संधीदूत शंतनु

    26-Mar-2025
Total Views | 42

article on shantanu dalal
 
प्रत्येकाच्या चेहर्‍यावर नोकरी मिळाल्याचा आनंद बघायला मिळावा हेच स्वप्न बघत, त्यासाठी निस्वार्थ समाजसेवा करणार्‍या शंतनु दलाल यांच्याविषयी...
 
अशीही काही माणसं असतात, ज्यांच्या जगण्याचा अर्थ केवळ स्वतःपुरता मर्यादित नसतो. जीवनसंघर्षाच्या वणव्यातून मार्ग काढताना ते स्वतःला फक्त तावून-सुलाखून घेत नाहीत, तर इतरांच्या वाटाही प्रकाशमान करण्यासाठी स्वतःला दीपस्तंभ करतात. त्यांच्या वेदना वैयक्तिक नसतात, त्या एक सामाजिक जाणिवेचे रुप घेतात. काहीजण संकटे पार करून त्यांचा विसर पडू देतात, तर त्याच अडथळ्यांपासून प्रेरणा घेत समाजकार्याचा नवा आदर्श प्रस्थापित करतात. रोहित दलाल उर्फ शंतनु यांचे आयुष्यही असेच काहीसे.
 
छत्रपती संभाजीनगर इथे शंतनु यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण जालना जिल्ह्यातील परतूर इथे गेले. आई गृहिणी, तर वडील सहकारी बँकेत लिपिक पदावर कार्यरत. त्यामुळे वडिलांची अनेकदा बदली होत असे. परिणामी, शंतनु यांचे शालेय शिक्षण विविध टप्प्यांत अनेक शाळांमध्ये पूर्ण झाले. शंतनु यांच्या घरात सारेच वाणिज्य किंवा कला शाखेतून शिकलेले. मात्र, शंतनु यांना अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे होते. त्यामुळे, त्यांनी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतरच्या प्रवेश परीक्षा दिल्यानंतर अभियांत्रिकिचे शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, घरात आर्थिक समस्या असल्याने त्यावर मात करण्याचे लक्ष्य त्यांच्या कुटुंबासमोर होतेच. त्यावेळी शंतनु यांच्या आईवडिलांनी त्यांचे दागिने गहाण ठेऊन कर्ज घेतले आणि शंतनु यांचे अभियांत्रिकिचे शिक्षण सुरू झाले. घरात जे काही येत होते, ते सारेच घरातील दैनंदिन गरजा आणि कर्जाचा हफ्ता भरण्यातच जात असे. त्यामुळे शंतनु यांनाही व्यक्तिगत आयुष्यात प्रचंड काटकसर करावी लागली, तशीच काटकसर त्यांच्या कुटुंबालाही करावी लागली. शंतनु यांच्या नातेवाईकांनी याकाळात जमेल तशी मदत केली. शंतनु यांनी परिस्थिती ओळखून इतर कोणत्याही गोष्टींच्या आहरी न जाता शिक्षण उत्तमरित्या पूर्ण करण्यावर भर दिला.
 
आता शिक्षण उत्तमरित्या पूर्ण झाल्याने नोकरीचा विचार शंतनु यांच्या मनात रुंजी घालू लागला. त्या काळात नोकरीची उपलब्धता समजण्याची फार काही साधने नव्हती आणि असली तरी ती आजसारखी सहज उपलब्धही नव्हती. त्यातच नोकरी मिळवण्यासाठी ती शोधायची कशी ते अर्ज कसा करायचा याचेही ज्ञान शंतनु यांना नव्हते. त्यामुळे शंतनु यांनी आदर्श रिझ्युमे कसा असावा, याची माहिती जमा केली. त्याचप्रमाणे स्वतःच्या रिझ्युमेमध्ये बदल करताच जवळच्याच कंपन्यांमध्ये पाठवण्यास सुरुवात केली. यामध्ये अनेकदा मुलाखतीसाठी बोलवण्यात येत असे. मात्र, यश काही पदरात पडत नसे. याच काळात शंतनु यांना समाजमाध्यमावरील ‘लिंक्डइन’सारख्या स्रोतांविषयी माहिती मिळाली. त्यावर शंतनु यांनी स्वतःचे खाते सुरू केले. याच काळात महाविद्यालयात असताना ‘कॅम्पस प्लेसमेंट’मध्ये शंतनु यांना नामांकित कंपनीने बारावीच्या गुणांवरून नोकरी नाकारली.
 
