नवी दिल्ली: ( Congress intention to change the Constitution for Muslim reservation Union Minister Jagat Prakash Nadda in rajysabha ) कर्नाटकात काँग्रेस सरकारने दिलेले मुस्लिम आरक्षण हे संविधानविरोधी असून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याचा आणि संविधान बदलण्याचा काँग्रेसचा हेतू आहे, अशा शब्दात राज्यसभेचे सभागृह नेते केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी काँग्रेसला सोमवारी खडसावले.
कर्नाटकातील सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून सोमवारी राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. राज्यसभेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि सभागृह नेते व केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी काँग्रेसवर एकामागून एक जबरदस्त प्रहार केले. परिणामी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेते विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यास उत्तर देताना चांगलीच भंबेरी उडाली.
राज्यसभेतील सभागृह नेते नड्डा म्हणाले की, काँग्रेस पक्ष संविधानाचा रक्षक असल्याचा दावा करतो. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही, असे बाबासाहेबांनी स्पष्टपणे म्हटले आहे. परंतु काँग्रेस सरकारने कर्नाटकमध्ये मुस्लिमांसाठी करारांमध्ये चार टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे.कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी तेथील विधानसभेत म्हटले आहे की गरज पडल्यास संविधान बदलू. त्यामुळे कर्नाटकमध्ये संविधान धाब्यावर बसविण्याचा प्रयत्न झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल यांनी धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध केला होता. मात्र, काँग्रेसने तेलंगणात ओबीसी-एससी एसटीचे अधिकार हिसकावून मुस्लिमांना आरक्षण दिले आहे, असा टोला केंद्रीय मंत्री नड्डा यांनी लगावला.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीदेखील काँग्रेसला सुनावले. ते म्हणाले, भारतीय संविधानात धर्माच्या नावावर आरक्षण असू शकत नाही. मात्र, घटनात्मक पदावर असलेले काँग्रेसचे नेते मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी संविधान बदलण्याची भाषा करतो. बाबासाहेबांनी नाकारलेले मुस्लिम लीगचे धोरण राबवून काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांची प्रतिष्ठा कलंकित केली आहे, असा टोलाही रिजिजू यांनी लगावला.
भाजपच्या या चौफेर हल्ल्यास विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. आमचा पक्ष संविधानाचे रक्षण करण्यास वचनबद्ध आहे. सत्ताधारी पक्ष हा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडत आहे. आमचे धोरण संविधानाशी छेडछाड करण्याचे नाही तर समावेशक विकासाचे आहे, असा दावा त्यांनी केला.
संविधान बचावचा काँग्रेसचा फेक नॅरेटिव्ह फसला
भाजप सरकार संविधान बदलणार असल्याचा फेक नॅरेटिव्ह काँग्रेसकडून चालवण्यात येत होता. मात्र, आता कर्नाटकातील मुस्लिम आरक्षणामुळे काँग्रेसला आता बॅकफूटवर यावे लागले आहे. ओबीसी आरक्षणाचा वाटा मुस्लिमांना दिल्याचा आरोप भाजपने केला आहे आणि त्या आरोप उत्तर देणे काँग्रेसला चांगलेच जड जात आहे, त्याचे प्रत्यंतर सोमवारी राज्यसभेत आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या फेक नॅरेटिव्हला भाजपने आता चांगलेच उत्तर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.