स्वत:च्या समस्यांपासून सुटका झाल्यानंतर, त्यातूनच प्रेरणा घेत इतरांचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे असते. मराठवाड्यातील एकल महिला संघटनेशी जोडलेल्या असंख्य महिला, आज हेच कार्य करत आहेत. यामध्ये आशालता पांडे यांचे कार्य लाखमोलाचे. आशालता यांच्या माध्यमातून एकल महिला संघटनेच्या कार्याचा घेतलेला आढावा...
मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई हे शहर प्रसिद्ध आहे. तेथील मंदिरांमुळे दूरवरून भाविक मंडळी, तिथे दर्शनासाठीं येत असतात. गेल्या 50 वर्षांत अंबेजोगाईला एक आणखी विशेष वारसा लाभला, तो ‘शैक्षणिक पंढरी’ होण्याचा. अल्पावधीतच या शहराने दर्जेदार शिक्षणामुळे, उभ्या महाराष्ट्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला. अशा या अंबेजोगाईच्या नावलौकिकात आता वैशिष्ट्यपूर्ण भर पडली, ती ‘आशा’ उपक्रमामुळे. योगायोग म्हणजे अंबेजोगाईच्या या आशादायी उपक्रमाची प्रयत्नशील सुरुवात करणार्या महिलेचे नावसुद्धा आशाच आहे.
आशालता पांडे या अंबेजोगाईच्या. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. त्यानंतर दोन मुलींसह आशालता यांना एकटे सोडून, त्यांचा नवरा घर सोडून गेला तो कधीही परत न येण्यासाठीच. परिणामी, ‘आता तुला कसे वाटते’, इथपासून ते ‘आता तुझे कसे होणार?’ या आणि अशा प्रश्नांचा ससेमिरा त्यांच्यामागे लागला, तो कायमचाच.
यावर तोडगा व उदरनिर्वाहाचे साधन म्हणून, आशालता पांडे यांनी ‘आशा’ कर्मचारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. काम तसे आव्हानपर होतेच. मात्र, त्यांनी आपली जिद्द आणि प्रयत्न सुरूच ठेवले.तशातच त्यांची गाठ चित्राताई या समवयीन व समदुःखी सखीशी पडली. चित्राताईंची ओळख व सहवास यांतून, आशालतांच्या जीवनाचे चित्रच पालटून गेले. त्यांच्या जीवनाला नवे वळण आणि दिशा मिळाली होती.
चित्राताईंच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनामुळे आशालता, महिला स्वयंसाहाय्यता बचतगटाच्या सदस्य, कार्यकर्त्या झाल्या. महिला स्वयंसाहाय्यता बचतगटाच्या व्यवस्थेतून, आशालता यांना ‘महिला मूलभूत नेतृत्व क्षमता विकास’ अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला. या अभ्यासक्रमाचा मुख्य फायदा म्हणजे, आशालता यांना त्यांच्यासारख्या महिलांच्या हक्कांची जाणीव झाली. पतीच्या मिळकतीत त्यांचा कायदेशीर वाटा त्यांना हक्क स्वरुपात मिळू शकतो, हे सुद्धा समजले.
प्रत्यक्षात आशालता यांच्या सासर्यांकडे पिढीजात घर होते. आशालता यांना या घरामध्ये रीतसर हिस्सा हवा होता, जो त्यांना कायद्याने मिळाला. त्यांच्या यासाठीच्या प्रयत्नांना, मराठवाड्यात महिला जागृती व हितरक्षणासाठी काम करणार्या व विविध कारणांनी एकाकीपणे जीवन जगणार्या ‘एकल महिला संघटने’चे विशेष साहाय्य व मार्गदर्शन लाभले. या संघटनेच्या सदस्य महिलांची मराठवाड्यातील संख्या सुमारे 22 हजार आहे, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. या सदस्य महिलांना संस्थेतर्फे त्यांच्या एकाकीपणाच्या पार्श्वभूमीवर, स्वावलंबनासह सन्मानाने जगण्यासाठी हरसंभव मदत केली जाते.
‘एकल महिला संघटने’ची स्थापना मराठवाड्यात सुमारे दहा वर्षांपूर्वी झाली. संघटनेचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड व धाराशिव या जिल्ह्यांपुरते आहे. आशालता या संस्थेच्या महिला अत्याचारविरोधी विभागासाठी सक्रियपणे कार्यरत असून, त्यादृष्टीने त्यांचे महिला जागृतीचे काम सुरू आहे.
संस्थेच्या कार्यकर्तृत्वामुळे व सक्रिय प्रयत्नांतून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात आवाज उठविण्याबरोबरच महिलांना मार्गदर्शन करणे, त्यांना सामाजिक अवहेलनेपासून मुक्तता देणे, कौटुंबिक हिंसाचारप्रसंगी संरक्षण व मार्गदर्शन करणे, कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे, गरजूंच्या निवासाची व्यवस्था करणे व या महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी रोजगार-स्वयंरोजगारविषयक मदत व मार्गदर्शनही केले जाते.
