भारताचे संविधान माझा सगा आणि महाराष्ट्राची १३ कोटी जनता माझे सोयरे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर

    25-Mar-2025
Total Views | 14
 
CM devendra fadnavis on the discussion of final budget week proposal
 
 
मुंबई : ( CM devendra fadnavis on the discussion of  final budget week proposal ) कुठलीही घटना झाली आणि कुणीही केली तरी काही लोक त्याला थेट माझा सगा सोयराच करून टाकतात. पण भारताचे संविधान माझा सगा आणि महाराष्ट्राची १३ कोटी जनता माझे सोयरे आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मंगळवार, २५ मार्च रोजी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ""अंतिम आठवडा प्रस्तावाचा मजकूर ३ पानांचा आहे. इतका मोठा मजकूर याआधी कधीच बघितला नाही. यातील अर्धे विषय कुणी मांडलेच नाहीत. अंतिम आठवडा प्रस्तावात बीड, कोरटकर, नागपूर अशा विविध प्रश्नांवर तुम्ही बोलले. गृहमंत्री असल्यावर प्रत्येक गोष्टीचा थेट सबंध माझ्याशी जोडला जातो. २०२२ ते २०२४ जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तुम्ही मलाच टार्गेट केले. प्रत्येक गोष्ट माझ्याशी जोडली. त्याचा परिणाम असा झाला की, लोकांनी आधीपेक्षा रेकॉर्ड जनादेश आम्हाला दिला. पण यावरून तुम्ही काही शिकतच नाहीत. त्यामुळे करायचे काय हा प्रश्न माझ्यासमोर आहे," असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
 
ते पुढे म्हणाले की, "कुठलीही घटना झाली आणि कुणीही केली तरी काही लोक त्याला थेट माझा सगा सोयराच करून टाकतात. ही फॅशन झाली आहे. पण झालेल्या प्रत्येक घटनेत गृहविभागाने त्यासंदर्भात अतिशय कडक कारवाई केली आहे. माझा सगा सोयरा जरी अपराधी असेल तरी त्याला शिक्षा करायला मी कधीच मागेपुढे पाहणार नाही. याचे कारण म्हणजे माझा सगा भारताचे संविधान आहे आणि माझे सोयरे ही महाराष्ट्राची १३ कोटी जनता आहे. त्यामुळे या पलिकडे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला झुकते माप मिळणार नाही. हा तराजू न्यायदानाचाच असेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
नानाभाऊंचे कुंपण कुठले?
 
"अलीकडच्या काळात नानाभाऊ रोज कुंपणच शेत खात आहे हा एकच शब्द वापरतात. पण हे आहे कुठले कुंपण? आमच्या शेताला कुंपणच नाही. हे खुले शेत असून इथे कुणीही येऊ शकते," असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी नाना पटोले यांना लगावला. तसेच तेलंगणामध्ये प्रशांत कोरटकरला कुणी आश्रय दिला ते बघा. छत्रपती शिवराय हे आपले दैवत असून त्यांचा अपमान करणाऱ्या कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.
 
"जितेंद्र आव्हाड काल लोकशाही कोसळली, राष्ट्रव्यवस्था कोसळली असे म्हणाले. पण ते महाराष्ट्राबद्दल बोलते होते की, बांगलादेशबद्दल हे मला कळलेच नाही. निखिल भामरे, सुनयना होले, समीर ठक्कर, केतकी चितळे, परेश बोरसे, सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा, कंगना राणावत, नारायण राणे, अर्णव गोस्वामी, राहुल कुलकर्णी, राहुल झोरी ही नावे जितेंद्र आव्हाड साहेबांना आठवतात का? यातील नावे आठवत नसतील तर अनंत करमुसे हे एक नाव नक्की आठवेल. त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था होती. राष्ट्रावर कुठलेही संकट नव्हते. संविधानाप्रमाणे काम चालले होते. म्हणूनच मिळेल त्या पत्रकाराला जेलमध्ये टाकण्यात येत होते," असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला.
 
तुम्ही कितीही काड्या केल्या तरी...
 
तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आम्ही तिघे एकमेकांच्या पायात पाय घालणारे नाहीत तर आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून राज्यकारभार चालवणारे आहोत. त्यामुळे तुम्ही कितीही काड्या घालण्याचा प्रयत्न केलात किंवा बांबूची लागवड केली तरीही काहीच होणार नाही," असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
 
दंगेखोरांचा आणि बलात्कार करणाऱ्यांचा एवढा पुळका का?
 
मुख्यमंत्री म्हणाले की, "मी अनेकांचे ऐकले. दंगे करणारे आणि बलात्कार करणारे यांचा एवढा पुळका का? इतकी छाती काय बडवायची? अक्षय शिंदेचा एन्काऊंटर नसता झाला तर बरं झालं असतं. कायद्याने फाशी झाली असती. पण असे छाती बडवणे चालले जसे काही तो अक्षय शिंदे स्वातंत्र्य सेनानीच होता. रोज तेच. दंगेखोर आणि बलात्कारींना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे. पण त्यांच्याबद्दल कुणाच्या मनात संवेदना तयार होत असेल तर ते योग्य नाही. त्यासंदर्भात काही लोकांची मनेही तपासूनच पाहावी लागतील," असेही ते म्हणाले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा