नवी दिल्ली: ( CBI raids Congress leader Bhupesh Baghel for Mahadev Satta App case ) ‘महादेव सट्टा अॅप’ प्रकरणात ‘सीबीआय’च्या पथकाने छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह दिल्ली, भोपाळ आणि कोलकाता यांसह चार राज्यांमध्ये 60 ठिकाणी छापे टाकले आहेत.
छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, त्यांचे दोन ओएसडी आशिष वर्मा आणि मनीष बंछोर, त्यांच्या माजी सचिव सौम्या चौरसिया, आ. देवेंद्र यादव, निवृत्त आयएएस अनिल तुतेजा आणि आनंद छाब्रा, अभिषेक पल्लव, आरिफ शेख, प्रशांत अग्रवाल या चार आयपीएस अधिकार्यांच्या घरांवरही छापेमारी झाली. ‘सीबीआय’ने एएसपी संजय ध्रुव आणि दोन कॉन्स्टेबल नकुल आणि सहदेव यांच्या घरावरही छापे टाकले आहेत. रायपूर, दुर्ग आणि भिलाई येथे दहाहून अधिक पथकांनी कारवाई केली आहे.
काही दिवसांपूर्वी दि. 10 मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छत्तीसगढमधील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित ‘मनी लॉण्ड्रिंग’ प्रकरणाच्या संदर्भात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या मुलासह इतरांच्या घरांवरदेखील छापे टाकले. भिलाई येथील चैतन्य बघेल आणि राज्यातील काही इतर व्यक्तींच्या परिसराची ‘मनी लॉण्ड्रिंग प्रतिबंधक कायद्या’च्या (पीएमएलए) तरतुदींनुसार झडती घेण्यात आली होती.