आपल्यापैकी प्रत्येकालाच समाधी ही ऐकून माहिती असते. मात्र, समाधी हे योगाचे अंग आहे, याची माहिती कमी जणांना असते. समाधी म्हणजे काय, ती कशी साधली जाते, त्यासाठी काय यम-नियमांचे पालन करावे लागते, यांचा घेतलेला आढावा...
योगशास्त्रातील अष्टांगांपैकी शेवटचे अंग म्हणजे समाधी होय. समाधी या संस्कृत शब्दाचा अर्थ एकाग्रता किंवा एकत्र आणणे. ‘सम’चा अनुवाद आहे, ज्याचा अर्थ परिपूर्ण, सुसंवादी आणि पूर्ण असा आहे आणि ‘एकाग्रता’ हा शब्द समाधीपासूनच आला आहे. याचा अर्थ एकत्रितता (परमेश्वराची व समाधीस्थ व्यक्तीची), शांतता आणि एकता असा आहे.
जो योगसाधक मनाची चंचलता मोडून तो निस्तब्ध अवस्थेत असतो, ती समाधी. ती शब्दातीत दिव्य अवस्था म्हणजे ध्यानाची परिसीमा.व्यावहारिक दृष्टीने पाहिले असता, ज्याला कर्माची नैष्कर्म स्थिती साधली आहे, जीवनात काही देणे-घेणे राहिले नाही, संचित भोगून अथवा उपभोगून संपले, आयुष्यभर सतत ईश्वरप्रणिधान केल्याने कर्मफल निर्माणच झाले नाही, म्हणून पुनर्जन्मही नाही, देणे हा आत्म्याचा गुण असल्याकारणाने जे काही द्यायचे आहे, तो आध्यात्मिक बोध वारसा हेच भगवंताच्या इच्छेनुसार आत्मरूपात राहून द्यायचे, अशी ज्याची दृढ धारणा झाली आहे, त्यालाच समाधी लाभते.
म्हणून सत्पुरुषाच्या समाधीस्थळावर डोके ठेवल्यावर, विशिष्ट आध्यात्मिक स्पंदने जाणवतात. मग ती संत ज्ञानेश्वरांची समाधी असो, संत गोंदवलेकर महाराजांचे समाधीस्थळ असो की, सद्गुरू गजानन महाराजांचे समाधीस्थळ असो. आता सुरक्षेच्या कारणास्तव डोके ठेवू देत नाहीत, तो भाग अलाहिदा.
इच्छा-आकांक्षांचे जंजाळ शिल्लक आहे, मन सैरावैरा इच्छा-आकांक्षांमागे धावून खोटी मनोरथे उभी करत आहे, त्यांचा हा विषय नाही. तर समाधी हा मुक्तीचा विषय आहे. मुक्ती त्यालाच मिळते, ज्याचे संचित शिल्लक नाही. कर्म सिद्धांतानुसार आपले प्रत्येक कर्म हे परिणाम म्हणजेच फळे देऊन जाते. याबाबत श्रीमद्भगवद्गीता हा सर्वमान्य ग्रंथ काय सांगतो, ते बघूया...
तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर।
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पुरुषः॥
भगवद्गीता अध्याय-४ श्लोक-१९
अर्थ : म्हणून तू नेहमी आसक्त न होता, कर्तव्य कर्म नीट करीत राहा. कारण, आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य, परमात्म्याला जाऊन मिळतो.
त्यासाठी मन अनासक्त होणेच आवश्यक आहे. ज्यासाठी ध्यानाची दुसरी पायरी (ध्यान या लेखांक-३२ मध्ये सांगितल्याप्रमाणे) अभ्यासणे आवश्यक आहे.
अनासक्त मनच कर्माची फळे टाळू शकते. तसेच, जो हे जाणतो की,
न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा।
इति मां योऽभिजानाति
कर्मभिर्न स बध्यते॥
भगवद्गीता अध्याय-३ श्लोक-१५
अर्थ : कर्मांच्या फळांची मला (भगवंताला) स्पृहा नाही, त्यामुळे कर्मे मला लिप्त करीत नाहीत. अशा प्रकारे जो मला तत्त्वतः जाणतो, त्यालाही कर्मांचे बंधन होत नाही.
कारण हे जाणणे म्हणजे,
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि॥
श्रीमद्भगवद्गीता अध्याय-२ श्लोक-४७
अर्थ : तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. तो अधिकार त्यांच्या फळाविषयी कधीही नाही. म्हणून तू कर्मांच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस. त्याचप्रमाणे कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस.
तसेच,
प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः।
अहंकारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते॥
श्रीमद्भगवद्गीता अ-३ श्लोक-२७
अर्थ : वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फतच केली जातात. तरीही ज्याचे अंतःकरण अहंकारामुळे मोहित झाले आहे, असा अज्ञानी मनुष्य मी कर्ता आहे असे मानतो. त्यालाच कर्मबाधा म्हणजे कर्मबंधन होते व तो ‘पुनरपि जननं पुनरपि मरणम्’ या चक्रात अडकतो. तो समाधीचा अधिकारी नाही.
(समाधीचे प्रकार-क्रमशः)
डॅा. गजाजन जोग
(लेखक योगोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक आहेत.)
९७३००१४६६५