एक काळ असा होता की, हिंदू धर्मसंस्कृती भारताच्या पलीकडे अगदी दक्षिण आशियाई देशांपर्यंत पोहोचली, रुजली अन् बहरली. त्यामुळे अगदी इंडोनेशियापासून ते मलेशिया आणि पुढे थेट थायलंडपर्यंत हिंदूंचा प्रभाव वाढू लागला. भारतातील पल्लव राजांच्या काळात हे सगळे घडत होते. नवव्या शतकापर्यंत अनेक देशांत राजांपासून प्रजेपर्यंत सर्वांनी हिंदू धर्माचरणास प्रारंभ केला. दहाव्या शतकानंतर मात्र परिस्थिती काहीशी बदलू लागली. दक्षिण आशियाई देशांतील काही देश मुस्लीम देशांमध्ये धर्मांतरित होत गेले. १५व्या शतकापूर्वी, मलेशियातील रहिवासी एकतर हिंदू-बौद्ध होते किंवा मुस्लीम धर्माचे पालन करत होते. सुमारे १ हजार, ७०० वर्षांपूर्वी भारतातून व्यापारी माध्यमातून मलेशियामध्ये हिंदू धर्माचा प्रसार झाला. आजही मलेशियातील नऊ टक्के लोकसंख्या तामिळ आहेत. त्यापैकी बहुतांश नागरिक हे हिंदू धर्माचेच पालन करतात. मात्र, तरीही मलेशियाची बहुसंख्य लोकसंख्या ही मुस्लीम धर्मीय आहे.
याच मलेशियाची राजधानी असलेल्या क्वालालंपूरमध्ये १३० वर्षे जुने देवी श्री पथराकालियाम्मन मंदिर आहे, जे हटवून मशीद बांधण्याची तयारी सुरू सध्या सुरू झाली आहे. येत्या गुरुवारी मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम स्वतः या मशिदीची पायाभरणी करणार आहेत. वास्तविक मंदिराची जमीन मलेशियन सरकारने २०१४ साली येथील मुस्लीम व्यापारी मोहम्मद जॅकेल अहमद यांच्या कपडे निर्मिती करणार्या ‘जॅकेल’ नावाच्या कंपनीला विकली होती. मोहम्मद जॅकेल आता राहिले नाहीत. परंतु, त्यांच्या वारसदारांनी त्या जागेवर मशीद बांधण्याची योजना आखली आहे. त्यामुळे मलेशियातील हिंदूंनी या मशीद उभारणीला विरोध दर्शविला आहे.
देवी श्री पथराकालियाम्मन मंदिर हे शहराच्या प्रमुख ठिकाणी वसलेले मंदिर आहे, जेथे निवासी वसाहत तसेच बाजारपेठ आहे. हे मंदिर ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्याही महत्त्वाचे. कारण, हे मंदिर प्राचीन असून हिंदूंसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. हिंदूंच्या भावना, त्यांची नाळ या मंदिराशी जोडली आहे. हिंदूंच्या या विरोधामुळे मलेशियातील धार्मिक समानता आणि नागरी पुनर्विकासाचे दावे उघड झाले आहेत. धार्मिक भेदभावाची तक्रार हिंदूंनी केली असली, तरी मलेशियन सरकारने प्रत्येक दावे कायम फेटाळूनच लावले.
मंदिराची जागा जरी २०१४ साली खासगी झाली असली, तरी हिंदूंनी या मशीद निर्मिती प्रक्रियेस विरोध करणे स्वाभाविकच. कारण, हे मंदिर १४० वर्षे जुन्या एका मशिदीलगत स्थित आहे. हिंदूंचा असा दावा आहे की, मशिदीच्या बांधकामानंतर केवळ दहा वर्षांत मंदिराची पायाभरणी झाली होती. मंदिराची जागा जेव्हा सरकारने विकायचे ठरवले, तेव्हा कंपनीचे दिवंगत संस्थापक मोहम्मद जॅकेल अहमद यांनी या परिसरात चौथी मशीद बांधून मुस्लीम समाजाला भेट देण्याच्या उद्देशाने हा भूखंड खरेदी केला होता. आज सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मलेशियातील धार्मिक असमानता आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांबाबत चिंता वाढली आहे. सरकारच्या या पावलावर हिंदू समाजाचे प्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आजच नाही, तर गेल्यावर्षीसुद्धा पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्यामुळे मलेशिया वादाच्या भोवर्यात सापडला होता. खरंतर बहुसांस्कृतिक देश असलेल्या मलेशियामध्ये धर्म हा एक संवेदनशील मुद्दा. असे असताना ऑगस्ट २०२३ सालच्या दरम्यान अनवर इब्राहिम यांनी एका हिंदू युवकास इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. एका मशिदीत नमाज अदा केल्यानंतर एका हिंदू युवकाचे उघडपणे धर्मांतरण केले होते. त्यानंतर हे मंदिराचे प्रकरण आता समोर येत आहे. अशी माहिती आहे की, ‘जॅकेल’ कंपनी सतत मंदिर समितीशी बोलत असून, मंदिर दुसर्या ठिकाणी हलवण्याचा खर्च उचलण्याच्या तयारीत आहे. खरंतर जोपर्यंत मंदिर स्थलांतरित होत नाही, तोपर्यंत मशीद बांधण्याचे काम पुढे ढकलण्यात आले असतानाही, अनवर इब्राहिम मशिदीच्या पायाभरणीसाठी इतकी घाई का करत आहेत? असा प्रश्न आता पडू लागला आहे. तसेच भारतातून भडकाऊ विधाने करुन पसार झालेल्या झाकिर नाईकलाही आसरा देणारासुद्धा हाच मलेशिया. एकूणच तुर्कीत एर्दोगान यांनी ज्याप्रमाणे ‘आया सोफिया’ या ऐतिहासिक चर्चच्या वास्तूचे पुन्हा मशिदीत केलेले रूपांतर केले, तसाच काहीसा डाव मलेशियातही शिजत असेल, तर ते चिंताजनकच!