चलो जलाये दीप वहा: बिर्‍हाड परिषद

    26-Mar-2025
Total Views |

article reviews on birhad parishad
 
 
 
देव, देश आणि धर्मासाठी झटणारा, स्वातंत्र्ययोद्धा आणि संस्कृतीरक्षक असा भटके-विमुक्त समाजबांधवांचा पूर्वेतिहास आहे. समाजबांधवांना यथोचित सन्मान मिळावा, यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातात. या अनुषंगाने समाजासाठी दि. २० फेब्रुवारी व दि. २१ फेब्रुवारी रोजी नागपूर येथील गिट्टीखदान भागातील मैदानावर ‘भटके-विमुक्त कल्याणकारी परिषद’, विदर्भ प्रांतद्वारा बिर्‍हाड परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचा मागोवा घेणारा हा लेख...
 
परम पवित्र भारतमातेला जर वैभवाच्या शिखरापर्यंत न्यायचे असेल, तर पोटाला कोरभर तुकडा मिळविण्यासाठी दगड फोडणारे, नाचणारे, गाणारे, कसरत करणारे, अर्धनग्न अवस्थेत असणारे पुरुष आणि त्यांच्या पायाला घोटणारी, खांद्यावरच्या झोळीत लटकणारी कुपोषित बालके. नेहमीच उपेक्षित अशा या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. या समाजाला सन्मानाचे जगणे मिळवून देण्यासाठी ‘भटके-विमुक्त विकास परिषदे’ची पायाभरणी झाली. भटक्या विमुक्तांसह अवघा हिंदू समाज संघटित झाला पाहिजे. ‘भटके-विमुक्त कल्याणकारी परिषदे’च्या माध्यमातून भटके समाजबांधवांच्या वस्तीवर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे, वस्तीतील समाज बांधवांसोबत राहून त्यांना समजून घेणे, त्यांना मदतीचा हात देणे, यातूनच एक भावनिक नाते हळूहळू दृढ होत गेले. आज या कार्याला एक मूर्त स्वरूप यायला लागले आहे. परंतु, हे कार्य करत असताना प्रत्येक वेळी स्वयंसेवकांच्या मनात हाच भाव आहे की, पाल टाकून उघड्यावर राहणारी ही माणसे माझी आहेत. ते आमच्या कुटुंबाचा एक घटक आहेत. विदर्भात नाथजोगी, बहुरूपी, बेलदार, पांगुळ, कैकाडी, नंदीवाले, वैदू, वडार, गोसावी, गोपाळ, मांग-गारुडी, गोंधळी, वासुदेव, ओतारी, धनगर, वंजारी, सरोदे-जोशी, नंदीबैलवाले, पारधी, सोनझारी, मसणजोगी, चित्रकती, लोहार, काशीकापडी, मसनजोगी, बंजारा समाजबांधव वास्तव्याला आहेत. त्यांच्यासाठी ‘भटके विमुक्त कल्याणकारी परिषद’, विदर्भ प्रदेश विविध उपक्रमांद्वारे कार्यरत आहे.
 
ही परिषद शिक्षण, महिला सशक्तीकरण, स्वावलंबन (रोजगार), आरोग्य, सन्मान आणि समस्या निवारण या सहा आयामांवर कार्य करते. आमच्या या भटके समाजबांधवांसाठी बिर्‍हाड परिषद हे एक स्नेहमिलनच. २०१० पासून दर दोन वर्षांनी बिर्‍हाड परिषदेचे आयोजन केले जाते. आजपर्यंत एकंदर सहा बिर्‍हाड परिषदांचे आयोजन करण्यात आले. भटके बांधव आपापली बिर्‍हाडे घेऊन परिषदेच्या ठिकाणी येतात.अस्तित्वाकरिता भटके समाजबांधवांनी एकत्र येणे, संवाद घडवून आणणे आणि समाजाच्या रितीभातींची माहिती या भटक्यांना व्हावी, मुख्य प्रवाहासोबत त्यांना जुळवून घेता आले पाहिजे, हा या आयोजनाचा मुख्य उद्देश. याच समाजातून पुढे चांगले शिक्षण घेऊन उच्च पदांवर असणार्‍या अधिकारी, खेळाडू, उद्योजक, यांचे मार्गदर्शन या बिर्‍हाड परिषदेत उपस्थित समाजबांधवांना लाभते.
 
