मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या देशाच्या संविधानाने मला तो हक्क दिला आहे. मला तुरुंगात टाकले, याचाच अर्थ संविधानाचा अपमान झाला आहे. संविधानाचा हा अपमान होताना देश गप्प का?” ही वाक्ये वाचून वाटले असेल की, आपल्या देशातल्या ‘भारत तोडो गँग’मधले कुणाचे तरी वाक्य असेल ना? पण, तसे नाही. हे वाक्य आहे, अमेरिकेच्या मोहम्मद खलीलचे. अमेरिका असो की भारत, समाजविघातक, देशविघातक कृत्ये करून त्यावर पडदा टाकण्यासाठी संविधानाचे नाव घ्यायचे, हे जगभर सुरू आहे, असेच दिसते.
असो. कोण आहे हा मोहम्मद खलील? पॅलेस्टाईनचा निर्वासित असलेला, जन्माने सीरियन, मात्र अमेरिकेचा नागरिक असलेला मोहम्मद खलील. कोलंबिया विद्यापीठामध्ये तो पदव्युत्तर शिक्षण घेत होता. ‘हमास’ने इस्रायलवर क्रूर हल्ला केल्यानंतर इस्रायलने ‘हमास’ला उद्ध्वस्त करण्याची शपथच घेतली. ‘हमास’चे दहशतवादी, त्यांचे नेते कुणाकुणालाही इस्रायलने सोडले नाही. इस्रायलने ‘हमास’वरची कारवाई थांबवावी. जोपर्यंत ‘हमास’ ही कारवाई थांबवत नाही, तोपर्यंत अमेरिकेने इस्रायलशी संबंध ठेवू नयेत. इस्रायलवर निर्बंध लादावेत, यासाठी अमेरिकेतील गाझासमर्थक विद्यार्थ्यांनी कोलंबिया विद्यापीठाचा ताबा घेतला, हिंसा केली, तोडफोड केली. भयानक वातावरण निर्माण झाले. मात्र, अमेरिकन प्रशासनाने हे आंदोलन महत्प्रयासाने मोडून काढले. या आंदोलनाचा प्रमुख विद्ध्वसंक नेता म्हणून मोहम्मद खलील याला अमेरिकेने अटक केले.
ज्यावेळी पोलीस यंत्रणा त्याला अटक करत होती, त्यावेळी तो म्हणत होता की, कोलंबिया विद्यापीठातील आंदोलनाचे नेतृत्व तो करत नव्हता. तो तर या आंदोलकांच्या आणि विद्यापीठाच्या मधला शांतीस्थापनेतील दुवा होता. पण, याच मोहम्मद खलीलला अटक झाली आणि जेव्हा त्याला तुरुंगात धाडण्यात आले, तेव्हा त्याला कळून चुकले की, शिक्षा तर भोगावी लागणारच. त्यामुळे मग तो म्हणाला, “मी राजकीय कैदी आहे. त्यामुळे मला सगळ्या सोयीसुविधा पाहिजेत.” मोहम्मद खलीलचे हे वागणे म्हणजे त्याचे काही एकट्याचे वागणे नाही. आपणच मोठे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कैवारी, म्हणत मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या बुरख्याआड काही लोक (अपवाद क्षमस्व) ज्या देशात राहतात, त्याच देशाच्या प्रगती आणि शांततेविरोधात षड्यंत्र रचतात. देशाला अस्थिर करतात. त्यांच्या कृत्यावर कारवाई झाली की मग हे लोक देशाच्या संविधानाचा दाखला देतात. आता मोहम्मदने कितीही अमेरिकन स्वातंत्र्याचा दाखला दिला, तरीसुद्धा अमेरिकेच्या काय, भारताच्या संविधानामध्येसुद्धा देशविरोधी षड्यंत्र रचणार्या विधानांना आणि कृत्यांना अभिव्यक्ती स्वतंत्र्य मानता येतच नाही.
तर अशा या मोहम्मदला अमेरिकेने तत्काळ सोडावे, यासाठी पॅलेस्टाईनमध्ये मोजक्या लोकांनी शांतिपूर्ण आंदोलने सुरू केली. मात्र, नेमके याचवेळी ‘हमास’चा प्रवक्ता अब्देल लतीअप अल क्वानोआ आणि त्याच्यासोबत आठजणांचा इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्यात मृत्यू झाला आहे. नेमके याच काळात शेकडो गाझावासी रस्त्यावर उतरलेत. गाझामधून ‘हमास’ने बाहेर पडावे, यासाठी हातात पांढरे निशाण घेऊन हे शेकडो लोक म्हणत आहेत, “आम्हाला जिवंत राहायचे आहे. गाझामधून बाहेर निघा. बाहेर निघा ‘हमास’, बाहेर निघा. युद्ध बंद करा; इस्रायलबंदींना सोडा.” या पार्श्वभूमीवर ‘हमास’ आणि त्याचे खलीलसारखे त्याचे जगभरातले चेले यांचे काय होणार? तर खलील आता म्हणत आहे की, त्याची अमेरिकन पत्नी आठ महिन्यांची गरोदर आहे. तिचे काय होणार? त्यांच्या बाळाचे काय होणार? इथे एक लक्षात घ्या की, गाझा पट्टीतला निर्वासित असलेला मोहम्मद अमेरिकेत येतो, नामांकित विद्यापीठामध्ये शिक्षण घेतो, विद्यार्थी आहे, स्वतः स्कॉलरशिपवर जगतो, मात्र त्याचवेळी अमेरिकन मुलीशी विवाहही करतो आणि त्या जोरावर अमेरिकेचे नागरिकत्वही मिळवतो. हे सगळे करत असताना, तो अमेरिकेमध्ये राहून खाऊन, शिकून मोजमौजा करून अमेरिकेच्या विरोधात कृत्येही करतो. असे मोहम्मद खलील जगभरात आहेत. त्यांचा अलतकिया समजून घेणे गरजेचे!