त्यामुळे शंतनु काहीसे निराश झाले. मात्र, ही निराशा झटकत त्यांनी त्यांच्या आईजवळ विश्वासाने सांगितले की, “एक दिवस हीच कंपनी मला स्वतःहून बोलावून घेईल.” त्यानंतर शंतनु यांना नोकरीसाठी आवश्यक असलेल्या एका कोर्सची माहिती मिळाली. शंतनु यांनी तो कोर्स पूर्ण केला. त्यानंतर मात्र काही दिवसातच त्याच कंपनीच्या अधिकार्‍यांनी शंतनु यांना नोकरीसाठी विचारणा केली आणि शंतनु यांनी ती स्वीकारलीही. त्यानंतर शंतनु यांनी नोकरीमध्ये कौशल्यावर प्रगती साधली. त्यांना परदेशात जाण्याची संधीही आली होती. मात्र, खासगी कारणास्तव त्यांनी ती नाकारली. मात्र, इथेच राहून स्वत: प्रगती करत त्यांनी वडिलांवरचे कर्ज तर फेडलेच, पण आईचे गहाण ठेवलेले दागिनेही तिला, त्यात भर घालून परत केले. या सगळ्या काळात नोकरी कशी मिळते? आपल्याकडून नेमक्या काय चुका होतात? याचा प्रत्यक्ष अनुभव शंतनु यांना मिळाला. त्यामुळेच महाविद्यालयीन जीवनातच शंतनु यांनी सुरू केलेल्या ‘मराठी नोकरी’ या सेवाकार्यालाही पुढे नेण्याचा विचार केला. वास्तविक नोकरी लागल्यानंतर नोकरीमधील कार्यमग्नतेमुळे शंतनु यांचे या सेवाकार्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक तरुणांनी शंतनु यांना सांगून हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यास भाग पाडले.
 
‘मराठी नोकरी’ ही कोणतीही संस्था नाही, तर हा एक समाजमाध्यमांवरील समूह आहे. यामध्ये शंतनु यांच्याकडून दररोज देशभरातील सर्व क्षेत्रातील नोकर्‍यांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. त्यामुळे गरजवंतांपर्यंत सहजच नोकरीची संधी पोहोचते. शंतनु हे सारे कार्य विनामोबदला करतात, हे विशेष! शंतनु यांना स्वतःला नोकरी शोधताना ‘आधी पैसे भरा, मग नोकरी देतो’ असे अनुभव आले होते. अर्थात, पैसे भरून नोकरी मिळवणे मान्यच नसल्याने, शंतनु यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नोकरीसाठी कोणाकडूनही पैसे मागायचे नाहीत, हा शंतनु यांचा नियम आहे.
 
आजमितीला शंतनु यांच्या ‘मराठी नोकरी’ उपक्रमामधून, जवळपास तीन हजार तरुणांना नोकरी मिळाली आहे. शंतनु यांच्या टेलिग्रामवर असलेल्या ‘मराठी नोकरी’ समूहाची सदस्य संख्या जवळपास ३० हजारांच्या घरात आहे. यापैकी अनेकजणांनी स्वतःदेखील असाच उपक्रम सुरू केला असून, त्यामार्फतदेखील अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. फक्त नोकरी देण्यापेक्षा ती मिळवायची कशी? यासाठीची सर्व माहितीदेखील शंतनु यांनी या समूहावर उपलब्ध करून दिली आहे. शिवाय ते अनेकांना मार्गदर्शनदेखील करतात. आता नोकरी सांभाळता सांभाळता शंतनु यांची समाजसेवा उत्तम सुरू आहे. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर नोकरी मिळाल्याचा आनंद बघायला मिळावा, हेच निस्वार्थ स्वप्न बघणार्‍या शंतनु दलाल यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
 
 
 
 
कौस्तुभ वीरकर
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121