शालेय विद्यार्थ्यांना भारतीय मातीतील संस्कारांची आणि महापुरुषांची ओळख करून देण्याच्या हेतूने २००३ साली मोहन सालेकर आणि त्यांचे चार सहकारी एकत्र आले आणि मूल्य शिक्षण उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. या ईश्वरी कार्यात एकूण दोन हजार साधक कार्यकर्ते ३ हजार ७०० शिक्षक आणि चार हजार परीक्षक सहभागी आहेत. आज संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे नीतिमूल्य संवर्धनाचे काम डिजिटल माध्यमातून २३ प्रांतात सुरू आहे. प्रतिष्ठानच्या अमूल्य कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
तत्कालीन राज्य शासनाने त्यावेळी प्रत्येक शाळेसाठी मूल्यशिक्षणाची तासिका अनिवार्य केली होती. त्यामुळे प्रत्येक शाळेच्या वेळापत्रकात पहिली तासिका म्हणून ‘मूल्यशिक्षण’ असे लिहिलेले असायचे. प्रत्यक्षात ती तासिका कागदावरच राहिली. कारण, शासनाने आदेश काढला, पण त्यासाठी पूरक पाठ्यक्रम बनवलाच नाही. ही कमतरता आपण भरून काढावी, असे ठरवून प्रतिष्ठानच्यावतीने पहिल्या वर्षी फक्त इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कथारूप रामायण’ नावाची एकच कथा पुस्तिका तयार केली. शाळांना संपर्क केला. त्यांना सांगितले, शासन जी दहा मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजावीत, अशी अपेक्षा करते, त्यांपैकी बहुतांश मूल्य रामायणातील कथांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ शकतात. रामायणाचे नाव घेतल्याबरोबर त्यांची धर्मनिरपेक्षता धोक्यात आल्याचे जाणवले. शेवटी महत्प्रयासाने मुंबईतील १०७ शाळांच्या विश्वस्तांना आणि मुख्याध्यापकांना समजावण्यात आम्ही यशस्वी झालो. पहिली पायरी तर पार पडली. पण, विश्वस्तांनी स्पष्ट सांगितले, तुम्ही शिक्षकांना पटवून देऊ शकलात, तरच ही योजना आम्ही राबवू, अन्यथा हा उपक्रम घेता येणार नाही. आमच्यासमोर यक्षप्रश्न उभा राहिला. त्यातून मार्ग काढण्यासाठी शिक्षक कार्यशाळेचे आयोजन केले. शाळांनी प्रत्येकी किमान एक शिक्षक पाठवावा, अशी त्यांना हात जोडून विनवणी केली आणि अखेर पहिली शिक्षक कार्यशाळा दि. ७ जून २००३ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत दादरच्या विठ्ठल मंदिर सभागृहात आयोजित केली.
आमच्या डोक्यावर हे का बरे मारतात, असाच भाव सगळ्यांच्या चेहर्यावर होता. त्यांना आम्ही एक अर्ज दिला आणि कार्यक्रमपूर्व अभिप्राय देण्याची विनंती केली. त्यांचे दडपण दूर व्हावे, म्हणून त्यांना सांगितले की, अभिप्राय द्या, पण आपले नाव लिहू नका. मोकळेपणाने व्यक्त व्हा. त्या कार्यशाळेला एकूण ११७ शिक्षक हजर होते. सगळ्यांनीच आमच्यावर टीकेची झोड उठवली होती. ‘तुम्ही आमच्या विश्वस्तांच्या माध्यमातून आमच्यावर दबाव आणता आणि नाईलाजाने आम्हाला यात सहभागी व्हावे लागते. तुम्हाला काय वाटते, शिक्षकांना काही काम नाही, आम्ही रिकामटेकडे आहोत, अशा प्रकारची सर्व मुक्ताफळे त्यांनी कार्यक्रमपूर्व अभिप्राय पत्रकात उधळली होती. प्रत्यक्ष कार्यशाळा सुरू झाली. तीनही सत्रे मोहन सालेकर यांनीच घेतली आणि कार्यशाळा संपल्यावर त्या सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा अभिप्राय देण्यास सांगितले. तीन तासांच्या कार्यशाळेने चमत्कार घडला होता. सुरुवातीच्या अभिप्रायात टीकेची झोड उठवणारे सर्व शिक्षक या उपक्रमात शिक्षक म्हणून आणि काहीजण शिक्षक-कार्यकर्ता अशा दुहेरी भूमिकेत सहभागी होण्यास तयार झाले.
