असाध्य ते साध्य करण्याची ताकद म्हणजे आमचे भाईसाब : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर यांचा सत्कार सोहळा
25-Mar-2025
Total Views |
मुंबई : “गीतेतील ‘कर्मण्ये वा धिकारस्ते’ या वचनावर विश्वास ठेवत असाध्य ते साध्य करण्याची ताकद ठेवणारे भाईसाब म्हणजेच ओम प्रकाश माथूर आहेत,” अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गौरव केला. ‘राजस्थान ग्लोबल फोरम’तर्फे सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात संपन्न झाला. या प्रसंगी राज्याचे सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार, माजी मंत्री राज पुरोहित, ‘राजस्थान ग्लोबल फोरम’चे मोतीलाल ओसवाल आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी माथूर यांच्या सोबत काम करतानाच्या आठवणींना उजाळा दिला.
२०१४ साली ऐन निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा युती झाली नाही. तेव्हा हार न मानता माथूर यांनी रणनीती आखली आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घेऊन पहिल्यांदाच महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. याचे श्रेय माथूर यांनाच जाते. त्यांनी आपले ‘इलेक्शन स्पेशालिस्ट’ हे नाव सार्थ केले आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘हा सन्मान संघ संस्काराचा’ : राज्यपाल ओम प्रकाश माथूर
आज माझा होत असलेला सन्मान हा माझा नसून संघ संस्काराचा आहे. मी संघाने आणि नंतर पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडली. माझ्या कार्यात पक्षाने, कार्यकर्त्यांनी दिलेला पाठिंबा हेच माझ्या आजवरच्या वाटचालीचे गमक आहे. मी आपण केलेल्या या कौतुकाचा नम्रतेने स्वीकार करतो. अशा शब्दांत सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
निरपेक्ष आणि निष्कलंक व्यक्तिमत्त्व : आशिष शेलार
“ओम प्रकाश माथूर हे अतिशय संयत, नियोजन बद्ध जीवन जगणारे, अनुशासनाचे पालन करणारे, अत्यंत निरपेक्ष आणि निष्कलंक व्यक्तिमत्त्व आहेत. संघ प्रचारक म्हणून सुरुवात करत आज एका महत्त्वाच्या राज्याचे राज्यपाल हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. तरीही कुठल्याही अभिलाषेचा स्पर्श त्यांनी कधीच होऊ दिला नाही, हा त्यांचा आदर्श आहे,” असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांनी काढले. या समारंभात विविध संघटनांनी माथूर यांचा सत्कार केला व त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.