दि. २० फेब्रुवारी व दि. २१ फेब्रुवारी रोजी नागपूर येथील गिट्टीखदान भागात असलेल्या मैदानावर ‘भटके-विमुक्त कल्याणकारी परिषद’, विदर्भ प्रांतद्वारा आयोजित बिर्‍हाड परिषद अतिशय व्यवस्थित आणि नीटनेटकी पार पडली. या बिर्‍हाड परिषदेला विदर्भातील सर्वच म्हणजे अकराही जिल्ह्यांतून भटके-विमुक्त समाजबांधवांनी हजेरी लावली होती. हजाराच्या संख्येत एकत्र आलेल्या या २१ जातींच्या भटके-विमुक्त समाजबांधवांनी कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊन आनंद लुटला. वेगवेगळ्या गावांहून आलेले भटके समाजबांधव, ज्यांची भाषा वेगळी, राहणीमान वेगळे, व्यवसाय वेगळा असलेली जवळपास ३५० बिर्‍हाडे आली होती. आबालवृद्धांची संख्या १ हजार, ३२७ अशी होती. दोन दिवसीय बिर्‍हाड परिषद ज्या भागात आयोजित केली होती, त्या परिसराला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर परिसर’ असे नाव देण्यात आले होते. यानिमित्ताने उपस्थित सर्व भटके समाज बांधवांना अहिल्या देवी होळकर यांचे नाव माहीत झाले. तसेच त्यांची ३००वी जयंती आहे, हे सांगण्यात आले. या बिर्‍हाड परिषदेला अखिल भारतीय घुमंतू कार्यप्रमुख श्री दुर्गादासजी व्यास पूर्ण वेळ उपस्थित होते.
 
भव्य मंचावर विदर्भातील भटक्या समाजबांधवांचे प्रतिनिधित्व करणार्‍या समाजबांधवांचे चित्र असणारा फलक सर्वांचे लक्ष विधून घेत होता. २७ फूट उंच धर्म ध्वजाची स्थापना करून बिर्‍हाड परिषदेची सुरुवात झाली. एका स्वतंत्र दालनात भव्यदिव्य अशी प्रदर्शनी लावण्यात आली होती. भटके विमुक्त समाज आतील क्रांतिवीर, नायक यांची छायाचित्रांसह सविस्तर माहिती असलेले मोठे फलक लावलेले होते. भटके समाजबांधवांचे भावविश्व दाखविणारे तसेच ‘भटके-विमुक्त कल्याणकारी परिषदे’चे आजवरचे कार्य, उपक्रम व वाटचाल दाखविणारी छायाचित्रे प्रदर्शित केली होती. पाथरवट समाजाने तयार केलेल्या दगडाच्या मूर्ती व साहित्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. भटक्या समाजातील तरुणांनी तयार केलेल्या ढोल-ताशा पथकाने मान्यवरांचे स्वागत केले. भारतमातेच्या पूजनाने उद्घाटन सत्राला प्रारंभ झाला. यावेळी परिषदेतर्फे चालविल्या जाणार्‍या पालावरची शाळाच्या विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेचा १५वा अध्याय मुखोद्गत सादर केला. सर्वांनी खूप कौतुक केले.
 
भारत सरकारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओद्वारा शुभेच्छा संदेश प्रसारित करण्यात आले. ‘पद्मश्री’ गिरीश प्रभुणे यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे प्रसारण झाले. याप्रसंगी आपल्या ‘भटके विमुक्त कल्याणकारी परिषदे’मार्फत प्रयागराज येथील कुंभमेळ्यात विदर्भाचे भटक्या समाजबांधवांचे प्रतिनिधित्व करणारे श्री योगेश्वर पुरी महाराज आणि मेहकरचे श्री समाधान गुर्‍हाळकर महाराज यांचा सत्कार करण्यात आला. गौरव मूर्ती म्हणून भटकेविमुक्त समाजातीलच शिक्षित आणि होतकरू मान्यवरांसोबतच विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळविलेले उद्योजक, इंजिनिअर, डॉक्टर, कीर्तनकार तसेच आपली कला अजूनही जोपासून ठेवलेल्या मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. भटके समाजबांधवांसाठी कृती आराखडा तयार करून प्रत्येक जिल्हा स्तरावर नोडल अधिकार्‍यांची नेमणूक करून विविध शिबिरांच्या माध्यमातून या भटके जातीजमातीच्या शिक्षण, रोजगार, आरोग्याच्या समस्या सोडविण्यात येतील, असे प्रतिपादन कार्यक्रमात सहभागी अतिथींनी केले.
 
नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच नागपूर महानगर पालिका आयुक्त यांनी आवर्जून या बिर्‍हाड परिषदेला भेट दिली. या बिर्‍हाड परिषदेत वेगवेगळ्या जिल्ह्यांनी आपापल्या जिल्ह्यांचे वैशिष्ट्य दर्शविणारे तसेच तेथील प्रमुख दैवत आणि तेथील जातीसमूह यांचे फलक लावले होते, हे विशेष. या बिर्‍हाड परिषदेत विविध सत्रांतून आपल्या भटके समाजबांधवांच्या समस्या जाणून घेतल्या गेल्या. जातप्रमाणपत्र, घरकुल यांवर सविस्तर चर्चा झाली. तरुण मंडळी त्यात प्रामुख्याने सहभागी झाले. रात्री भोजनोत्तर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. परिषदेला उपस्थित कलाकारांनी आपली कला सादर केली. यात बहुरूपी, गोंधळी, वडार, मसनजोगी, गोपाळ समाजबांधवांनी आपापल्या वेशभूषेत येऊन सर्वांचे मनोरंजन केले. गोपाळ समाजबांधवांनी विविध कसरती करून आपल्या पारंपरिक व्यवसायाची चुणूक दाखवून दिली.
 