‘एक दीप से जले दुसरा’ या न्यायाने कार्यकर्ते जोडले जाऊ लागले. शाळांची, विद्यार्थ्यांची आणि पालकांची मागणी होऊ लागली. “अहो, आमचा विद्यार्थी पुढल्या वर्षी वरच्या वर्गात जाईल. त्याच्यासाठी नवीन कथापुस्तिका हवी.” या प्रेमळ आग्रहातून इयत्तानिहाय कथापुस्तिका तयार झाल्या. सातव्या इयत्तेपर्यंत कथापुस्तिका झाल्या होत्या. यावर्षी उपक्रमाला २१ वर्षे पूर्ण होत आहेत. इयत्ता चौथी ते आठवीच्या प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र कथापुस्तिका तयार केल्या आहेत. इयत्ता चौथीसाठी ‘कथारूप रामायण’, इयत्ता पाचवीसाठी ‘संतकथा’, इयत्ता सहावीसाठी ‘चरित्र रामायण’, इयत्ता सातवीसाठी ‘कथारूप महाभारत’ आणि इयत्ता आठवीसाठी ‘क्रांतिगाथा’ अशा पुस्तिका महाराष्ट्रात मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषांमध्ये तयार केल्या आहेत. या उपक्रमाची महाराष्ट्राबाहेर व्याप्ती वाढावी, असा विचार सुरू असतानाच, मार्च २०२० मध्ये ’कोरोना’ने घाला घातला. अशा विपरित स्थितीतही प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हतबल झाले नाहीत. संकटाचे संधीत रूपांतर करायचे, अशा जिद्दीने कार्यकर्ते कामाला लागले. संपूर्ण उपक्रम डिजिटल स्वरूपात तयार केला. त्यावर आधारित सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेतली.
कोरोनापूर्वी महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला हा उपक्रम डिजिटल माध्यमामुळे २३ प्रांतांत पोहोचला. त्या त्या प्रांतातील भाषेत या कथा पुस्तकांचा अनुवाद करण्यात आला. आज कोकण, प. महाराष्ट्र, विदर्भ, देवगिरी, दक्षिण गुजरात, उत्तर गुजरात, सौराष्ट्र मालवा, मध्य भारत, जोधपूर, उत्तर राजस्थान, अवध, काशी, दक्षिण कर्नाटक, उत्तर कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, बिहार, जम्मू, उत्तराखंड, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी नैतिक शिक्षण उपक्रम सुरू आहे. या शैक्षणिक वर्षात संपूर्ण देशभरातील ३ हजार, ५०० शाळांचे तीन लाख विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. यात मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मीय विद्यार्थ्यांचाही लक्षणीय सहभाग आहे. प्रत्येक राज्यात पाठ्यक्रम समान असला, तरी कार्यवाही करणारी त्या त्या प्रांतातील अशासकीय सामाजिक संस्था आहे.
विद्यार्थ्यांना या गोष्टींची गोडी लागावी, यासाठी विविध स्पर्धांचे आयोजनही जिल्हा पातळीवर करण्यात येते. या शैक्षणिक वर्षाच्या उत्तरार्धात म्हणजे जानेवारी २०२५ मध्ये सहभागी विद्यार्थ्यांसाठी वस्तुनिष्ठ परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रत्येक शाळेतील प्रत्येक इयत्तेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी ३ हजार, २५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि १ लाख, २५ हजार विद्यार्थ्यांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संस्थेच्या कार्यपद्धतीतील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यात, शहरात अथवा तालुक्यात हा उपक्रम चालतो, त्या सर्व ठिकाणी संघटनात्मक बांधणी होते. प्रत्येक ठिकाणी ११ जणांची समिती निर्माण करण्यात येते. आज प्रत्येक प्रांतात, जिल्हा, प्रखंड स्तरावर मिळून १२७ समित्या कार्यरत आहेत. समितीचे सदस्य दर आठवड्याला एकत्र येतात. सत्संग होतो आणि सहभागी शाळांशी सतत संपर्क ठेवण्याची योजना ठरते. समितीच्या सर्व सदस्यांसाठी दोन स्तरीय प्रशिक्षणाची व्यवस्थाही केलेली आहे.
यावेळी मार्च महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात ५७ ठिकाणी पारितोषिक वितरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात एकूण १८ हजार नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. मुंबई, ठाणे येथील कार्यक्रमात सुप्रसिद्ध ‘पितांबरी’ उद्योग समूहाचे डॉ. रवींद्र प्रभूदेसाई, ‘प्रशांत कॉर्नर’चे प्रशांत सकपाळ, वाहतूक व्यावसायिक महेश जोशी, माजी खा. जगन्नाथ पाटील, ‘विहिंप’ आणि संघाचे पदाधिकारी सदर कार्यक्रमांना उपस्थित होते. नैतिक शिक्षण उपक्रमाव्यतिरिक्त अन्य दोन विषय प्रतिष्ठानने हाती घेतले आहेत. एक विषय आहे, कुटुंब प्रबोधनाचा आणि दुसरा विषय आहे, सेवावस्त्यांमध्ये संस्कारवर्गांची साखळी उभी करण्याचा. महाराष्ट्रातील ५७ सेवावस्त्यांमध्ये साप्ताहिक संस्कारवर्ग चालविले जातात. आज मानवतेच्या कल्याणाचा विचार मांडणार्या भारतीय संस्कृतीचा ध्वज उंच धरण्यासाठी समाजातील सज्जन शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे. “माझ्या धर्मासाठी, संस्कृतीसाठी मी आठवड्यातील किमान दोन तास देईन,” असा संकल्प आपल्यापैकी प्रत्येकाने केला, तर खर्या अर्थाने स्वामी विवेकानंदांच्या मनातील वैभवसंपन्न भारत, सुसंस्कारित भारत निश्चितच साकार होईल.
९८२०३४४४९०