णधार सोनाली विष्णू शिंगाटे त्याचप्रमाणे ‘दगडी चाळ’- १-२ , ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ‘दुनियादारी’, ‘फक्त लढ म्हणा’ असे सिनेमे व ‘थोडं तुझं थोडं माझं’, ‘आभास हा’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ अशा मालिकांत अभिनय करणारे चंद्रकांत ऊर्फ बंटी विष्णू कणसे या दोघांना गिरणगाव भूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक