सात दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजाराला नफेखोरीचे ग्रहण, ७०० पेक्षा जास्त अंशांची पडझड

निफ्टीमध्येही १८१ अंशांची गळती, पायाभूत सुविधा कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण

    26-Mar-2025
Total Views |

martketvb
 
मुंबई : गेले सात दिवस सातत्याने सुरु असलेल्या तेजीने गुंतवणुकदारांना मालामाल करणाऱ्या शेअर बाजाराने बुधवारी ७०० अंशांनी मान टाकली. प्रामुख्याने पायाभूत सुविधा कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. या घसरणीमुळे गुंतवणुकदारांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागले. ७२८ अंशांची पडझड होत, शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७७,२८८ अंशांवर थांबला. निफ्टीमध्येही फारसा उत्साह दिसून आला नाही. तिथेही १८१ अंशांची पडझड होत निर्देशांक २३, ४८६ अंशांवर थांबला. नफेखोरीच्या वाढत्या प्रभावाने शेअर बाजाराला बुधवारी ग्रासलेले दिसले.
 
घसरण झालेल्या प्रमुख कंपन्यांमध्ये एनटीपीसी, टेक महिंद्रा, सिप्ला या कंपन्यांचे शेअर्स जोरादार आपटले. याउलट सध्या २१०० कोटींच्या घोटाळ्यामुळे चर्चेत असलेल्या इंडसइंड बँकेचे शेअर्स वधारले. याशिवाय टायटन कंपनी, महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्सनी उचल खाल्ली. क्षेत्रांनुरुप बघायला गेले तर, ग्राहकोपयोगी वस्तु, माध्यम कंपन्या, धातू उत्पादक, फार्मा, तेल आणि नैसर्गिक वायू या क्षेत्रांमध्ये घसरण झाली. शेअर बाजारातील या क्षेत्रांच्या घसरणीने बाजारात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
 
बुधवारच्या शेअर बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार तज्ज्ञांनी नफेखोरीवरच बोट ठेवले. अमेरिकेकडून भारतावर पुढील आठवड्यात लादण्यात येणाऱ्या आयातशुल्काच्या घोषणेचाही हा परिणाम आहे. ज्या क्षेत्रांचा अमेरिकी व्यापाराशी जास्त संबंध येत आहे अशा आयटी, फार्मा सारख्या क्षेत्रांत विक्रीचा जोर होता. या सगळ्या थोड्या चिंताजनक वातावरणातही भारतीय देशांतर्गत बाजारात येत चाललेली स्थिरता, परदेशी संस्थात्मक गुंतवणुक दारांकडून भारतीय शेअर बाजारात होत असलेली गुंतवणुक या गोष्टी आशादायक चित्र निर्माण करत आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121