आजमितीस संस्थेशी संबंधित सुमारे 500 संलग्न संस्था, महाराष्ट्र व राजस्थानमध्ये कार्यरत आहेत. या संस्थांना स्थानिक स्वयंसेवी संस्थांचीही साथ मिळत असते. संस्थेतर्फे ‘पीडित महिलेच्या प्रश्नांची महिलांकरवी सोडवणूक’ हे ध्येयवाक्य निश्चित करण्यात आले असून, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. याचा लाभही संबंधित महिलांना होत आहे, हे विशेष.
याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून, महिला सक्षमीकरण प्रबळ करण्याच्या उद्देशाने ’महिला नेतृत्व सक्षमीकरण’ हा उपक्रम विशेषत्वाने राबविण्यात येत आहे. संस्थेतर्फे ’महिलांद्वारा महिलांचे नेतृत्व’ या विषयावरील विशेष प्रशिक्षण आयोजित केले जाते. गेल्या सुमारे दहा वर्षांत या नेतृत्व विकासविषयक प्रशिक्षणाचा लाभ सुमारे 69 टक्के सदस्य महिलांनी घेतला असून, त्याद्वारे महिलांमधूनच सक्रिय नेतृत्वाची एक मोठी फळीच तयार झाली आहे. यामध्ये ग्रामीण व मागासवर्गीय समाजातील महिलांची संख्या मोठी आहे. बालपणापासून वा प्रसंगी लग्न झाल्यानंतरही विविध प्रकारे संधी नाकारल्या जाण्यापासून, वार्यावर सोडल्यागत जीवनाला एकाकीपणे सामोरे जाणार्या या महिलांमधून आता कार्यरत व करारी नेतृत्व पुढे येत आहे.
महिला नेतृत्व क्षमता विकास उपक्रमाला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि त्याचे तळागाळातील गरजू महिलांवर होणारे सकारात्मक परिणाम पाहता, या अभ्यासक्रमाला अधिक व्यापक व परिणामकारक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार या अभ्यासक्रमाची नव्याने रचना करण्यात आली आहे. त्यानुसार आता महिला नेतृत्व क्षमता विकास अभ्यासक्रमाला महिलांच्या मूलभूत व कायदेशीर हक्कांप्रति जनजागृतीच्या माध्यमातून प्रबोधन करणे, त्याची अंबलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शकांना प्रशिक्षित करणे, महिलांना आपल्या अडचणी व व्यथा मांडण्यासाठी त्यांना संवादविषयक प्रशिक्षण देणे, त्यांना अधिक साक्षर करणे, आर्थिक व्यवहारांची मूलभूत माहिती देणे, महिला सुरक्षाविषयक विविध मुद्द्यांसंदर्भात जागृती करून, त्यानुसार कृती करणे इ. विविध मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.
आता तर ‘एकल महिला संघटने’मुळे महिला सुरक्षा व गरीब आणि गरजू महिलांसाठीच्या विभिन्न लाभदायी सरकारी योजनांचा लाभ, आता महिलांना सहजशक्य झाला आहे. याचा लाभ विशेषतः एकाकी राहणार्या वा एकटेपणे जीवन जगणार्या महिलांना होत आहे. मुख्य म्हणजे, अशा लाभार्थी महिलांना आता आर्थिक फायद्यांद्वारे सुरक्षा व स्वावलंबन प्राप्त झाले आहे. त्यांच्या कौटुंबिक व सामाजिक स्तरांमध्ये सुधारणा झालेली दिसून येत आहे. त्यातूनच या महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे.
कधी घरगुती व कौटुंबिक स्तरावर विविध समस्यांना सामोरे जावे लागलेल्या राजस्थानच्या ग्रामीण भागातील टीना रावत यांनी, महिलांपुढे उभ्या ठाकणार्या अत्याचाराच्या समस्यांचा सामना करण्यासाठी जिद्दीने पदवीचे शिक्षण आणि त्यानंतर कायद्यातील पदवी घेतली. आज त्या राज्याच्या विभिन्न भागांत केवळ महिला अत्याचाराप्रकरणीच वकिली करत असून, अशा महिलांना न्यायालयातून त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतात. एका महिलेच्या तक्रारप्रकरणी न्यायनिवाडा करताना स्थानिक न्यायालयाने, टीना रावत यांची जिद्द आणि प्रयत्न म्हणजे घुंघटपासून काळ्या कोटापर्यंतचे मोठे परिवर्तन असल्याचे आवार्जून नमूद केले आहे.
‘एकल महिला संघटने’ची स्थापना झाल्यापासून या संघटनेने गेल्या दशकाभरात, महाराष्ट्र व राजस्थानातील सुमारे 250 तालुक्यांपर्यंत आपल्या कामाचा विस्तार केला आहे. या क्षेत्रातून संस्थेने 1 हजार, 600 महिलांना नेतृत्व विकासाचे प्रशिक्षण दिले आहे. याचा लाभ, तीन हजारांहून अधिक गावांमधील गरजू महिलांना मिळाला आहे. यातूनच प्रशिक्षित झालेल्या गरजू महिला आपल्या वैयक्तिक समस्यांवर यशस्वीपणे मात करत आहेत. महाराष्ट्रात आज 22 महिला आपापल्या क्षेत्रातील अन्याय व अत्याचारग्रस्त महिलांची, त्यांच्या समस्यांपासून यशस्वीपणे सुटका करतानाच, या महिलांमधूनही आशादायी नेतृत्व निर्माण करीत आहेत.
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
9822847886