दि. २१ फेब्रुवारीला सकाळी ढोलताशा, संबळ, किंगरी, पुंगी अशा वाद्यांच्या गजरात शोभायात्रा मार्गस्थ झाली. दीड किमीचे अंतर पार करायला एक तासाचा अवधी लागला. शोभायात्रेत सर्वांनी दोन-दोनच्या रांगेत आपआपले साहित्य घेऊन व वेशभूषा करून सर्वांची मने वेधून घेतली. गिट्टीखदान परिसरात ही शिस्तीत निघालेली शोभायात्रा कौतुकाचा विषय ठरली. महिलांसाठी कुटुंब प्रबोधन, तर तरुणांसाठी रोजगार मार्गदर्शन ‘महाज्योती’तर्फे आयोजित केले गेले. महाराष्ट्र राज्याच्या विविध मंत्रि महोदयांसोबत जवळून व समोरासमोर चर्चा करण्याची संधी अनेकांना मिळाली. ‘भटके विमुक्त कल्याणकारी परिषदे’तर्फे सातत्याने सरकार दरबारी प्रयत्न करून काहींची जातप्रमाणपत्रे तयार करण्यात आली. मंत्र्यांचे हस्ते काही विद्यार्थ्यांना जातप्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. उपस्थित सर्व समाजबांधवांच्या साक्षीने मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले.
 
भटके जातीजमातीच्या लोकांना जात व जातवैधता प्रमाणपत्र देण्याच्या अटींमध्ये शिथिलता देऊन गावकुसाबाहेर राहणार्‍या कुटुंबाना पक्की घरे बांधून द्यावीत, अत्यावश्यक असलेली शासकीय प्रमाणपत्रे तातडीने उपलब्ध करून द्यावीत, असा ठराव पारित करण्यात आला. त्याची प्रत मंत्री महोदयांना देण्यात आली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण भारतातून आलेले भटक्या समाजबांधवांचे निवडक प्रतिनिधी दोन्ही दिवस उपस्थित होते. बिर्‍हाड परिषद ही केवळ विदर्भातच आयोजित केली जाते, हे उल्लेखनीय आहे. सर्वांचे पंक्तीभोजन झाले. सामाजिक समरसतेचा भाव सर्वजण अनुभवीत होते. दोन्ही दिवस आरोग्य शिबीर लावण्यात आले होते. ‘महाज्योती’तर्फे युवकांसाठी मार्गदर्शन केंद्र उभारण्यात आले होते. ही बिर्‍हाड परिषद पर्यावरणपूरक ठरली. बिर्‍हाड परिषदेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला, एक शबनम-पिशवी व त्यात स्टीलचे ताट आणि पेला देण्यात आले. प्लास्टिकचा वापर टाळण्यात आला. नागपूर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवाविभाग आणि परिसरातील वडार वस्तीतील सर्व समाजबांधवांचे शेकडो हात या बिर्‍हाड परिषदेच्या यशासाठी कार्यरत होते.
 
‘भटके विमुक्त कल्याणकारी परिषद’, सर्वच भटके समाजबांधवांसाठी कार्य करते, सर्वांना एका छताखाली आणते, हे सगळ्यांसाठीच नावीन्यपूर्ण होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा भटका समाज बांधव १०० - २०० किमी अंतर पार करून बिर्‍हाड परिषदेला येतो. तिथे आपल्या कुटुंबासाठी ५० रुपये नोंदणी शुल्क भरतो, शिस्तीत आपापली पाल टाकतो. पालावरच्या शाळेत जाणारी नीटनेटकी पोरे मंत्री महोदयांचे बिर्‍हाडातच औक्षण करून स्वागत करतात, व्यासपीठावर सहज वावरणारे आपल्यातीलच कार्यकर्ते प्रत्येक वक्त्याला शांततेने ऐकून घेणारा आणि तितक्याच आत्मीयतेने किंबहुना आक्रमकतेने आपल्या व्यथा समोर मांडणारा हा हजाराहून अधिक संख्येने उपस्थित समाजबांधव. खरोखरीच अवर्णनीय आणि अकल्पनीय असेच सारे. या बिर्‍हाड परिषदेदरम्यान भटक्या समाजबांधवांनी दाखविलेली शिस्त आणि स्वच्छता कौतुकास्पद आहे. ‘आमचे बिर्‍हाड हेच आमचे तीर्थ, हाच आमचा महाकुंभ’ अशी भावना काहींनी व्यक्त केली. आम्हाला मुख्य प्रवाहात सामावून घ्यावे, अशी साद घालत, भटक्या समाजबांधवांची पावले आपापल्या पालावर परतली. समाज आणि शासन यांतील दुवा म्हणून ‘भटके विमुक्त कल्याणकारी परिषद’ सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्यरत आहे. बिर्‍हाड परिषद हे त्याचे उदाहरण. माणुसकीच्या धर्माला जागवणारी ही बिर्‍हाड परिषद पंचपरिवर्तनाची नांदी ठरावी.
 
 
श्रीकांत तिजारे

 
 
९४२३३८३९६६
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121