भारतीय संस्कृतीत आजही निसर्गाचे महत्त्व अबाधित आहे. अगदी आहारापासून ते रोजच्या जीवनशैलीपर्यंत प्रत्येक बाबतीत निसर्गाशी आपला ऋणानुबंध जुळला आहे. पोषक आहाराच्या दृष्टीन अशीच गोष्ट म्हणजे, भरडधान्य अर्थात मिलेट्स. भरडधान्याचे वैशिष्ट्य असे की, यांच्यात भरपूर पोषणमूल्ये असूनही त्यांच्याकडे इतकी वर्षे कोणाचेच फारसे लक्ष गेले नव्हते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून जगभर ओळखले गेले. पोषणकारी भरडधान्यांच्या प्रेरणेतून मिहीर देसाई यांनी ‘प्रोलेट्स’ या स्टार्टअपची मुहूर्तमेढ रोवली. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत...
कुठल्याही स्टार्टअपसाठी महत्त्वाचे असते, ती म्हणजे त्याची सुरुवातीची कहाणी, तर आपल्या ‘प्रोलेट्स’च्या जन्माची कथा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल...
‘प्रोलेट्स’ हे भरडधान्य म्हणजे श्रीधान्यांवर काम करणारे स्टार्टअप. ‘दापोली कृषी विद्यापीठा’तून मी ‘फूड इंजिनिअरिंग’मध्ये ‘बी.टेक.’ केलं. त्यामुळे या क्षेत्राची माहिती होती. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणापासूनच आपण नोकरी वगैरे न करता, व्यवसायाच्या दृष्टीनेच पावले उचलावीत, असे वाटत होते. त्याच दरम्यान मिलेट्सबद्दल कुतूहल वाढलं आणि त्याची माहिती घ्यायला सुरुवात केली. त्यातूनच मिलेट्सच्या क्षेत्रात काहीतरी करावे, असा विचार आला आणि त्यामधून मी आणि माझा मित्र संकेत पाटील यांनी या ‘प्रोलेट्स’ची सुरुवात केली. अशा प्रकारे आमचे स्टार्टअपच्या प्रवासात पहिले पाऊल पडले.
प्रारंभीच्या काळात आपल्याला उद्योग-व्यवसाय सुरू करताना फारशी माहिती नसते. त्यामुळे आपण जेव्हा व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आपल्याला कोणाचे मार्गदर्शन लाभले? आणि त्याचा तुम्हाला नेमका कसा फायदा झाला?
जेव्हा या मिलेट्सच्या व्यवसायात उतरायचं ठरवलं, तेव्हा हैदराबाद येथे ‘आयआयएमआर’ (Indian Institute of Millets Research) या संस्थेअंतर्गत एक ‘न्यूट्रीहब’ या नावाने एक संस्था आहे. त्याचे संचालक असलेले दयाकर राव सरांचे मार्गदर्शन सुरुवातीच्या काळात लाभले. तिथे व्यवसाय उभारणीचे प्रशिक्षण आम्हाला मिळाले. त्याचाही सुरुवातीच्या काळात निश्चितच उपयोग झाला.
खाद्यपदार्थांचा व्यवसाय म्हटलं की, बर्याच परवानग्या, तसेच तपासण्या, त्यांचे पॅकेजिंग यांचा समग्र विचार करणे क्रमप्राप्त, तर ‘प्रोलेट्स’ या तुमच्या स्टार्टअपमध्ये नेमकी उत्पादन ते विक्री ही प्रक्रिया नेमकी कशी चालते?
जेव्हा आम्ही सुरुवात केली, तेव्हा आमच्या हे लक्षात आलं की, या क्षेत्राची समस्या उत्पादन तयार करणं नाही, तर विकणं ही आहे. त्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, पॅकेजिंग. त्यासाठी मी आणि माझा भागीदार असलेला मित्र संकेत पाटील आम्ही पॅकेजिंगवर लक्ष केंद्रित केलं. कुठल्याही फूड प्रॉडक्ट्सच्या क्षेत्रात त्याचे ‘शेल्फ लाईफ’ हा मुद्दा महत्त्वाचा. कुठल्याही प्रिझर्वेटिव्हजशिवाय आम्ही आमची उत्पादने तयार करतो. प्रोटिन आणि मिलेट्स यांच्या एकत्रीकरणातून तयार होते म्हणूनच त्याचे नाव ‘प्रोलेट्स’ असे आहे. सध्या ‘रेडी टू इट’ या प्रकारात ‘प्रोलेट्स’ची दहा उत्पादने सध्या बाजारात उपलब्ध आहेत. तसेच ‘रेडी टू कूक’ या प्रकारातही ‘प्रोलेट्स’ उत्पादनांची निर्मिती करते.
