वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात आपले सगळ्यांचे लाडके लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार वपु. ‘पार्टनर’, ‘वपुर्झा’, ‘ही वाट एकटीची’, ‘ठिकरी’ यांसारख्या कित्येक पुस्तकांतून वपुंच्या विचारधनाचे गारुढ आजही कायम आहे. पण, लेखक, कथाकथनकार म्हणून सर्वज्ञात असलेले वपु, वडील म्हणून कसे होते? आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सुकन्या स्वाती चांदोरकर यांनी वपुंच्या अर्थात त्यांच्या बापूंच्या आठवणींच्या शिदोरीतील उलगडलेले हे एक पान...
एक पूर्ण पुस्तक लिहिले वपु काळे या व्यक्तीवर; म्हणजेच माझ्या वडिलांवर, तरीही ते उरलेच. हा लेख लिहून झाला, तरीही ते उरणारच आहे. प्रत्येक मुलासाठी आपले आईवडील खास असतात. आईवर तर खूप लिखाण, काव्य होते. हल्ली वडिलांवर पण होऊ लागले आहे. मी ‘वपु’ पुस्तक लिहिले, जेव्हा त्यांच्या वयाची पंचाहत्तरी होती. तो दिवस माझ्यासाठी फार फार महत्त्वाचा होता.
दीनानाथ नाट्यमंदिर, दि. २५ मार्च २००७ रोजीच्या संध्याकाळची वेळ. आम्ही बापूंच्या वाक्यांनी त्या नाट्यगृहाचे खांब भरून टाकले होते. बापूंचा फोटो मध्ये ठेवून सुरेख भव्य रांगोळी काढलेली होती. बापूंचा फोटो त्यादिवशी दीनानाथ नाट्यगृहात लागणार होता. प्रभाकर पणशीकर आणि नरेंद्र जाधव यांच्या हस्ते त्या फोटोचे अनावरण होणार होते. ‘वपु’ पुस्तकाचे प्रकाशन होणार होते आणि मी पुन्हा एकदा बापूंना अनुभवणार होते. अनेकदा वाटून गेले की बापू तिथे आहेत, ते हा सोहळा बघत आहेत, आशीर्वाद देत आहेत. नाट्यगृह खचाखच भरलेले आणि मी भारावून गेलेली. मला या सोहळ्याचे अतिशय महत्त्व होते. कारण, बापूंचा फोटो तिथे कायमचा लावला जाणार होता. त्या नाट्यगृहात ज्याचे ते स्थापत्यविद होते, त्याच रंगमंचावर त्यांनी कथाकथन केले आणि त्याच रंगमंचावर त्यांनी ‘पार्टनर’ या त्यांच्याच कादंबरीवर आधारित ‘नाट्यांबरी’ सादर केली. एक वास्तू निर्मित करणारा यशस्वी लेखक, यशस्वी कलाकार, माझा बाप, बापमाणूस होता.
दीनानाथ नाट्यमंदिरात बापूंचा फोटो इतर अनेक दिग्गजांच्या फोटोंबरोबर आहे. मला अनेकदा असे वाटते की, त्या नाट्यगृहाचे रोजचे सगळे प्रयोग संपल्यावर रात्री सगळे महान कलाकार आपल्या चौकटीतून बाहेर येत असतील आणि त्यांची एक वेगळीच मैफिल जमत असेल. काय बहार असेल ती! मी बापूंसारखे कधीच कथाकथन करू शकले नाही. प्रयत्न केला नाही असे नाही, पण नाहीच जमले. पण, बापूंच्या लिखाणावर काही करावे, हा विचार मात्र मूळ धरू लागला होता. युट्युबवर अनेक असे दिसू लागले, जे बापूंच्या कथा वाचत आहेत, अथवा कथन करत आहेत. आज इतक्या वर्षांनंतरसुद्धा बापूंच्या कथांना रसिक कंटाळलेले नाहीत, हे जाणवू लागले.
पूर्वी पत्रे लिहिली जायची. पसंती, नापसंती कळायची. हल्ली तसे काही होत नाही. एखादा फोन किंवा सोशल मीडियावर एखादी कमेंट लिहिली की, समजली जाते पसंती, नापसंती. पण, त्यात मजा येत नाही. निदान मला तरी. बापूंना पत्रे आलेली खूप आवडायची. तो काळही तसाच होता. पत्रे हा संवादाचा मुख्य भाग होता. म्हणून मग बापूंच्या पत्रांनाच व्यक्त करावे, असा विचार केला. हौशी, त्यासाठी कष्ट घेणारे आणि सहकार्य करणारे सहकारी मिळत गेले आणि ‘वपु-एक अमृतानुभव’ या कार्यक्रमाची सुरुवात झाली. मोजके प्रयोग झाले आणि मग तेही थांबले. प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात. सोशल मीडियामुळे पत्रे पाठवणे, येणे बंद झाले. पण, याच मीडियामुळे ‘वपु चाहता वर्ग’ यांचा ग्रुप बनला. असे निदान तीन-चार ग्रुप्स तरी आहेत, ज्यावर बापूंची वाक्य रोज कुणी ना कुणी लिहितो. ‘कोट्स’ म्हणतात ना त्याला! याचाच अर्थ वाचन कमी झालेले नाही. मराठी भाषा आजही तितकीच समृद्ध आहे, जितकी आधी होती. आपली भाषा पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची जबाबदारी आपलीच आहे.
