अनसुऱ्यातल्या देव गिरेश्वरच्या कुशीत सापडली गोगलगाईची नवी प्रजात; 'ही' आहेत वैशिष्ट्य

    26-Mar-2025   
Total Views |
snail species discovered from ansure



मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि किनारपट्टीजवळच्या पश्चिम घाटातील वनांमधून गोगलगाईच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (snail species discovered from ansure). देव गीरेश्वर मंदिर (अनसुरे , रत्नागिरी), उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान (चिखली, चिपळूण-गुहागर रस्ता, रत्नागिरी), केशरनाथ विष्णू मंदिर (शेडवई, रत्नागिरी) आणि फणसाड अभयारण्य अशा कोकणातील वेगवेगळ्या भागात ही प्रजात आढळल्याने तिचे नामकरण ‘थिओबालडियस कोंकणेंसिस' असे करण्यात आले आहे. (snail species discovered from ansure)
 
 
संशोधकांनी महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमधील काही ठिकाणी २०२१ साली गोगलगायींच्या संदर्भात सर्वेक्षण केले होते. त्यावेळी त्यांना ही प्रजाती राजापूर तालुक्यातील अनसुरे गावाजवळ असलेल्या देव गिरेश्वर मंदिराच्या बाजूला असणाऱ्या झाडीत ओलसर पाळापाचोळयामध्ये आढळून आली. ही प्रजाती थिओबालडियस वंशामध्ये असणाऱ्या इतर गोगलगाईंच्या प्रजातींपेक्षा संशोधकांना वेगळी जाणवली. तिच्या शंखाच्या आणि शंखाच्या झाकणावरच्या काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमुळे संशोधकांनी तिला वेगळ्या श्रेणीत ठेवले. या नव्या प्रजातीच्या शंखाची रचना, त्याची लांबी, रुंदी, शंखाच्या तोंडाजवळ असलेली विशिष्ट प्रकारच्या खाचेची उठावदार कडा आणि शंखाच्या झाकणावर असलेल्या छोट्या काट्यांसारख्या रचना, ही वैशिष्ट्य पश्चिम घाटात आढळणाऱ्या थिओबालडियस ट्रिस्टीस या प्रजातीपेक्षा वेगळी असल्याचे आढळून आले. त्यामुळे ही प्रजात नवी असण्यावर शिक्कामोर्तब झाले. मोलुस्कन रिसर्च (Molluscan Research) या न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये या संशोधनाचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. दहिवडी कॉलेजचे प्रा. डॉ. अमृत भोसले, ठाकरे वाइल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकर, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. ओमकार यादव, नॅचरल हिस्ट्री म्युझियम लंडनचे संशोधक डॉ. टॉम व्हाइट आणि राजराता विद्यापीठ श्रीलंकाचे संशोधक डॉ. दिनारझार्दे रहीम यांनी ही प्रजात शोधून काढली आहे.
 
 
 
‘थिओबालडियस कोंकणेंसिस' ही गोगलगाय समुद्रसपाटीपासून ८० ते २४० मीटर उंचीवरील सदाहरित आणि अर्ध-सदाहरित जंगलांमध्ये आढळते. कोकणातील गोगलगाईंबद्दल अद्याप तुलनेने कमी संशोधन झाले आहे. ही प्रजाती जैवविविधतेसाठी महत्त्वाची असून तिचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. स्थानिक परिसंस्थेमध्ये या नवीन प्रजातीची भूमिका समजून घेण्यासाठी गोगलगाईंवर आणखी संशोधन करण्याची गरज आहे.


कोकणच्या जंगलांमध्ये आढळणाऱ्या अनेक गोगलगाय प्रजाती या स्थानिक आहेत, म्हणजे त्या जगात इतरत्र कोठेही आढळत नाहीत. थियोबाल्डियस कोंकणेंसिस ही प्रजाती केवळ कोकणातील विशिष्ट भागातच आढळते. त्यामुळे ही प्रजाती देखाल कोकणच्या निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. त्यामुळे तिच्या संवर्धनासाठी योग्य पावले उचलणे अत्यंत महत्त्वाचे आहे." - तेजस ठाकरे, संशोधक

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121