एक छोटासा स्टार्टअप ते स्वतःचे प्रोसेसिंग युनिट, या प्रवासाविषयी काय सांगाल? मुळात ही संकल्पना कशी सूचली आणि त्यासाठी लागणारी आर्थिक जुळवाजुळव कशी केली?
सुरुवातीला आम्ही इतरांनी उत्पादित केलेली, पण आमच्या ब्रॅण्डला अनुकूल अशीच उत्पादने विकण्यास प्रारंभ केला. त्यातून ‘अॅमेझॉन’सारख्या ऑनलाईन माध्यमांचाही उपयोग झाला. जवळपास दोन-अडीच वर्षे अशा पद्धतीने काम केल्यावर, एक आत्मविश्वास निर्माण झाला की, आपणसुद्धा स्वतः उत्पादन निर्मिती करु शकतो. तेव्हा आम्ही सरकारच्या ‘प्राईम मिनिस्टर फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग इंटरप्राइजेस स्कीम’ या नावाने असलेल्या योजनेचा लाभ घेतला. यामध्ये एक कोटींपर्यंत ‘प्रोजेक्ट रिपोर्ट’ द्यावा लागतो आणि या योजनेतून सरकारचे सहकार्य मिळते. एकूण कर्जाच्या 35 टक्के रक्कम ही सरकारकडून आपल्याला अनुदान स्वरुपात प्राप्त होते. या योजनेसाठी लागणार्या आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करून हे अनुदान मिळवले व त्यातून आमचे प्रोसेसिंग युनिट उभे राहिले.
कुठल्याही मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीला व्यवसाय उभा करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी उद्योजकाला सर्वांत महत्त्वाचा ठरतो तो कुटुंबीयांचा पाठिंबा. तेव्हा, या व्यवसायाविषयी कुटुंबीयांची प्रतिक्रिया होती आणि त्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळाला का?
कुठल्याही व्यावसायिकाला व्यवसाय सुरू करताना घरच्यांचा पाठिंबा महत्त्वाचाच. त्यासाठी एक हजार दिवसांचे चक्र लक्षात घ्या. हे एक हजार दिवस आपण घरी काही फार पैसे देऊ शकणार नाही, याची कल्पना कुटुंबीयांना द्यावी. त्यांना पूर्णपणे विश्वासात घ्यावे. जर घरच्यांना आपण योग्य कल्पना दिली, तर ते नक्कीच आपल्याला सहकार्य करू शकतात. घरच्यांचा पाठिंबा हा कायमच आवश्यक असतो. मग ती नोकरी असो की व्यवसाय, आपल्याला तो असायला हवा. त्यामुळे आम्हाला घरच्यांचा पाठिंबा मिळवताना फारशा अडचणी आल्या नाहीत.
आजवरचा ‘प्रोलेट्स’चा प्रवास हा यशस्वी ठरला आहे. तेव्हा भविष्यात व्यावसायिक संधी आणि विस्ताराच्या दृष्टीने काय लक्ष्य निर्धारित केले आहे?
आमच्यासाठी आता सर्वांत महत्त्वाचे आहे ते, देशातील कानाकोपर्यात ऑनलाईन माध्यमातून पोहोचणे. देशातील महत्त्वाची शहरे, जसे की मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद यांसारख्या शहरांत आता व्यवसायविस्ताराचे नियोजन आहे. या मोठ्या शहरांच्या पलीकडे जाऊन निमशहरी भागांतही आम्हाला व्यवसायविस्ताराच्या संधी खुणावत आहेत. परदेशांतही निर्यात वाढवणे, त्यासाठी आवश्यक पॅकेजिंग, किमतीतील फरक यांसारख्या गोष्टी पुढच्या आराखड्यांमध्ये आहेत. अशा प्रकारे व्यवसायवृद्धीचे लक्ष्य आहे.
हर्षद वैद्य