माझ्या लहानपणी हे अगदी सहज होत होते. घरी येणारे पाहुणे मराठीतच बोलत. मोठमोठे कलाकार अगदी जवळून बघण्याची, त्यांना ऐकण्याची संधी मिळाली, ती बापू आणि आईमुळे. आई रसिक होती. दाद कुठे द्यायची, हे तिला माहीत होते. बापूंच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा असला की, ती अतिशय उत्साहित असायची आणि बापू त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला कुणा नामवंत कलाकाराची मैफिल ठेवायचे. कधी जितेंद्र अभिषेकी, तर कधी वा. वा. पाटणकर, म्हणजे मराठी शायरीकार भाऊसाहेब पाटणकर, कधी श्रीधर फडके, कधी कुणा कवीच्या कविता. अनेक मैफिलींना आईबापू आम्हाला घेऊन जायचे. अरुण दाते, हे रामुभैया दात्यांच्या आठवणीत दरवर्षी एक कार्यक्रम करायचे. शास्त्रीय संगीताचा. काही कळायचे नाही तेव्हा. क्वचित कंटाळासुद्धा यायचा. झोपही लागायची. लहानच होते तेव्हा. पण, आईबापूचे मत असे होते की, कानावर पडू देत. मोठी झाली की होईल रुची निर्माण. नाटक, हे असे गाण्यांचे कार्यक्रम. रवींद्र नाट्यमंदिरात बापूंनी आम्हा मुलांना गोपी कृष्ण यांचा ‘कथ्थक-नृत्याचा अविष्कार’ दाखवला होता.
कला कुठलीही असो, आईबापूंना कला आणि कलाकार यांचा आदर होता. संस्कार म्हणजे अजून वेगळे काय असतात? संध्याकाळची परवचा आमच्या बरोबरीने आई पण म्हणायची. मला अजून ते चाळीतले, दीड खोली असलेले आमचे घर आठवते. स्वयंपाकघरात बापूंनी तयार केलेले देवघर आठवते. एक पाय मुडपून त्या देवासमोर बसलेली आई आठवते आणि मंद तेवणारी ज्योत आठवते. त्या ज्योतीच्या प्रकाशाने देवांची मागच्या बाजूला पडलेली छोटीशी सावलीसुद्धा आठवते. ‘तुम्ही शुभंकरोति म्हणा,’ असे कधीही तिने सांगितले नाही. तीसुद्धा आमच्याबरोबर श्लोक म्हणायची आणि देवाला मनोभावे नमस्कार करायची. आधी अण्णांना म्हणजे, माझे आजोबा, बापूंचे वडील त्यांना नमस्कार करायचा, मग आईला आणि बापू कामावरून आले की त्यांना नमस्कार कर, असे सांगावे लागणार नाही, असे आई वागायची. कळत नकळत झालेले हे संस्कार! मुद्दाम समोर बसवून ‘याला संस्कार म्हणतात,’ असे कधी सांगितले गेले नाही. बापूंचे म्हणणे तर फारच वेगळे होते.
घरी येणार्या माणसांचे निरीक्षण करण्याची नजर मिळवा. तुम्हाला त्यांच्यातले जे आवडले आहे ते स्वीकारा, अंगीकारा, म्हणजे झाले संस्कार. घराचा फक्त दर्शनी भागच उत्तम स्वच्छ ठेवायचा आणि बाकी पसारा राहू द्यायचा, हे अगदी चूक. प्रत्येक गोष्ट नीट हवी. सौंदर्य म्हणजे दिसणे नव्हे, असणे असते आणि एकदा का ती नजर मिळाली की, आनंदाला तोटा नाही. म्हणून मला माझे वडील ‘बाप’ वाटतात. हात उगारून, शिक्षा करून फक्त भीती निर्माण होऊ शकते; आपुलकी, श्रद्धा यावर त्यांचा ठाम विश्वास होता. ते स्वतः तसे वागायचे.
एकदा अगदी सहज त्यांनी मला एक प्रश्न विचारला. असेन १२-१३ वर्षांची. ते म्हणाले, “स्वाती, अशी किती माणसं तुझ्या आयुष्यात आहेत की, ती जे काही तुला सांगतील, तसे तू ऐकशील? तुला विश्वास असेल की, तुझ्या चांगल्यासाठीच सांगत आहेत?” मी गप्प राहिले होते. बरं आता असे सांग की, “अशी किती माणसं तुझ्या आयुष्यात आहेत की, तू जे काही सांगशील ते ती ऐकतील, त्यांचा विश्वास असेल की, तू जे काही सांगते आहेस, ते त्यांच्या चांगल्यासाठीच आहे?” मी गप्प राहिले. नंतर विचार करू लागले की, खरंच, मी पूर्णतः ऐकेन असे एकही माणूस नाही? बापूसुद्धा नाहीत? आणि असे एकही माणूस नाही की मी सांगितले म्हणून ऐकेल?
बापू, तुम्ही मला हा प्रश्न फार लवकर विचारलात. अजून जरा मोठी होऊ द्यायचे होते. टप्पे टोणपे खाऊ द्यायचे होते. तुमच्या आणि आईच्या सुरक्षित कोशात वाढत होते. अनुभवांचे गाठोडे बांधले गेले नव्हते. मग मी अनुत्तरीतच राहणार होते ना? तेव्हा खरं तर मी सांगायला हवे होते, आहे एक माणूस माझ्या जीवनात, ज्याचे मी १०० टक्के ऐकेन, मानेन आणि तो माणूस म्हणजे तुम्ही! पण, नव्हतीच ना तितकी समज. आता समज आली आहे. पण, फार उशीर झाला आहे. तरीही सांगते, मला तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. तुम्ही आहात ती व्यक्ती आणि दुसरा प्रश्न अजूनही अधांतरी आहे...